जेष्ठ लेखक स्व.सोपान हळमकर (जन्म: मु.पो.हाळम ता.अंबाजोगाई) यांचे दि.१ सप्टेंबर रोजी निधन झाले.ते एक चांगले प्रशासकीय अधिकारी होते.त्यांच्या नावावरची ग्रंथसंपदा नावलौकिकच होती "आक्रोश" हा कवितासंग्रह "सपन " कथासंग्रह "आक्रोश नंतरची कविता" हा कवितासंग्रह आणि "वाढण "हा अलीकडच्या काळात प्रकाशित झालेला कथासंग्रह.त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारही मिळाले होते.अनेक साहित्य संस्थांशी त्यांचा संपर्क होता आणि एक मनमिळावू आणि दूर राहून काव्यावर साहित्यावर लेखनावर वाङ्मयावर प्रेम करणारा हा लेखक आपल्यातून निघून गेला.बीड जिल्ह्याचं, बीड जिल्हा वांग्मय क्षेत्रमध्ये फार मोठे नुकसान झालेला आहे. ते भरून निघणे अशक्य आहे. त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातील साहित्यिकांनी व्यक्त केलेल्या श्रद्धांजलीपर भावना....
कष्टकऱ्यांचा दुःखाचा
शोध घेणारा कवी,लेखक
गेला !
............
"दसरा दिवाळी ऐन
सुगीच्या दिवसात
घारी गिधाडासारख्या रिकाम्या ट्रक्स या शहरात उतरतात
एकेक करून इथल्या डोंगरदऱ्यातील घरांना कडी- कुलपे लागतात हिटलरच्या फलटणी ज्यूंना यातना घराकडे नेतात तुमच्या किल्ल्यावरचे ध्वज मला आता चिरगुटासारखे भासतात सुखाच्या हंगामात काळजाचे गाठोडे बांधून हे तांडे कोठे जातात ?
प्रिये, मला विचारू नकोस तुझ्या प्रश्नांना माझ्याजवळ उत्तरे नसतात."
सोपानराव गुट्टे, हाळमकर यांची माझी भेट १९९४ साली बीडला झाली.मी नुकताच लोकसेवा आयोगाकडून अधिकारी म्हणून निवड होऊन बीडला परिविक्षाधीन अधिकारी म्हणून रुजू झालो होतो.भास्कर चंदनशिव सरांनी त्यांची ओळख करून दिलेली. अतिशय शांत,संयमी,नेमकं बोलणारा हा लेखक त्यावेळी बीडच्या कोषागार कार्यालयात लेखाधिकारी म्हणून काम करत होता.तसे हे नाव मी पूर्वी ऐकलेले पण लेखक कसा दिसतो.याबद्दल मला उत्सुकता फार असायची.सोपानरावला समक्ष भेटून अधिकच आनंद झालेला.बीडमधल्या हाळम गावचे म्हणून सोपानराव हाळमकर झाले.त्यांचं मूळ नाव गुट्टे.हे देखील मला उशिराने कळलेलं.त्यावेळी त्यांचा 'आक्रोश' हा कवितासंग्रह आणि 'सपन' हा कथासंग्रह प्रकाशित झालेला.स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर जन्माला आलेल्या कवी लेखकांच्या पिढीचे सोपानराव हे प्रतिनिधी. राज्याला ऊसतोड कामगार पुरवणारा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख कायम असलेली.थोडी शेती आणि दिवाळीनंतर ऊसतोड करण्यासाठी राज्यभर पांगणारे इथले अल्पभूधारक कास्तकार. या कास्तकारांच्या दुःखाची नोंद घेणारे जे मोजकेच लेखक मराठीत आहेत त्यापैकी सोपानराव हे होते.अतिशय मोजकेच पण महत्वाचे लेखन करणारा हा लेखक फारसा कुठे न मिसळणारा.अतिशय प्रामाणिकपणे आपले सरकारी काम करणे आणि जमेल तसे लेखन वाचन करणे,एवढेच.
