Ticker

6/recent/ticker-posts

उच्चशिक्षित नेट,सेट, पीएच.डी. घेतलेल्या लाडक्या बहिणी व भाऊंचा आत्महत्येचा इशारा!

आष्टी (प्रतिनिधी) सेट,नेट,पीएच.डी.धारक बेरोजगार युवकांची गेल्या १५ वर्षापासून पूर्ण वेळ पदांची कायमस्वरूपी भरती नसल्याने आणि अत्यंत तुटपुंज्या मानधनावर संसार चालवणे मुश्किल झाल्याने तसेच अनेक आंदोलने मोर्चे उपोषण करून थकलेल्या बेरोजगारी युवकांची सहनशीलता संपली असून त्यांनी निवेदनाद्वारे थेट मुख्यमंत्र्यांना आत्मबलिदान करणार असल्याचे निवेदन देत आपली व्यथा व्यक्त करत प्राध्यापक भरतीची अखेरची मागणी केली आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाने अनेक योजना सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. लाडकी बहिण व लाडका भाऊ योजना सुरू केली. मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये गेली १२ वर्षापासून प्राध्यापक भरती सुरळीतपणे सुरू नाही. राज्यातील अकृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयामध्ये ३११८५ पदे (२०१७ च्या वर्कलोड व आकृतीबंधानुसार) प्राध्यापकांची आवश्यकता असताना केवळ २०११८ प्राध्यापक कार्यरत असून राज्यात ११०६७ प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंबलबजावणी व शैक्षणिक गुणवत्तेसाठी राज्यामध्ये प्राध्यापकांची कमतरता आहे.उच्च व तंत्र शिक्षण विभाग व वित्त विभाग तसेच उच्चस्तरीय अधिकार समिती यांच्या अनागोंदी कारभारामध्ये राज्यातील उच्चशिक्षित बेरोजगारांची पिढी भरडली जात आहे.महाराष्ट्र शासनाला तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाला या संदर्भात यूजीसीने देखील वारंवार परिपत्रके देऊन राज्यशासनास प्राध्यापक भरती करण्यासाठी वेळोवेळी जाणीव करून दिली आहे.नेट,सेट पीएचडी धारक संघर्ष समितीने याकरिता अनेक निवेदने,उपोषणे,सत्याग्रह आंदोलने, मोर्चा, पदयात्रा,वारी,भेठी,बैठका यामार्फत न्याय मागण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही.सर्वाचा विचार करणारा मुख्यमंत्री म्हणून आपणाकडून आम्हास मोठ्या आपेक्षा आहेत.आम्ही आमच्या बहीण,भाऊ,पत्नी व आई-वडिलांच्या किमान आशा अपेक्षा देखील पूर्ण करू शकलो नाहीत, ज्यांनी हाडाची काड करून आम्हाला शिक्षण दिले. राज्यातील नेट, सेट,पीएच.डी.धारण करणारा उच्च शिक्षित देखील बेरोजगार ही या पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे. आम्ही सनदशीर मार्गाने अनेक प्रयत्न केले पण आपल्यातर्फे आम्हास न्याय मिळत नाही शेवटचा पर्याय म्हणून आम्ही राज्यातील उच्चशिक्षित बेरोजगार आमच्या सदसदविवेक बुद्धीने निर्णय घेत आहोत की, आपण २५ सप्टेंबर २०२४ च्या अगोदर १०० टक्के प्राध्यापक भरतीचा शासन निर्णय काढा अन्यथा दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या मूळ गावी म्हणजे मौजे दरे,ता.जावळी,जि.सातारा येथे सकाळी ठीक ११ वाजता सामूहिक आत्मबलीदान करणार आहोत.आमच्या आत्महत्येला ही निष्क्रिय व्यवस्था जबाबदार असेल. आमच्या विनाशाला राज्याचे प्रमुख म्हणून आपण स्वतः जबाबदार असाल. या पत्राची एक प्रत राज्याचे राज्यपाल व उच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्राध्यापक पद भरतीच्या याचिकेच्या (RP NO. 2508 OF 2024 ) सुनावणी दरम्यान न्यायालयात सादर केली जाईल याची नोंद घ्यावी या आशयाचे निवेदन नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री,सर्व जिल्हाधिकारी, सर्व सहसंचालक उच्च शिक्षण यांना सामुहिक आत्मबलिदाना साठी परवानगी मागितली आहे... चौकट -------- मुख्यमंत्री यांना निवेदन देताना शिष्टमंडळामध्ये डॉ.संतोष जाधव सर,डॉ.स्वप्नील बोधने सर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली.याशिवाय डॉ. युवराज कठाळे,प्रा.दीपक जाधव,प्रा. विकास गवई यांच्यासह अनेक सेट,नेट,
पीएचडी धारक बेरोजगार उच्चशिक्षित महिला व तरुणांनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या