आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी - पाटोदा - शिरूर तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेसाठी आष्टी तालुक्यात लवकरच ५०० खाटांचे अद्ययावत कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येईल अशी घोषणा शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले.
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ भगवान महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित गंगाई - बाबाजी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.यावेली माजी मंत्री प्रा.सुरेश नवले,माजी आ.राजेंद्र जगताप,माजी आ.जनार्दन तुपे,ह.भ.प.दिनकर महाराज तांदळे, ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य अनंत हंबर्डे,डॉ.अजयदादा धोंडे,बाबुशेठ भंडारी,कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू श्रीमंत उबाळे,राजेंद्र धोंडे, अभयराजे धोंडे,अशोक साळवे,प्राचार्य डाँ.हरिदास विधाते, प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी बोलताना माजी आ. भीमराव धोंडे म्हणाले की,बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी,कष्टकरी,कामगार वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर तंबाखू,विडी,सिगारेट अशी व्यसने कामाचा शीण घालविण्यासाठी केली जातात.त्यामुळे अनेक नागरिक वयाच्या साठीनंतर कर्करोगाने ग्रस्त होतात.कर्करोगाचे निदान लवकर न झाल्यास व त्यांना चांगले उपचार न मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर रुग्ण दगावतात.हा धोका लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील रुग्णांसाठी सवलतीच्या दरात कर्करोग निदान व उपचार करणारे रुग्णालय सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे आपण आष्टी शहरात पाच मजली अद्ययावत कर्करोग निदान व उपचार रुग्णालयाची लवकरच उभारणी करणार आहोत.त्यासाठी आमचे सर्वस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.त्याचा फायदा अ.नगर आणि बीड जिल्ह्यातील रुग्णांना नक्की होईल.
आपल्या आई-वडिलांची आठवण दरवर्षी यावी म्हणून त्याचबरोबर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे.कला,साहित्य,संस्कृतीचे संवर्धन व्हावे.यासाठी गंगाई - बाबाजी महोत्सव सुरू केला आहे.या महोत्सवाच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक कलावंत,लेखक,साहित्यिक,खेळाडू घडले आहेत.दरवर्षी आपण समाजातील विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या गुणवंतांचा विविध पुरस्कार देऊन सत्कार करतो. विद्यार्थ्यांनो कुठलीही व्यसने करू नका भरपूर अभ्यास करा, व्यायाम करा शरीरयष्टी कमवा.केवळ पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीसाठी सराव करू नका तर विविध स्पर्धेत भाग घ्या.त्या माध्यमातून तुम्हाला मोठे अधिकारी होता येईल आणि आपले जीवन समृद्ध करता येईल असे ते म्हणाले.प्रा.सुरेश नवले म्हणाले कि,नव्या पिढीच्या मनात चांगले विचार रुजविण्यासाठी तसेच बिघडलेली सामाजिक स्थिती बदलण्यासाठी गंगाई बाबाजी सारख्या महोत्सवांची गरज आहे.मायबापांना देवाचे स्वरूप देणारे माजी आ.भीमराव धोंडे हे आदर्श समाज निर्माण व्हावा म्हणून गंगाई - बाबाजी महोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्र ही पुण्यभूमी आहे,वज्र भूमी आहे.महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी हजारो वारकरी आणि मावळे दरवर्षी घराबाहेर पडतात.त्यामुळेच या राज्यात महाराष्ट्र धर्म टिकून आहे.या महाराष्ट्रात ठीक ठिकाणी वेगवेगळे महोत्सव साजरे होतात परंतु आपल्या आई- वडिलांच्या नावाने होणारा आष्टीतील हा एकमेव महोत्सव आहे.गंगाई - बाबाजी महोत्सव हा साहित्यिक व सांस्कृतिक ठेवा आहे.त्याचे यु-टुब च्या माध्यमातून जतन करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.यावेळी माजी आ.राजेंद्र जगताप यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी माजी आ.जनार्दन तुपे,माजी आ.राजेंद्र जगताप,प्राचार्य अनंत हंबर्डे यांचीही भाषणे झाली.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून या महोत्सवाचे उद्घाटन झाले.प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांनी प्रास्ताविक केले.प्रा.डॉ.बाळासाहेब गावडे यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.सूर्यकांत धोंडे यांनी वार्षिक क्रीडा अहवाल सादर केला.प्रा.श्रीकांत धोंडे यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य प्रा.डॉ.ज्ञानदेव वैद्य, उपप्राचार्य प्रा.डॉ.अप्पासाहेब टाळके,उपप्राचार्य प्रा.सुनील भवर,प्रा.डॉ.आबासाहेब पोकळे,


प्रा.डॉ.वंदना घोडके यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थी,विद्यार्थिनी, प्राध्यापक व आष्टीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या