नव्या पिढीला तर हे नाव ठाऊक देखील नसेल इतका अज्ञातवासी.नागनाथ कोत्तापल्ले,भास्कर चंदनशिव, वासुदेव मुलाटे असे काही मोजकेच मित्र.दोनेक वर्षांपूर्वी बीडला एका व्याख्यानाच्या निमित्ताने गेलो होतो,तेव्हा आवर्जून त्यांना भेटलो.मध्ये त्यांचे एक मोठे ऑपरेशन होऊन हात गमावला होता. कित्येक वर्षानंतर आमची झालेली भेट.त्यांना इतका आनंद झाला की ते गहिवरून आले. मग त्यांनी नुकतीच प्रकाशित झालेली दोन पुस्तके 'आक्रोशानंतरची कविता' 'वाढण' (कथासंग्रह) भेट दिला. सोपानराव १ सप्टेंबरला गेले. कुठेही बातमी नाही.बीडच्या गोविंद कदम या मित्राने स्थानिक दैनिकात आलेली बातमी मला पाठवली आज आणि सोपानराव गेल्याचे कळले.स्वतःला सुमार गर्दीपासून दूर ठेवून स्वत्व राखून लेखन करणाऱ्या कवी लेखकांचे असेच होते का ?
ते असतात तेव्हा त्यांची दखल कोणी घेत नाही,ते जातात तेंव्हाही कोणाला काहीच माहीत नसल्यासारखे गुपचूप निघून जातात.काही दिवसांपूर्वी प्रभाकर हरकळ गेले अचानक.
आता सोपानराव गेले !
--श्रीकांत देशमुख..
(साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक.नांदेड)
-------------
एक सच्चा मित्र वजा झाला. भावपूर्ण श्रद्धांजली.
-----------------
----- डॉ.वासुदेव मुलाटे
(छत्रपती संभाजीनगर)
...काय बोलू? धकाधकीच्या काळात त्यांचं लेखनाकडे दुर्लक्ष झालं. त्यांच्या सुरुवातीच्या काळात उमेदीनं होणारं लेखन त्यामुळे झाकोळलं गेलं.हां, मागून मग तुमच्याशी संपर्क वगैरे आल्याने त्यांनी उचल खाल्ली.पण दुर्दैवाने ते लवकर गेले.साहित्य क्षेत्रात अमिट ठसा उमटवणारी लेखणी मुकी झाली
--- बाबाराव मुसळे
(वाशिम)
---------------
चौकट करावी
--------------------
स्व.सोपान हाळमकरांची
ग्रंथसंपदा..
------------------
आक्रोश
कवितासंग्रह
(शासनचा पुरस्कार), आक्रोश नंतरच्या कविता ...
कवितासंग्रह,सपन. कथासंग्रह
( शासनचा पुरस्कार), वाढण.कथासंग्रह.
----------------
कवी,कथाकार सोपान हाळमकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
---आसाराम लोमटे
(संपादक प्रतिष्ठान)
-----------------
सोपान हाळमकर या
जेष्ठ कविमित्राचे निधन ही चटका लावणारी गोष्ट आहे.मराठवाडय़ातील हा महत्वाचा कवी नेहमीप्रमाणे दुर्लक्षित राहिला.१९८० च्या दशकात महाराष्ट्रातील साहित्यिक मासिकातून यांच्या कविता यायच्या.पण अतिशय साधा स्वभाव,निरपेक्ष प्रेम करणारा आणि साहित्यावर प्रचंड प्रेम असलेला हा माणूस होता.भावपूर्ण श्रध्दांजली.
-- दिनकर जोशी,अंबाजोगाई.
------------------
अरेरे... दुःखद बातमी.. माणुसकीचा माणूस व कसदार लेखणीचा लेखक हरवल्याचे वाचून मनस्वी धक्का बसला.. भावपूर्ण श्रद्धांजली.. अतिशय ज्येष्ठ लेखक..
--भारत सातपूते (लातूर)
---------------
गेल्या १० वर्षांपासून आदरणीय सोपान हळमकरांच्या साहित्य आणि व्यक्तिमत्वाची वावर समुहावर ओळख झाली.स्वाभिमानी बाणा आणि वास्तवाच्या विस्तवावर धगधगणारे सरांचे लेखन निश्चितच प्रेरणादायी आहे."जगावं तर असं जगावं.. माणूस बाणेदार होता असं जगानं म्हणावं!"
