आष्टीचे माजी आ.भीमराव धोंडे यांचे लहाण बंधु महेश (कडा) साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा शेतकरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष स्व.बापुराव धोंडे यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज सोमवार दि.२१ एप्रिल २०२५ रोजी कीर्तन केसरी ह.भ.प. अक्रुर महाराज साखरे (गेवराई) यांचे सुश्राव्य हरिकीर्तन होणार आहे. रुईनालकोल येथील महेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आवारात सकाळी १० ते १२ यावेळात हरिकीर्तन होणार आहे.यावेळी आजी, माजी आमदार, राजकीय नेते, पदाधिकारी, जि.प.व.पं.स.चे माजी माजी पदाधिकारी, सदस्य,आजी - माजी सरपंच, प्राध्यापक, शिक्षीक, कर्मचारी, परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले.
----------------
शांत,सरळ व संयमी बापुकाका धोंडे या शंकराच्या रुपातील व्यक्तिमत्त्वाच्या अकाली जाण्याने आष्टी तालुका दु:खात बुडाला होता.बीड जिल्हा परिषदेचे तब्बल १० वर्षे सदस्य राहिलेले बापूकाका धोंडे जिल्हा परिषद लोणी गट आणि जिल्हा परिषद हरिनारायण आष्टा गटातून सर्वसामान्य जनतेच्या लोकप्रियतेवर सदस्य म्हणून नेतृत्व करत राहिले. राजकारणातील छक्के पंजे हा त्यांच्या डोक्या बाहेरचा विषय होता.बापुराव आनंदराव धोंडे यांचे एक वर्षापुर्वी निधन झाले.माजी आ.भीमराव धोंडे यांचे लहाण भाऊ म्हणुन बापुकाका धोंडे यांंच्यावर अतिशय प्रेम होते.बापुकाका धोंडे यांना राजकारणातील अनेक पदे धोंडेसाहेबांनी दिले होते.एक शांत,संयमी आणि प्रचंड बंधुप्रेम जपणारा भाऊ अशी बापुकाकांची प्रतिमा जिल्हाभर होती. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर बापुकाकांची मस्करी करीत असत परंतु त्याचा कधीही राग, लोभ न धरत थट्टेथटेतच हजर जबाबी उत्तर ते देत असत.आ.सुरेश धस यांचे मोठे बंधु देविदासआबा धस,माजी आ. साहेबराव दरेकर यांचे कनिष्ठ चिरंजीव उध्दवबापु दरेकर,विजय गोल्हार हे बरोबरच बीडच्या जि.प.सभागृहात सदस्य असल्याने यांंच्यातील थट्टा, विनोद,मस्करी अनेकदा मला पाहायला मिळली होती.निर्मळ मनाचा,मैत्री जपणारा,निगर्वी मोठ्या मनाचा माणुस म्हणुन बापुकाका धोंडे यांची जिल्हाभर ओळख होती.शेतकरी शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमनपद सांभाळताना संस्थेतील हजारो कर्मचाऱ्यांना तात्काळ मदत करणारे चेअरमन अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे.
बापूकाका धोंडे यांच्या या अकाली जाण्याने आष्टी तालुक्यावर दुःखाचे सावट पसरले होते.शिक्षण महर्षि लोकनेते माजी आमदार भीमराव धोंडे यांचे कनिष्ठ बंधु बापूराव धोंडे यांना यहलोकातुन जाऊन आज एक वर्ष होत आहे.जेव्हा बापूरावांचा जन्म झाला तेव्हा काही दिवसातच त्यांच्या मातोश्रींचे दुर्दैवी निधन झाले.या छोट्या बालकाला सांभाळून मोठे करण्याची जबाबदारी त्यावेळी माजी आ.भीमराव धोंडे यांनी आपल्या शीरावर घेतली. अगदी मुलांप्रमाणे आपल्या छोट्या भावाला लाड पुरवून मोठे करताना प्रेम जिव्हाळा,अस्था, माया या सर्व मूल्यांचे दर्शन या धोंडे परिवाराच्यावतीने आदर्शवत ठरले.आपला भाऊ पैलवान व्हावा यासाठी बापुकाकांना धोंडे साहेबांनी कोल्हापूरला तालमीत ठेवले होते.आष्टीत हाॕटेल तयार करुन दिले.व्यावसायात बापुकांकाचे मन रमले नाही.बापुकाकांना मोठा मित्र परिवार होता. शारीरिक व्यायामाकडे बापुकाकांचे दुर्लक्ष हेच मृत्यूचे कारण ठरले.दुर्दैवाने ५८ व्या.वर्षी साध्या सरळ मार्गी,शांत आणि संयमी स्वभावाच्या बापूराव यांचे अकाली जाणे ही नियतीची क्रूरता आहे.स्व.बापुकाका धोंडे हे मनमिळावु,शांत स्वभावाचे,
स्वामीनिष्ठ,सामाजिक कार्यकर्ते आणि प्रयोगशील शेतकरी होते.आपले बंधु मिनिस्टर व्हावेत अशी त्यांची भावना होती.समाजकारण व राजकारणात काम करताना धोंडेसहेब यांच्या राजकीय क्षेत्रातील प्रगतीसाठी नेहमी बापुकाकांनी धडपड,धावपळ केली होती.भीमराव धोंडे यांंच्या आष्टी ते मुंबई आणि आष्टी ते दिल्ली या ऐतिहासिक पदयात्रेत बापुकाकांचा साक्रीय सहभाग होता.महाराष्ट्र पातळीवर नेतृत्व वाढविण्याचे काम बापुकांकानी केले.समाजकारण करत करत राजकारण करा असा एक भाऊ दुसऱ्या भावाला सांगणे ही दुर्मिळ बाब आहे. बापुकाकांनी धोंडेसाहेब यांना मोठे करण्यात मोलाची कामगीरी केलेली आहे.या सर्व आठवणींना आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुन्हा उजाळा मिळत आहे.
सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटत असताना आणि लोकांच्या प्रेमात राहून सुखी जीवनाची वाटचाल करताना धोंडे परिवारावर आलेले बापूंकाकांच्या निधनाच्या माध्यमातून आलेले संकट दुर्दैवी आणि नियतीच्या क्रूरतेचे प्रतिक आहे.आज स्व.बापूराव धोंडे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने आजपर्यंतच्या आयुष्यातील विविध घटना आणि प्रसंगाच्या आठवणींनी परिवारासह मित्रमंडळी आणि नातेवाईकांचे हृदय भरून आले आहे.कर्म हीच पूजा आणि हाच ध्यास निरलस वृत्तीने सतत अभ्यास करीत राहणे,वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करणे,जे करतो तेच बोलणे, बोलणे सोडून काम करणे,काम हाच मंत्र मनी बाळगणे, कामातून जे मोठेपण मिळते ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही.आपल्या प्रचंड कष्ट, परिश्रम,ध्येय,चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर सामाजिक व राजकीय जीवनात सर्वसामान्य जनतेला हक्क मिळवून देण्यात ज्यांनी धन्यता मानली त्या अत्यंत आज्ञाधारक,तितकाच प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाच्या स्व.बापुकाका धोंडे यांच्या अकाली जाण्याने आष्टी तालुका पोरका झाला आहे.
गरिबांना पाहून ज्यांचे हृदय हेलावून जाते त्यास महात्मा म्हणतात.गरिबांचे दुःख पाहून ते दूर करण्यासाठी जे सदैव धडपडतात त्यांना कर्मवीर म्हणतात आणि मित्रांच्या गराड्यात त्यांच्या सुख-दुःखात समरस होऊन सदैव आपले योगदान देणाऱ्या सर्वांच्या लाडक्या दिलखुलास मित्राला ' बापुकाका धोंडे ' म्हणतात.!
भक्ती,शक्ती,युक्ती जीवनात असावी.हाताच्या व कपाळाच्या रेषांवर यश अवलंबून नसते तर आपल्या कष्टावर व निष्ठेवर यश अवलंबुन असते.स्वार्थाने कधीच परमार्थ होत नाही. वारकरी संप्रदाय अंधश्रध्दा सांगत नाही.एखादी व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहचल्यानंतर सर्वांच्याच नजरा त्याने मिळविलेल्या यशोशिखराकडे वळतात मात्र हे यशोशिखर ज्या कष्टाच्या, मेहनतीच्या आणि जिद्दीच्या पायावर उभे असते तो पाया कुणीच पाहत नाही.अनेक यशस्वीतांचा प्रवास हा संकट,व्यथा आणि अडचणींच्या पथावरूनच होत असतो. राजकारण,समाजकारणातुन अनेकजण मोठे झाले. राजकारणातील नेत्यांना घडविणारे घटक यामध्ये बापुकाका येतात.मोठा भाऊ आमदार व्हावा म्हणुन धोंडे साहेबांसाठी रात्रंदिवस तळमळ,धडपड करणा-यामध्ये बापुकाका होते.राजकीय जीवनातील नेतृत्व घडविण्यासाठी पायातील झालेले दगड स्व.बापुकाका होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
'जगताना मरायचेय' हे लक्षात ठेवा किंबहुना अशा प्रकारचा भाव आपल्या आजपर्यंतच्या आयुष्यात प्रत्येक क्षणात जपत आनंदी आणि जिभेवर गोडवा ठेवत.डोकं शांत ठेवून आणि अत्यंत शांत,संयमी आणि रसाळ वाणीतून वयाची ५७ वर्ष प्रमाणिकपणे जगून एक वेगळा आदर्श निर्माण केलेले कै. बापूराव आनंदराव धोंडे यांचे झालेले अकाली निधन म्हणजे 'भर दुपारी सूर्य अस्ताला' गेल्याचे वाटत आहे. माजी आमदार,शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांचे कनिष्ठ बंधू बापूराव आनंदराव धोंडे (वय ५८) यांचे हृदयविकाराने अकाली दुर्दैवी निधन झाले.कै.बापूराव धांडे यांनी अनेक पदे उपभोगली; परंतु कसलाही गर्व अभिमान न बाळगता गोरगरीब,दिनदलीत, दुबळ्या, अनाथ,अपंग, शेतकरी, शेतमजूर, वंचित घटकासह सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत साधेपणाने आणि भोळ्या शंकराच्या रूपातून त्यांनी अक्षरशः आयुष्य समर्पित केले.
