

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील श्रृंगेरीदेवी यात्रेनिमित्त गेलेल्या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या आष्टी आगारातून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र,रविवारी दि.१९ जानेवारी रोजी वेळेत बस न मिळाल्याने बसची वाट पाहात चार तास ताटकळत थांबावे लागले.यामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव येथील शृंगेरी देवी देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून राज्यभर ओळखले जाते. देवस्थानावर वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात. यामध्ये नवरात्र उत्सव आणि पौष पौर्णिमेपासून सुरू होणारा यात्रा उत्सव हे दोन प्रमुख उत्सव साजरे होतात.यंदा पौष सोमवारी दि.१३ जानेवारी पोर्णिमेपासून यात्रेस सुरुवात झाली आहे.१५ दिवस चालणा-या यात्रोत्सवाची पौष अमावस्येला यात्रेचे सांगता होणार आहे.या १५ दिवसांच्या कालावधीमध्ये शृंगेरीदेवी देवस्थानावर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात.त्यामुळे राज्यातील विविध भागांसह तालुकाभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी व कार्यक्रमांसाठी गर्दी करतात.आष्टी शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रृंगेरी देवी गडावर जाणा-या भाविकांच्या सोयीसाठी आष्टी आगारातून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र,रविवारी दि.१९ जानेवारी रोजी सकाळी ११.१५ वाजता फेरीसाठी गेलेली बस परत आल्यानंतर पुन्हा न आल्याने भाविकांची मोठी गैरसोय झाली.सुमारे चार ते पाच भाविकांना बसची वाट पाहात रस्त्यावर उन्हात ताटकळत थांबावे लागले.यामुळे आष्टी आगाराच्या ढिसाळ कारभाराबद्दल भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला.आणखी आठवडाभर यात्रा सुरू राहणार असल्याने आष्टी आगाराने बसेसचे व्यवस्थित नियोजन करून भाविकांची गैरसोय टाळावी अशी मागणी भाविकांनी केली आहे.
चौकट
------------
आष्टी आगाराचे व्यवस्थापक डी.एम.चौधमल यांच्याशी पत्रकराने संपर्क केल्यानंतर ते सुट्टीवर असल्याचे समजले.त्यामुळे सहाय्यक व्यवस्थापक बबन गायकवाड यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सायंकाळी पाच वाजता आष्टी येथून पाठोपाठ दोन बस पाठविल्याने ताटकळलेल्या भाविकांना दिलासा मिळाला.
0 टिप्पण्या