सरांचा मृत्यू अनेक दिवस आम्हां सर्वांची मनं हेलावत राहील.सरांच्या असंख्य,गोड आठवांना ओंजळीत राखून वंदन करतो.आदरांजली वाहतो.
---मनोहर आंधळे (चाळीसगाव)
---------------------------
समाजातील जळजळीत वास्तव आपल्या धारदार लेखणीतून उतरविणारे कवी ,कथाकार,आक्रोशकार सोपान हळमकर ह्यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी जेष्ठ लेखक डॉ.भास्कर बडे ह्यांच्याकडून समजली.सोपान हळमकर हे बाबाराव मुसळे,शंकर बडे, किशोर सानप या नामवंत पिढीतील महत्त्वाचे लेखक ,कवी होते.ग्रामीण,उपेक्षित ,शोषितांचे,जनसामान्यांचे प्रश्न त्यांनी आपल्या साहित्यकृतीतून ताकदीने पण संयमित भाषेत रेखाटलेले आहेत.त्यांच्या निधनाने ग्रामीण ,वास्तववादी साहित्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली
----डॉ.विजयालक्ष्मी वानखेडे
(प्राचार्य कुसुमावती जाधव महिला महाविद्यालय,
बोराखेडी,जि.
बुलडाणा)
------------------
आदरणीय कविवर्य वै.श्री सोपानराव हाळमकर सर म्हणजे एक धगधगता निखारा कवी लेखक.ग्रामीण भागातील सामान्य लोकांच्या व्यथा, वेदना मांडताना त्यांची लेखणी कुणाचाही मुलाहिजा बाळगत नव्हती. त्यांच्या सौभाग्यवतींचे निधन झाल्यानंतर ते एकटे रहात होते. त्यांना मुलं मुलगी नातवंड असा मोठा परिवार असूनही ते एकटे विजनवासात दिवस काढत होते. आई, वडील आणि पत्नी नंतर माणसाला कुणीही वाली नसतं! नटसम्राट मधील नायकासारखी भयावह अवस्था होते. प्रत्येक क्षण अक्षरशः खायला उठतो! हाळमकर सरांशी बोलतांना, त्यांचा नम्रपणा आणि त्याला जोडून एकाकीपणा त्यांच्या आवाजातून जाणवायचा! माणसाचं जीवन मोठं खडतर आणि "पुढे हुशार थोर आहे ओळसा गा" या तुकोक्तीप्रमाणे वृद्धपण, त्यानंतरच्या व्यथा वेदना आणि त्यात एकाकीपण हा फार खडतर ओळसा आपल्या सर्वांनाच येणार आहे. एक मोकळ्या मनाचा जेष्ठ सृजन कवी, लेखक आपल्यातून आणि जगातून वजा झाला याचे अतीव दुःख आणि वेदना आहेत!
भावपूर्ण श्रद्धांजली.
----ह.भ.प. डाॅ.विठ्ठल जायभाये (परभणी)
------------------
जेष्ठ साहित्यिक सोपान हळमकर यांना काव्यआदरांजली.....--------
एक आभाळ संपलेले
-----------
जगण्याच्या या लढाईत
हारलो कितीदा उठलो तरीही
कल्लोळ आतलाच बघ कसा
मला घेऊन चाललेला आज ही
आले नाही जिंकणे तिच्या पुढे
मारुनी पुन्हा पुन्हा या भूकेला
शोधत मी कधीचा चंद्र भाकरीचा
बिलगून चाललो मी या सखीला
अवकाश जरा मिळे या भुकेला
रिकामा जाळ पेटताच राहिला
भयाण राती सरत राहिल्या
वळकटी बांधून बांधून पोटाला
एक आभाळ संपलेले आता
"आक्रोश" पुन्हा होणे नाही
"आक्रोशा"नंतरच्या वेदनांनी
व्यापून राहिल आभाळ अजूनही
किती श्वास असतात ना आपले
नसतो त्यावर आपला अधिकार
देहकुडी ही जरी असते आपलीच
क्षणभंगुर जीवनाचीच ही साथीदार
--- सौ.रजनी मदन
ताजने,लंडन ( यु.के.)
