Ticker

6/recent/ticker-posts

वाहिरा जि.प.प्रा.शाळेला प्रथम क्रमांकाचे ३ लाखाचे बक्षीस

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने " मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा " या अंतर्गत आष्टी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. आपल्या भौतिकेसोबतच, गुणवत्तेमधील परंपरा कायम ठेवत शाळेने शासनाकडून या पुरस्कारातंर्गत ३ लाख रुपयांचे बक्षीस मिळविले आहे. आष्टी तालुक्यातील दुर्गम व जिल्हा सरहद्दीवरती वाहिरा गाव वसलेले आहे.गावामध्ये सध्या जिल्हा परिषदेची १ ली ते ८ वी. पर्यंतची वर्ग असलेली ही शाळा आहे.वाहिरा गावासोबतच घोंगडेवाडी, निमगाव बोडखा,पिंपळगाव दाणी, मेहकरी, सोलापूरवाडी, पारोडी या गावातील विद्यार्थी या शाळेमध्ये प्रवेशित आहेत. सध्या या शाळेचा पट १६८ असून ३ पदवीधर शिक्षक व ४ सहशिक्षक कार्यरत आहेत. शासनाच्या चुकीच्या संच मान्यता धोरणामुळे मुबलक पट असतानाही या शाळेला आणखीही मुख्याध्यापक पद मिळाले नाही.या शाळेमध्ये शासनाद्वारे राबविण्यात येणारे विविध उपक्रम,५ वी. व ८ वी. शिष्यवृत्ती परीक्षा,राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा एन.एम. एम.एस.अशा विविध स्पर्धा परीक्षा मध्ये कायम गुणांकन मिळवत आलेली आहे. यासोबतच परसबाग,खेळांचे मैदान,गांडुळ खत उपक्रम, विविध क्रिडा स्पर्धा,निबंध, वक्तृत्व,भाषण स्पर्धा आदी अनेक सहशालेय उपक्रम घेतले जातात.वाहिरा ग्रामस्थांचा उत्तम सहभाग व सहकार्य सातत्याने लाभत असल्याने, शिक्षकांना दैनंदिन काम करणे आणखी सोयीचे होत आहे. यातुनच शाळेला आजवर जिल्हा,राज्य स्तरावरील ९ पुरस्कार मिळाले आहेत.जिल्हा परिषद बीड द्वारा घेण्यात आलेल्या स्पर्धेत या शाळेच्या विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड झालेली आहे.मागील वर्षी परसबाग स्पर्धेमध्ये देखील शाळेला पहिला क्रमांकाचे बक्षीस मिळालेले आहे.शाळेची भौतिक वातावरण आणखी चांगले व्हावेत यासाठी ग्रामपंचायत व वाहिरा ग्रामस्थ यांनी स्वतः पैसे खर्चून सर्व शाळेची रंगरंगोटी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून यात्रेतील ईतर उपक्रम रद्द करून यात्रेमध्ये शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केला जातो.या शैक्षणिक वर्षात झालेल्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद देत १ लाख ८३ हजार रूपये लोकसहभाग शाळेला मिळाला आहे. वाहिरा ग्रामस्थांचा सातत्यपूर्ण सहकार्य आणि सहभाग मिळत असल्यानेच शाळेची पाऊल पुढं पडत असून, ग्रामीण दुर्गम भागातील ही शाळा जिल्ह्यामध्ये अग्रेसर होत असल्याची भावना येथील शिक्षक बिभीषण कवडे, सत्यवान लगड,शिवाजी खुडे, ज्ञानेश्वर गव्हाणे,सतीश काळे, अकील मोमीन,संतोष शेळके यांनी व्यक्त केली आहे.शिक्षक-ग्रामस्थ यांच्या एकीमुळे शाळेचा वाढता आलेख असल्याने ग्रामस्थानी शिक्षकांचे कौतुक केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याने विविध स्तरांतून शिक्षक व ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या