Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श विद्यार्थी घडविणारे मुख्याध्यापक तथा प्राचार्य नारायण गवारे सर

वात जळते प्रकाशासाठी चंदन झिजते सुगंधासाठी फुल हसते सुवासासाठी सृष्टी फुलते दुसऱ्यासाठी प्रत्येकाला वाटते..... कुणीतरी जगावे आपल्यासाठी जीवन तर सगळेच जगतात जगून पहावे कधीतरी दुसऱ्यासाठी या चारोळीतील शेवटच्या ओळीतील जगणं किती सुंदर आहे.याचा अनुभव स्वतः घेऊन स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी सदैव जगणारा एक आदर्श व कृतिशील प्राचार्य म्हणून नारायण गंगाधर गवारे यांची आष्टी तालुक्याला ओळख आहे.शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.नारायण गवारे सर म्हणजे मितभाषी,संयमी,अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.शैक्षणिक क्षेत्रातील व जवळचा वाटणारा शिक्षक अशी त्यांची प्रतिमा आहे.आष्टी तालुक्यातील त्यांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे. ते आज मुख्याध्यापक व प्राचार्य या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या छोट्याशा खेड्यागावात शेतकरी कुंटुंबात जन्म झालेले नारायण गवारे सर.. मुलाने खऱ्या अर्थाने आपले शिक्षण पुर्ण करीत आणले की, भविष्याचा विचार सुरू होतो. कुशाग्र बुद्धिमत्तेची मुले अनेक उच्च अभ्यासक्रमाकडे डोळे लावून बसतात.बाकीचे विद्यार्थी आपापल्या ईच्छेप्रमाणे अभ्यासक्रम निवडतात पण गवारे सर शिक्षकी क्षेत्रांमध्ये जातील, शैक्षणिक गुणवत्ता वाढवत शैक्षणिक कार्य करातिल असे वाटत नव्हते परंतु अगदी हृदयामध्ये,मनातल्या अंतर्मनात, शैक्षणिक कार्याची आवड असणारे आणि आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये शैक्षणिक क्षेत्राची परंपरा नसणा-या नारायण गवारे सरांनी आकाशाला गवसणी घातली. दि.१० आॕगस्ट १९६६ साली आई सौ.सुजनाबाई वडील गंगाधर तात्याबा गवारे यांच्या पोटी जन्मलेले गवारे सर यांना त्यांचे आजोबा तात्याबा गवारे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळलेली आहे. आजोबा जुन्या काळातील चौथीपर्यत शिकलेले मात्र त्यांना तत्कालीन पावकी,निमकी,पाढे मुखोद्गत होते.शिक्षणाचे आजोबांना महत्व होते.आई वडील जरी आडाणी निरक्षर असले तरी आजोबांनी गवारे सरला चांगले शिक्षण घे असे सांगत संस्कार केले. सांगवी पाटण येथील जि.प. प्राथमिक शाळेत शालेय शिक्षण घेतले.त्यानंतर माध्यमिक शिक्षण डोईठाण येथील पद्मावती विद्यालयात झाले.महाविद्यालयीन शिक्षण बीड येथील के.एस.के महाविद्यालयात झाले. याच महाविद्यालयात बी.पी.एड. (शारिरीक शास्त्र पदवी) प्राप्त केली.छत्रपती संभाजीनगर येथील देवागिरी महाविद्यालयात एम.ए. मराठी केले.शिक्षण पुर्ण होताच शिक्षण महर्षि लोकनेते भीमराव धोंडे यांच्या शेतकरी शिक्षण संस्थेत जुन १९९३ साली पाटण सांगवी येथील सुदर्शन विद्यालयात सहशिक्षक म्हणुन रुजु झाले.एक सामाजिक अंग (सोशल टच) असलेला धडपडा कार्यकर्ता म्हणुन नारायण गवारे यांच्याकडे पाहिले जाते.धोंडेसाहेब यांनी त्यांना अनेकदा शब्बसकी दिलेली आहे.पाच वर्षे विनाअनुदानीत तत्वावर शैक्षणिक काम केले. निष्ठा,तळमळ आणि कष्टाची तयारी यामुळे त्यांनी संधीचे सोने केले.गवारे सर यांनी इंजिनियर , डाॕक्टर,शिक्षक,प्राध्यापक घडविले आहेत.राम पवार,राजेंद्र भोसले, विठ्ठल झिंजुर्के,प्रकाश खिलारे, कारभारी भोसले,तुकाराम भगत, रोहिदास सातपुते हे वर्ग मित्र आहेत.प्राचार्य या उच्च पदावर असलेले गवारे सर पैठण,पंढरपूर, आळंदी वारी करतात.अध्यात्मिक क्षेत्रात त्यांचे काम आहे.संत सहवास,तिर्थयात्रा हा तर त्यांचा आवडीचाच विषय आहे. सेवाकाळात १९९८ ते २००२ चार वर्षे ज्ञानेश्वर विद्यालयालय देऊळगाव घाट येथे,२००२ ते २००६ चार वर्षे गहुखेल येथील वृध्देश्वर विद्यालय,२००६ - २००७ एक वर्षे विठ्ठल विद्यालय,२००७- २००८ नागतळा येथील नागनाथ विद्यालय,२००८ - २०२१ सलग १३ वर्षे बेलगांव येथील अंबिका विद्यालयात,मातकुळी येथील श्रीकृष्ण विद्यालयात २०२१- २०२३ या काळात सहशिक्षक पदावर उत्कृष्ट कार्य केले आहे. या कार्याची दखल व पदोन्नतीने जुन २०२३ या शैक्षणिक वर्षात पोखरी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदावर काम करण्याची संधी संस्था प्रशासनाने दिली. नारायण गवारे यांना जुन २०२३ रोजी प्राचार्य पद मिळाले.नारायण गवारे सर हे प्राचार्य पदावर राहुन शैक्षणिक कार्याची पावती दिली. सहशिक्षक,मुख्याध्यापक, प्राचार्यपद त्यांनी समर्थपणे सांभाळले.आज १५ आॕगस्ट रोजी त्यांचा सेवापूर्तीनिमित्त सेवागौरव माजी आ.भीमराव धोंडेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली एका समारंभातुन होत आहे.सलग ३१ वर्षे सावलीप्रमाणे खंबीर साथ देणाऱ्या सौ.मंगल नारायण गवारे या दहावी शिकलेल्या असताना आदर्श गृहीणी राहुन आदर्श माता आदर्श सुन या भुमीकेत राहिल्या. विशाल नारायण गवारे याने बारावीनंतर भारतीय नौदल सेनेत प्रवेश केला आहे.देशसेवेची आवड असल्याने तो या क्षेत्रात रममान झाला.उडीशा चिल्का येथे प्रशिक्षण पुर्ण करुन नौदलच्या कुलाबा मुंबई येथील अश्विनी हाॕस्पीटलमध्ये सेवा सुरु केली आहे.विशालला आॕगस्ट २०२४ चा उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरस्कार मिळाला आहे.दुसरा मुलगा कृष्णा नारायण गवारे हा दहावीत शिक्षण घेत आहे.एक कुटुंबवत्सल,परोपकरी,वारकरी विचाराने जीवन जागत असलेले प्राचार्य नारायण गवारे हे आज नियतवयोमानानुसार आज स्वातंत्र्य दिनी ३१ वर्षाचा प्रदिर्घ सेवाकाल पुर्ण करुन सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या सेवापूर्ती सोहळ्यास दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा .... ----- उत्तम बोडखे,आष्टी -------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या