----------------
दु:खद बातमी, हळमकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली, जुन्या पिढीतील महत्वाचे साहित्यिक आपल्या अवतीभोवतीच्या कष्टकरी माणसांचं जगणं भोगण ते सातत्याने आपल्या लेखनातून मांडत होते, नव्याने लिहिणा-या लेकरांच्या पाठीवर कायम शाबासकीची थाप देणारा मोठा बापमाणूस काळाच्या पडद्याआड गेला.डॉ.भास्कर बडे सरांमुळे हळमकर सरांना भेटता आलं, पहिल्याच भेटीत त्यांनी आपलसं केलं, पुढे सरांना अनेकदा भेटलो विविध विषयांवर तासंतास चर्चा केली, फोनवर ही कित्येकदा बोललोत, सरांने ऊसतोड कामगारांवर लिहिलेल्या कविता मला खूप आवडलेल्या त्या कवितने मला अस्वस्थ केलेलं, त्यांच्या आक्रोश नंतरच्या कविता ह्या त्याच्या संग्रहातील काही कवितेचं मी कोरोना काळात ऑनलाईन सादरीकरण ही केलं होतं ते त्यांना खूप आवडलेलं, कौतुकाची थाप देणा-या आपल्या माणसाला आज आम्ही कायमचं मुकलो, अखेरचा सलाम सरजी...
--- लक्ष्मण खेडकर (पैठण)
------------------
ज्येष्ठ साहित्यिक
सोपान हळमकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
जोडीदाराच्या वियोगामुळे हृदयातील एकाकीपण, उदासीनता वास्तव समर्पक उदाहरणांनी लेखणीतून अवतरली आहे.गावचे वास्तव त्यांनी अनेक बोलक्या उदाहरणांनी पटवून दिले आहे. कधी कधी कितीही मोठे संकट आले तरी गाव अतिशय शांत असते. पायवाट रडते , रस्त्याला पूर येतो पण गाव मात्र अतिशय भाव शून्य वर्तन करतो.गाव पाषाण हृदयी असतो म्हणून तर कसलाही गलबला नाही कोणी रडला देखील नाही. आता माणुसकी जरा लोप पावत आहे.स्व कार्यात सर्व मग्न आहेत.अतिशय आर्त, भावविभोर वर्णन,भावपूर्ण अर्थपूर्ण कविता गावातील घडामोडींचा सूक्ष्म निरीक्षण आणि त्यातून आलेली वास्तविक भयाण परिस्थिती यांचे सखोल वर्णन अचूकतेने टिपले आहे.माझे आजोबा कैलासवासी व्यंकटराव भागोजी गुट्टे हे सोपान काकांचे जिवलग मित्र,काकांकडून आणि वडिलांकडून नेहमी त्यांच्याबद्दल ऐकत होते.
पण प्रत्यक्षात पाहण्याचा भेटण्याचा योग कधी आला नव्हता.सहजच फेसबुक वर "बारा भाकऱ्या " व्यक्तिचित्रण लिहिल त्यावरून आदरणीय बाबाराव मुसळे सर यांना मी हाळ म ची असल्याचे कळले. त्यांनी फोन करून विचारले की सोपान हळमकर यांना तू ओळखतेस का? मी म्हणाले," हो पण मी प्रत्यक्ष कधीही त्यांना पाहिलेलं नाही."
आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे सर यांनी आमची ऑनलाईन ओळख करून दिली. काका ,पप्पा सर्व जण त्यांना बोललो .बीडला गेल्यावर आपण नक्कीच त्यांना भेटू बोलू असे माझ्या मनात सतत होते. पण नियतीने आमची भेट मुळी घडूच दिली नाही.मनातली भेटण्याची , बोलण्याची इच्छा मनातच राहिली.आमचा जो काही फोन वर संवाद झाला त्यावरून मायाळू मनाचे,माणुसकीचे दर्शन घडून आले.आज पण मनात विचार सुरू होता की आपण काकांना फोन लावून बोलू. बरेच दिवस झाले बोलून . पण थोड्याच वेळात ऑनलाईन या संघावर ते आपल्याला सोडून गेल्याचे समजले. कोणीतरी खूप जवळच गेलेली भावना मनाला अनपेक्षित धक्का देऊन गेली.पुण्यात्मास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.म्हणूनच असे वाटते ....
