Ticker

6/recent/ticker-posts

शरद पवार यांचे समर्थक राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला ......... उपचारासाठी पुण्याला हलवले

आष्टी (प्रतिनिधी) बीड - अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांदळी जवळ सोलापूर- अहिल्यानगर राज्य महामार्गावर काल बुधवार दि.२६ नोव्हेंबर रोजी रात्री शरद पवार गटाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.रात्री उशिराच्या सुमारास मांदळीजवळ अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावर दहा ते पंधरा जणांच्या मुखवटा बांधलेल्या टोळक्याने त्यांची गाडी अडवून जोरदार हल्ला केला. दगडफेक,गाडीची तोडफोड आणि त्यानंतर धारदार शस्त्रांनी जिवे मारण्याचा प्रयत्न करत हल्लेखोरांनी राम खाडे यांना गंभीर जखमी केले. त्यांच्यासोबत असलेले सहकारीही मारहाणीमुळे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.या हल्ल्यानंतर या घटनेत राजकीय कटकारस्थान असल्याची शंका अधिक तीव्र झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राम खाडे आपल्या सहकाऱ्यांसह मांदळी गावातील एका हॉटेलमधून जेवण करून बीडकडे परतत होते. अचानक अंधारात हल्लेखोरांनी गाडीच्या समोर अडथळा आणला आणि जोरदार दगडफेक सुरू केली.साईड मिरर फोडत वाहनाची मोठी हानी केली. त्यानंतर लाठ्या, तलवारी, पिस्तूल आणि सत्तूर घेऊन हल्लेखोरांनी थेट गाडीत घुसण्याचा प्रयत्न केला.स्वतःचा जीव वाचवण्यासाठी राम खाडे यांनी काही वार हातावर झेलले परंतु हल्ला अत्यंत आक्रमक असल्याने त्यांच्या हाताला खोल जखमा झाल्या.परिस्थिती इतकी गंभीर होती की, रुग्णालयात दाखल होईपर्यंत त्यांची शुद्ध गेली होती आणि शरीर रक्तबंबाळ झाले होते. हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ अहिल्यानगर मधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक होत गेल्याने तातडीने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले.रुग्णालय प्रशासनानेही त्यांच्या प्रकृतीवर गंभीर असल्याचे म्हटले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळावरून एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे प्राप्त झाले आहेत.बदला घेण्यासाठी नियोजनपूर्वक जीवघेणा हल्ला दरम्यान, राम खाडे यांच्या जखमी सहकारी कानडी बुद्रुकचे माजी सरपंच दीपक खिळे यांनी या हल्ल्यामागे थेट राजकीय द्वेष असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते,राम खाडे अनेक भ्रष्टाचार प्रकरणे उघडकीस आणण्यात आघाडीवर होते. त्यांनी विविध स्तरांवर तक्रारी केल्याने काही व्यक्तींना मोठा फटका बसणार होता.त्यामुळेच बदला घेण्यासाठी नियोजनपूर्वक हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात आवाज उठवल्याची शिक्षा आम्हाला देण्यात आली असेही त्यांनी म्हटले आहे.हल्लेखोरांबरोबरच हल्ल्याचे सूत्रधार कोण आहेत?याचा तपास करून तातडीने अटक व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.राजकीय दबावतंत्राला बळी पडणार नाही.या घटनेनंतर शरद पवार गट,बीड जिल्ह्यातील स्थानिक नागरिक आणि राम खाडे यांच्या समर्थकांमध्ये संताप पसरला आहे. राजकीय दबावतंत्राला बळी पडणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.बीडमध्ये नेहमीच राजकीय वाद वाढलेले दिसतात,मात्र थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत परिस्थिती गेल्याने कायद्याची पकड आणि राजकीय वातावरणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सुरक्षा काढल्याचा मुद्दा ऐरणीवर मेहबूब शेख म्हणाले की,यापूर्वी न्यायालयाने त्यांना पोलिस सुरक्षा दिली होती, मात्र गृह विभागाने कोणाच्या सांगण्यावरून त्यांची सुरक्षा अचानक काढून घेतली, हे अत्यंत धक्कादायक आहे.तसंच,खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या बंदुकीचे रिन्यूअलही मुद्दामहून थांबवण्यात आले.हेही उघडपणे दडपशाहीचे संकेत देणारे आहे.याहूनही गंभीर बाब म्हणजे राज्यातील गृहमंत्री पूर्णपणे निष्क्रिय आहेत.ज्यांनी समाजातील अन्याय आणि भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवला,अशा लोकांच्या जीवावर हल्ले होत आहेत आणि सरकार हातावर हात ठेवून बसले आहे असे हल्ले होत असताना सामान्य लोकांनी मग जगायचे कसे? प्रशासन मूकबधिर झाले तर न्याय कुठून मिळणार आणि लोकांचा जीव कोणाच्या भरोशावर? असा सवाल मेहबूब शेख यांनी उपस्थित केला आहे. ------------ चौकट -------- कोणतीही चौकशी लावा पण बिनबुडाचे आरोप करू नका --- आ. सुरेश धस -----------------
राम खाडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात आपले नाव विनाकारण घेतले जात असल्याचा निषेध आ. सुरेश धस यांनी नोंदवला आहे.या प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी गैरजबाबदारपणे लोकप्रतिनिधींवर आरोप करण्याची प्रवृत्ती चुकीची आहे. हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना आ.धस म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असतानाही असेच आरोप राम खाडे करत होते. त्यावेळी माझ्यावर एसआयटी मार्फत चौकशी करण्यात आली होती.मात्र सत्य लपून राहत नाही न्यायदेवतेने देखील त्यावेळी माझा कसल्याच प्रकारचा कुठेही संबंध नसल्याचे सांगितले होते. आत्ताही संबंधित राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी माझा कोणताही संबंध नाही.विनाकारण लोकप्रतिनिधींचे नाव घेऊन बदनाम करण्याचा प्रयत्न योग्य नाही.या प्रकरणी जी काही चौकशी आवश्यक असेल ती संबंधित यंत्रणांनी पूर्णपणे आणि निष्पक्षपणे करावी असेही आ. धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या