
आष्टी (प्रतिनिधी)
मराठी भाषेला समृद्ध परंपरा आहे.संत ज्ञानेश्वर पासून ते आत्तापर्यंत दर्जेदार साहित्यकृती मराठीतून लिहिल्या आहेत.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने भविष्यात मराठी ज्ञान भाषा होणार आहे असे मत प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी व्यक्त केले.
आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे ऊर्फ बाबाजी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाच्यावतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर भास्कर चव्हाण, उपप्राचार्य प्रोफेसर शंभू वाघुले,उपप्राचार्य डॉ.बापू खैरे,मराठी विभाग प्रमुख डॉ.गोपीनाथ बोडखे व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. विधाते यांनी म्हटले की , कवीश्रेष्ठ कुसुमांग्रज यांच्या जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषिक लोक आहेत त्या ठिकाणी आज मराठी भाषा गौरव दिन सादर करत आहेत.मराठी भाषेत दर्जेदार साहित्य निर्मिती कार्य वि.वा.शिरवाडकर ऊर्फ तात्यासाहेब यांनी केले.त्यांच्या साहित्यकृतीला ज्ञानपीठ पुरस्कारही प्राप्त झाला.आज जगाकडे पहात असताना इंग्रजी भाषेच्या खिडकीतून डोकावे लागत असले तरी मराठी भाषेत गोडवा व लयबद्धता आहे. रंगनाथ पठारे समितीने मराठी भाषेच्या अडीच हजार वर्षांपूर्वीची परंपरा सांगितली तेव्हा केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.मराठी समाज जेवढा प्रगत होईल त्याप्रमाणे मराठी सुद्धा प्रगट होणार आहे.मराठी भाषेत संस्कृती व सौंदर्याचे सुरेख चित्रण पाहावयास मिळते.मराठी भाषेत शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी उच्चपदावर नोकरी करत आहेत.त्यामुळे प्राथमिक शिक्षण हे मराठीतूनच घेतले पाहिजे.मायबोलीतून घेतलेले शिक्षण हे लवकर पचनी पडते किंवा समजण्यास सोपे जाते. आज मराठी भाषेच्या संवर्धनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे तेव्हा सर्व मराठी भाषिकांनी मराठी भाषेचे संवर्धन करणे सर्वांची जबाबदारी आहे.याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. बोडखे यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना म्हटले की, संत ज्ञानेश्वरांनी खऱ्या अर्थाने मराठी भाषेचा पाया रचला असून संत तुकारामादी सर्व संतांनी मराठी भाषा मंदिर उभारणीमध्ये मोठे योगदान दिले.महानुभाव पंथीयानी तर मराठी भाषेचा पुरस्कार करून त्यांनी धर्मातील सर्व तत्त्वज्ञान मराठी भाषेत सांगितले.मराठी भाषेला ऑक्टोबर २०२४ ला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून देशातील वेगवेगळ्या विद्यापीठात मराठी भाषेचे अध्यासन केंद्र सुरू मराठी लेखन व वाचनाला चालना मिळणार आहे.दर्जेदार ग्रंथ निर्मितीस व साहित्य अनुदानास चालना मिळणार आहे.भारतात मराठी भाषा बोलणारांची संख्या चार नबंरला आहे.मराठी भाषा ही केवळ ग्रंथ लेखनाची भाषा नसून अधिकाधिक बोलणाय्रा लोकांची मराठी आहे.तर तिचे संवर्धन होणार आहे यामध्ये क्षंका घेण्याचे कारण नाही.काना,मात्रा,उकार व वेलांटीने भाषेला सौंदर्य प्राप्त झाले असून संस्कृतीतील नीती मूल्य मराठी अभिव्यक्त करते. मराठी कृषी संस्कृतीमध्ये आज मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसत असल्याने जुनी कृषी अवजारे संपुष्टात येत आहेत. त्यामुळे त्या संदर्भातील अनेक मराठी शब्द लोप पावत आहेत असे असले तरी भाषेचे रूप लवचिक आहे अनेक नवीन शब्द आज मराठी भाषेत रूढ झाले आहेत.मराठी भाषेतून मध्ययुगीन कालखंडापासून पुरोगामी विचार अभियुक्त होत आहे.त्यामुळे मराठी भाषा भविष्यात ज्ञानभाषा होणार आहे.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या