जेव्हा जे वाटलं
ते ताबडतोब करावे
पुन्हा पश्चातापाची
वेळ येणार नाही
बोलाव वाटलं तर बोला
लिहाव वाटलं तर लिहा
हसावं वाटलं तर हसा
रडाव वाटलं तर रडा
पण कोणत्याच भावना कोंडून ठेवू नका कारण अरे आपलं ते करायचं राहूनच गेलं. ही भावना जीवघेणी , हृदयात कळ आणणारी असते........
एक पुण्यात्मा अनपेक्षितपणे अनंतात विलीन ,दादांना भावपूर्ण श्रद्धांजली
-- सौ.जयश्री अर्जुन मुंडे
(जि.प.उच्च प्राथमिक शाळा, गावंदरा)
-----------------
दिवंगत सोपान हाळमकर यांचा संबध जवळजवळ ४० वर्षांपासूनच,ते बाबाराव मुसळे , शंकर बडे , चंद्रकांत पालवे , डॉ किशोर सानप या नामावन्ताच्या पिढीतील महत्त्वाचे लेखक आहेत.मध्ये काही कालखंड पडलेला.पुन्हा उभारीने लिहणारा आणि लिहिते करणारा हा उमदा कवी - कथाकार त्यांच्या प्रसिद्धी पराडन्मुखतेमुळे मागे दिसत असले तरी त्यांची लेखणी वास्तवतेच्या धरेवर चालणारी होती . अल्प परंतु त्यांनी स्वताची छाप पडणारी अशी साहित्य सेवा केली.
त्यांना विनम्र अभिवादन
--- डॉ.राजेन्द्र मुंढे
(वर्धा)
------------------
सोपानजी हळमकर.....
आपणास सादर सुमनांजली!
तुमच्या कवितेतून जगण्याचं नेमक वर्म कळलं. विषमतेच्या भेदक वास्तवाला आपण आपल्या धारदार शब्दात वाचकांसमोर इतक्या तीव्रतेने उभ करता की आपसूकच आपण 'नाही रे' च्या बाजूने उभे राहतो. बदलते पर्यावरण, रुक्ष बनलेला गावगाडा, उदास झालेले गाव आणि आपलेपण संपलेला यांत्रिक वावर आपण इतका टिपेला नेला आहे की एका पिढीला प्रत्येक जन ते जगणं हरवून बसलेला आहे, याची खंत करतो.
ही कविता माझं भावविश्व चितरते म्हणून तुम्ही कायम मला माझे कुणीतरी असल्याचे वाटत राहते. हे वाटण हेच तुमच्या लेखनाच सामर्थ्य आहे.
आपल्या नसण्याने ही पोकळी अधिक गडद होत जाते.
माझी श्रद्धांजली
-- प्रा.संतोष तांबे,
(अध्यक्ष,अखिल भारतीय क्रांती सेना पक्ष)
-----------------
कवी,कथाकार सोपानराव हाळमकर

गुट्टे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
--- कैलाश दौंड
(अहिल्यानगर)
------------------
ज्येष्ठ साहित्यिक सोपान हाळमकर सरांची नी माझी भेट मराठवाडा साहित्य संमेलनात शिऊर येथे झाली होती. तेव्हापासून सरांच्या संपर्कात होतो.गुरुवर्य डॉ.वासुदेव मुलाटे सर त्यांच्या लेखनाचा नेहमीच उल्लेख करायचे. सर त्यांच्यावर व त्यांच्या लेखनावर भरभरून बोलायचे. ग्रामीण, शेतकरी आणि ऊसतोड कामगारांचे दुःख हाळमकर सरांच्या लेखणीतून ताकदीने अभिव्यक्त झाले होते. अतिशय ताकदीचे व दर्जेदार लेखन असूनही या लेखकाला फारसा न्याय मिळाला नाही.मोजकेच पण गुणवत्तापूर्ण लेखन करणारे , व्यवस्थेला आपल्या लेखनातून प्रश्नांकित करणारे ते ग्रामीण साहित्यातील महत्वाचे लेखक आहेत. प्रा.भास्कर बडे सरांकडून ही त्यांच्याबद्दल अनेकदा ऐकले होते. फोनवर त्यांच्याशी बोलणे व्हायचे. परखड व निर्भिड लेखन करणारे ते नामवंत साहित्यिक होते.मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळायला हवे होते. हाळमकर सरांचे लेखन कायम वाचक व साहित्यिकांच्या स्मरणात राहील.एक चांगला लेखक आपल्यातून गेल्याचे दुःख आहे. त्यांच्या स्मृति चिरंतन राहाव्यात यासाठी त्यांच्या नावे ग्रामीण साहित्य पुरस्कार सर्वांनी मिळून सुरू करावा. त्यासाठी बडे सरांनी पुढाकार घ्यावा. ही विनंती.
