
आष्टी
आष्टी (प्रतिनिधी)
शेतीसाठी लागणारे नवनवीन अवजारे,जास्त उत्पन्न घेण्यासाठी नवनवीन माहिती कृषी प्रदर्शनामधून मिळते.आज भारतात मोठ्या प्रमाणात अन्नधान्य उत्पादन होते त्यामुळे निर्यात देखील होते. भविष्यात लोकसंख्या प्रचंड वाढल्यास अन्नधान्य टंचाई निर्माण होऊ शकते यासाठी शेती तज्ञांनी प्रचंड प्रमाणात उत्पादन देणाऱ्या नवनवीन पिकांच्या जातींचे संशोधन करावे.कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती मिळते असे प्रतिपादन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन संपर्क कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.मराठवाड्यातील सर्वात मोठ्या व २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या डॉ. स्वामीनाथन दुसऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आ.भीमराव धोंडे यांच्या हस्ते झाले.यावेळी जेष्ठ नेते लालाभाऊ कुमकर,युवानेते अभयराजे धोंडे, चेअरमन राजेश धोंडे,सरपंच सावता ससाणे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,पत्रकार उत्तम बोडखे,बाबु कदम, सदाभाऊ दिंडे,डॉ.डी.बी.राऊत,माऊली बोडखे,प्राचार्य डाॕ.श्रीराम आरसुळ, प्राचार्य साईनाथ मोहळकर,प्राचार्य सुरेश बोडखे,एस.बी.आय.बँकेचे व्यवस्थापक राकेश शाही,मुर्शदपूर ग्रा.पं.सदस्य आदेश निमोणकर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले की,दिवसेंदिवस भारताची लोकसंख्या वाढत चालली आहे त्यामुळे भविष्यात अन्नधान्य,पाणीप्रश्न, महागाई, बेकारी, आरोग्यसेवा, शिक्षण यांसारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल, या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून सरकारने लोकसंख्यावाढ नियंत्रण कायदा लागू करावा म्हणजे लोकसंख्या वाढ आटोक्यात येईल असे मत मांडत लोकसंख्या वाढतच राहिली तर भविष्यात अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल यामध्ये अन्नधान्य, पाणीप्रश्न निर्माण होईल कारण पाऊस कधी आहे तर कधी नाही तसेच इतर अनेक समस्या निर्माण होतील यावर उपाय करण्यासाठी केंद्र सरकारने तज्ञांची समिती गठीत करावी त्यामध्ये प्रत्येक राज्यातील एका तज्ञांचा समावेश करावा. १९४७ साली भारत, पाकीस्तान, बांगलादेश, मॅनमार या सर्वांची मिळून लोकसंख्या ३२ कोटी होती. आज ७५ वर्षात फक्त भारताची लोकसंख्या सुमारे १५० कोटींवर पोहोचली आहे. इतर तीन देशांची मिळून २०० कोटी असु शकते आणखी पुढच्या ८० ते १०० वर्षात हीच लोकसंख्या ८०० ते ९०० कोटीवर जाऊ शकते. परंतु जमिनीचे क्षेत्र मात्र तेवढेच राहणार आहे. त्यामुळे भविष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. वाढत्या लोकसंख्येमुळे संपूर्ण देशाच्या यंत्रणेवर ताण येतो. वाढती महागाई, आरोग्य सेवा, शिक्षण, बेरोजगारी,गरीबी,भूकबळी असे बरेच प्रश्न उभे राहतात.वाढत्या लोकसंख्येमुळे सरकारच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचणे देखील कठीण होते. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रदर्शन पाहुन प्रत्येक वर्षी १० ते २० टक्के शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली तरी शेतकरी प्रगतीशील होईल. डॉ स्वामिनाथन यांनी शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीचा भाव कसा देता येईल यासाठी प्रयत्न केले.त्यांनी शेतीसाठी भरीव कार्य केले. कृषी प्रदर्शनात१५० ते २०० कृषिविषयक स्टाल व १५०० हुन अधिक उत्पादने तसेच खाऊ गल्लीची दुकाने सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञाना ची माहिती मिळणार आहे. या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्पादकांना थेट ग्राहकापर्यंत पोहोचवत अल्प दरात आपली उत्पादने व सेवा लाखों ग्राहकापर्यंत पोचवता येणार आहे. शेतकरी बांधवानां मोफत या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.कृषी मंत्री व पालकमंत्री ना.धनंजय मुंडे,भाजप लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे,आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे तर समारोप अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले व गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.सांगली येथील व देशातील सर्वात उंच ४१ लाख रुपये किमंतीचा खिलार कोसा जातीचा सोन्या बैल प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.चार दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपल्या शेतीसाठी उपयोग करावा असे आवाहन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डाॕ. श्रीराम आरसुळ यांनी केले याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी सांगितले की,कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.अशा प्रकारच्या प्रदर्शनामधून शेती संबंधात आधुनिक माहिती मिळते.एस.बी.आय.बँकेचे व्यवस्थापक राकेश शाही,संयोजक बंडू पाचपुते यांची भाषणे झाली. कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी,शिक्षक व इतर उपस्थित होते.आभार प्रा.ईर्शाद तांबोळी यांनी मानले.
0 टिप्पण्या