आष्टी (प्रतिनिधी)
मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नसुन आपली पंरपरा आणि संस्कृती जपणारी भाषा आहे म्हणून मराठी भाषा मराठी माणसांची अस्मिता आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मराठीचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी केले.
कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयामध्ये मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी प्रा.दत्तात्रय ढवळे,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.जी.पी.बोडखे,आजीवन व शिक्षण विस्तार केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.शाम सांगळे उपस्थित होते.याप्रसंगी पुढे बोलताना प्राचार्य डॉ.विधाते म्हणाले की,मराठी भाषा आपली मायबोली आहे.भाषेचे संवर्धन करणे हि आपली सर्वांची जबाबदार आहे.भाषेमधून चांगले संभाषण करणे गरजेचे आहे.भाषेतील चांगले ग्रंथवाचन व लेखन करणे आवश्यक आहे.आपल्या आईने शिकवलेली भाषा असल्याने तिच्याबद्दल आत्मियभाव दिसून येतो. मराठी भाषेत अनेक बोलीभाषा बोलल्या जातात.बोलीभाषेमुळे भाषा समृद्ध होते . दूरचित्रवाहिन्यावरील निवेदक अनेक वेळा बोलीचा उपयोजन करतात कारण बोलीभाषा माणसांच्या अधिक जवळ जाणारी असते. मराठी भाषेला उज्वल परंपरा आहेअनेक साहित्य प्रकारांनी मराठी भाषा नटलेली आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.विधाते यांनी केले. याप्रसंगी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.जी.पी.बोडखे यांनी म्हटले की,संत ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी सारखा परिपूर्ण ग्रंथ लिहून मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने पाया घातला.संत वाङ्मयाने माणसाने कसे वागावे हे ज्ञान दिले.अभंग,ओवी,गवळण,भारुड,लावणी,पोवाडा व बखर वाड.मयाने भाषा नटलेली दिसून येते.वेगवेगळ्या कलाप्रकार,सण-उत्सव व रूढी-परंपरांनी सजलेली मराठी भाषा आहे.१९९२ पासून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो तर ३ ऑक्टोबर २०२४ला शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे.मराठी भाषेला दीड हजार वर्षांपूर्वीची प्राचीन परंपरा आहे. मराठी साहित्य जनसामान्यांचे जीवन अधोरेखित करते.दलित, ग्रामीण,स्त्रीवादी अशा नानाविध साहित्य प्रकारांनी मराठी भाषा साहित्य परंपरेचा समृद्ध वारसा सांगणारी आहे. असे सांगून डॉ.बोडखे यांनी मराठी भाषेच्या उत्कर्षाविषयी आशावाद व्यक्त केला.याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रा.दत्तात्रय ढवळे व डॉ.शाम सांगळे यांची समोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.राम बोडखे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.सज्जनराव गायकवाड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक,प्राध्यापकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
------------------------------------
0 टिप्पण्या