----- प्रा.डॉ.शिवाजी हुसे
(संपादक - तिफण)
------------------
आपल्या सृजनसोबती परिवाराचे सदस्य, ज्येष्ठ लेखक मित्रवर्य कै.सोपानराव हाळमकर हे कैलासवासी झाले. हे समजून धक्का बसला. पत्नीच्या निधनानंतर ते खूप निराश झाले होते.एकाकी पडले होते.ज्या उजव्या हाताने त्यांनी प्रचंड लेखन केलं, त्यांचा तो हातही त्यांना शेवटच्या काळात गमवावा लागला. उद्विग्न होऊन त्यांनी कवितेतून आपली व्यथा मांडली होती! दोनदा बीडला त्यांच्या घराजवळ जाऊनही त्यांना भेटता आलं नाही,
याचं वाईट वाटतं! नियती कधीकधी खूप क्रूरपणे वागते....
- मिलिंद काटे, (शेवगाव)
------------------
अतिशय वेदनादायी....
आमचा संवाद होत होता,
काही महिनापासून संवाद झाला नाही.
खूप वाईट वाटते.
खूप चांगले महत्वाचे साहित्यिक,
व्यक्ती आणि मित्र होते.
भावपूर्ण श्रद्धांजली....
-अनिल होळकर (बीड)
------------------
भावपूर्ण श्रद्धांजली
मराठी वाङ्मय क्षेत्रातील दमदार लेखणी आज विसावल्याचे दुःख आहेच. वाङमयीन समाजाचे न भरून निघणारे नुकसान सरांच्या जाण्याने झालेय.परमेश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास शांती देवो.
-- वा.ना.आंधळे (चाळीसगाव)
---------------
सरांच्या अनेक कवी संमेलनात कविता ऐकल्या आहेत. महाराष्ट्रात त्याची ख्याती होती.त्यांची व मैत्री होती.अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात कविसंमेलनात त्यांना अनेक वेळा बोलावले होते. एकदा त्यांना कवि संमेलनाचे अध्यक्षपद दिले होते. त्यांची व माझी मैत्री कायम होती.
--- दगडू लोमटे (बीड)
----------------
सोपान हाळमकर हे सशक्त कवितेचे निर्माते होते. प्रसिद्धीलोलूपतेपासून दूर राहून साहित्यसेवा करण्यात ते धन्य मानत.साहित्यमूल्य असलेल्या त्यांच्या रचना सामाजिक स्तरांचे भान आणि जाण असलेल्या आहेत.ज्यावेळी ते भेटत तेंव्हा फक्त साहित्य या विषयावर भरभरून बोलत. मराठी साहित्यावर जीवापाड प्रेम असणारा अवलिया सोपान हाळमकर यांचे जाणे मनाला चटका लावून गेले.
-- डॉ.विठ्ठल जाधव
( बीड)
----------------
दुसर्या एकता मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष असलेले,अत्यंत शांत व संयमी व्यक्तीमत्वाचे धनी,आमचे मार्गदर्शक आदरणीय सोपान हळमकर यांचे दुःखद निधन झाले. ही बातमी कळल्यावर धक्का बसला. लेखनात गुणवत्ता,दर्जा असतांनाही साहित्यिक वर्तुळाकडून दुर्लक्षित झालेल्या सोपानरावांनी आपली लेखनी आणि स्वभाव कधीच टोकदार बनवला नाही हे त्यांचे गुणवैशिष्ट्य म्हणावे लागेल.