माजी आमदार लोकनेते भीमराव धोंडे यांचा प्रत्येक शब्द मानत आणि जगत त्यांनी आपली वाटचाल केली. बापूराव धोंडे यांना महेश (कडा) सहकारी साखर कारखान्याचे १५ वर्षे चेअरमन म्हणून काम करता आले. शेतकरी शिक्षण संस्थेचे संचालक,संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा ते अत्यंत प्रमाणिकपणे राहुल सेवारत राहिले.शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन म्हणून ते लोकप्रियतेकडे सातत्याने अधिकच कक्षेत राहिले. शेतकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन असे कित्येक पदे त्यांनी अत्यंत जबाबदारीने आणि संयमितपणे सांभाळून एक वेगळा आदर्श निर्माण केला.बापुकाका धोंडे हे बीड जि.प.च्या सभागृहात हरिनारायण आष्टा आणि लोणी सय्यदमीर या जि.प.गटातुन दोनवेळा निवडुन आले होते. एक प्रामाणिक माणूस कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे बापूराव धोंडे आहेत. डोकं अत्यंत शांत ठेवून," रसाळ वाणीने" आलेल्या प्रत्येकाकडे त्यांची पाहण्याची दृष्टी होती. व्यावहारिक जीवनात अत्यंत शांतपणे त्यांनी कर्तव्य निभावले.मानवी देह मिळाला त्यातून प्रत्येकाला गोडवाणीने आपलेसे करावे ही त्यांची भावना होती.सज्जनपणा आणि नम्रता त्यांच्या अंगी ठाई ठाई भरलेली होती.विचार दृष्टी आणि कृती श्रेष्ठ पदावर नेते हे त्यांच्या जगण्याचे मर्म राहिले. माजी आमदार लोकनेते भीमराव धोंडे यांच्या माध्यमातून घरामध्ये प्रचंड सुखे लोळत असतानासुद्धा त्याची कसलीही अहंकाराची जाणीव त्यांनी स्वतःला कधीही लागू दिली नाही.महानता आणि लिनता वारकरी संप्रदायातील गुण त्यांनी आयुष्यभर जपला. ऐक्याचा आनंद हा अध्यात्मक असतो ही जाणीव सुद्धा ठेवली आणि म्हणूनच चित्त शुद्ध ठेवून राजकारणातील किळसपणा त्यांनी एक इंच भरही स्वतःला लावून घेतला नाही.माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संस्कारातून हे कुटुंब अत्यंत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समर्पित जीवन जगत असते.सर्वसामान्यांचे छोटे-मोठे नेतृत्व करताना त्यांनी शेतकऱ्यांना काळजाचा तुकडा मानले.भीमराव धोंडे साहेबांच्या आष्टी ते मुंबई आणि आष्टी ते दिल्ली या शेतकऱ्यांच्या पायी मोर्चातसुद्धा बापुरावांनी संपूर्ण प्रवास पायी करून साधेपणाचा आदर्श घालून दिला. अनेकांना आपल्या साधेपणातून जगण्याचा अर्थ दाखवला. जगण्याचा अभिनव मार्ग सुद्धा त्यांनी दिला.जातिपातीची जळमठे झूगारून " माणूस " पणाचा गुणधर्म त्यांनी तंतोतंत पाळला. लोकनेते धोंडेसाहेबांनी दिलेली अनेक पदे त्यांनी तितक्यात जबाबदारी आणि प्रमाणिकपणे सांभाळली. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी अत्यंत प्रेम, जीव्हाळा आणि आस्थेवाईकपणे चौकशी करून आधार दिला.सामाजिक बांधिलकीची भावना त्यांनी प्रत्यक्ष आचरणातून दाखवून दिली.अशा या शांत,सरळ मार्गी, संयमी,मित्तभाषी,गोड शितल वाणी आणि हृदयाच्या सुंदर व्यक्तिमत्वाला नियतीने अखेर गाठले.स्व.बापुराव धोंडे यांच्यापाठीमागे माजी आ.भीमराव धोंडे,कडा कृ.उ. बा.
समितीचे उपसभापती नामदेव धोंडे,राजेंद्र धोंडे आणि ज्ञानदेव धोंडे हे चार भाऊ,पाच बहिणी,एक मुलगा,एक मुलगी, पत्नी असा मोठा परिवार आहे.

स्व.बापुकाका धोंडे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने भावपुर्ण श्रध्दांजली....
.... उत्तम बोडखे
(उपसंपादक)
--------------------------
0 टिप्पण्या