Ticker

6/recent/ticker-posts

बीड जि.प.चे माजी सदस्य सतीषमामा झगडे यांनी हवेत गोळीबार केल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला ....................... तीन चोर आष्टी पोलीसांनी पकडले

आष्टी (प्रतिनिधी) घराचा दरवाजा तोडून आत येण्याचा प्रयत्न करत दरोडा घालण्याच्या तयारीने आलेल्या सहा जणांनी सोने नाणे काढून द्या,आरडाओरड करू नका अशा धमक्या देत धिंगाणा घालणे सुरू केल्यानंतर घरमालक बीड जि.प.चे माजी सदस्य माजी सरपंच सतीषमामा झगडे यांनी समयसूचकता दाखवत परवानाधारक रायफलमधून हवेत गोळीबार केल्याने दरोडेखोरांनी तेथून पळ काढला मात्र गस्तीवरील ग्रामस्थांच्या सहकार्याने यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले तर तिघे पसार झाले. याप्रकरणी शुक्रवारी दि. १६ आॕगस्ट रोजी सहा जणांविरुद्ध आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी तालुक्यातील किन्ही व केरूळ परिसरात दरोड्याच्या घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनीही ठिकठिकाणी गस्त सुरू केली आहे.शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथील बीड जि.प.चे माजी सदस्य सतीषमामा झगडे यांच्या घरात सहा चोरट्यांनी हातात कोयता,लोखंडी गज व करवती घेऊन येत दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आरडाओरड न करता घरातील रोकड, दागिने हवाली करण्याची धमकी दिली.मात्र घरमालक सतीषमामा झगडे यांनी वेळीच प्रसंगावधान दाखविले. स्वतःच्या परवाना असलेल्या रायफलमधून हवेत गोळीबार केल्याने चोरट्यांनी तेथून पोबारा केला.दरम्यान,सुसाट वेगाने दुचाकीवरून पळून जाणा-या सहापैकी तीन चोरट्यांना भवरवाडी रस्त्यावर गस्तीसाठी तैनात असलेल्या ग्रामस्थांनी अडविले. या वेळी उर्वरित तीन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले.माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी हजर झाले व त्यांनी पकडलेल्या तीनही दरोडेखोरांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सतीषमामा झगडे यांच्या फिर्यादीवरून नगर जिल्ह्यातील रोहीत शंकर मोरे,किरण गुलाब मोरे, अजय सुखदेव शिंदे, अक्षय पवार,विशाल बर्डे, गुलाब मोरे या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्या रोहित शंकर मोरे,किरण गुलाब मोरे, अजय सुखदेव शिंदे यांना शुक्रवारी आष्टी न्यायालयात हजर केले असता तिघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.पुढील तपास आष्टीचे प्रभारी पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या