कै.सोपान हाळमकरांना एकता कोअर
कमिटीच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
------ अनंत कराड
(बीड)
-----------------
प्रिये तुझ्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नसतात…
या कवितेचे सादरीकरण आज ही कानामनी रूंजी घालतेय.
प्रगल्भ कवितेला मराठी साहित्य विश्व मुकले आहे.
सोपानराव हाळमकर
यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
-----प्रभाकर साळेगावकर.(बीड)
----------------
लेखक सोपान हाळमकर यांचे निधन १ सप्टेंबर रोजी झाले ,मला श्रीकांत देशमुख यांच्या फेसबुक वॉल वरून वाचायला मिळाले आणि आवाकच झालो.नांदेडच्या लेखकाला ही गोष्ट माहीत होते आणि हाळमकरांच्या घरापासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर मी शेतातच असतो, कुठल्याही मीडियावर हाळमकर गेल्याची बातमी आली नाही. वृत्तपत्रातही आली की नाही शंकाच आहे ...आणि मला धक्काच बसला ...मी अस्वस्थ झालो ...गेल्या चार-पाच दिवस मी अस्वस्थ आहे....कारण मी गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून त्यांच्या संपर्कात होतो, त्यांच्या वलसावलीखाली. मी माझी कविता, माझे विचार, साहित्यावरची माझी भूमिका, उघडून घेत होतो.फ.मु. शिंदे,वासुदेव मूलाटे.नागनाथ कोत्तापल्ले,श्रीराम गुंदेकर, भारत सासणे या पिढीचे ते लेखक होते.अतिशय जवळचे माझे गुरुजी, माझ्या जवळून गेले याचं मला दुःख वाटतंय ,हाळमकर अखेरच्या दिवसात आयुष्यावर नाराजच होते ,काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी गेल्या, ते दुःख त्यांना पचवायला अवघड गेलं.त्यातून कसेबसे सावरले आणि त्यानंतर त्यांच्या हाताला ईजा झाली आणि हात शरीरापासून वेगळा करावा लागला....त्यानंतर तर ते व्यासपीठावर यायला नकारच द्यायचे.ते म्हणायचे," मला हे कसंतरी वाटते आणि म्हणून मी व्यासपीठावर आता जात नाही"
तरीही त्यांना मी आग्रह करुन जिल्हा ग्रंथालयाच्या ग्रंथ महोत्सवामध्ये सन्मानाने त्यांचा सन्मान करायला लावला. त्याचबरोबर एकता साहित्य संमेलनाचे संमेलनाअध्यक्षपदही भूषवले. हाळमकर पट्टीचे सशक्त लेखक होते. दूरवर थांबून आपली निरीक्षणं व्यक्त करायचे. थोडेच लिहिले पण श्रीमंतीच लिहिलं.बीड जिल्ह्याच्या वांग्मयीन सोनेरी पानांमध्ये त्यांचं एक पान कोरून गेले.त्यांची दखल साहित्यिकांना वाङ्मयाला घ्यावी लागेल असे मला वाटते .साहित्य संमेलनाची अध्यक्षपद त्यांच्या बरोबरीच्या सुमार दर्जाच्या लेखकांनाही मिळाली, ती यांच्या वाट्याला आली नाही, कारण ते कधीही साहित्यबाह्य गोष्टीमध्ये सहभागी नसायचे. साहित्याच्या नेतृत्वाच्या अवतीभोवती कधी ते मला दिसले नाही आणि म्हणूनही त्या मंडळींच्या नजरेत ते कधी न दिसल्यामुळे साहित्य संमेलनापासून ते दूरच राहिले. हाळमकर आपल्या वाङ्मयाचा दर्जा ईतका उंच आहे की आम्हा सगळ्या खुजा लोकांनासुद्धा पुन्हा पुन्हा आपल्याकडे बघताना मान वर करून बघावे लागेल....
आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली !
---- डॉ.भास्कर बडे
(लातूर)
----------------
0 टिप्पण्या