


आष्टी (प्रतिनिधी)
नवे तंत्रज्ञान,नवे विचार आणि समृद्ध शेतीकडे वाटचाल या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले मराठवाड्यातील सर्वात मोठे डॉ.स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनचा भव्य उद्घाटन समारंभ उद्या गुरुवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा.पार पडणार आहे.शेतकरी,कृषी तज्ञ,विद्यार्थी व नागरिकांसाठी हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.सुमित्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे.त्यांच्या उपस्थितीत कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा आढावा घेण्यात येणार असून आधुनिक तंत्रज्ञान,पाणी व्यवस्थापन,सुधारित पीकपद्धती आणि बाजारपेठेतील संधी याबाबत मार्गदर्शन होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कृषी मंत्री ना.दत्तात्रय भरणे,मंत्री पशुसंवर्धन व पर्यावरण ना.पंकजाताई मुंडे,माजी मंत्री आ.धनंजय मुंडे,माजी राज्यमंत्री आ.प्रकाश सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडित,आ.बाळासाहेब आजबे,विविध राजकीय,सामाजिक व कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे,उपविभागीय कृषी अधिकारी उद्धव गंजे, तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.स्वागताध्यक्ष म्हणून माजी आ.भीमराव धोंडे हे मान्यवरांचे स्वागत करणार असून प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री,सुधारित बियाणे,सेंद्रिय शेती,जलसंधारण,पशुपालन,फलोत्पादन आदी विषयांवरील सविस्तर माहिती मिळणार आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी संलग्न आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित श्री.छत्रपती,शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालय,आष्टी यांच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयासमोर हे प्रदर्शन येणार आहे.शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 टिप्पण्या