
आष्टी (प्रतिनिधी)
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील भूमिपुत्र अविनाश बाळासाहेब पालवे यांची ऑल इंडिया १४४ रैंक मिळवून केंद्रीय सशस्त्र पोलीस बलामध्ये असिस्टंट कमांडंटपदी नुकतीच निवड झाली आहे.त्याबद्दल आष्टी तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.दरम्यान,या उतुंग यशाबद्दल त्याची जन्मभूमी आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.अविनाश बाळासाहेब पालवे हा सुरुडी येथील रहिवासी आणि आष्टी आगारामध्ये चालक पदावर कार्यरत बाळासाहेब पालवे यांचा तो मुलगा आहे.त्याचे शिक्षण पहिली ते सातवी व आठवी ते दहावीचे राधानगरी विद्यामंदिर राधानगरी (ता.राधानगरी जि. कोल्हापुर) येथे झाले आहे. अकरावी आणि बारावी या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी द न्यू कॉलेज कोल्हापूर येथे त्यांनी अभ्यास केला.बी.टेक.मेकॅनिकल ही पदवी त्याने पुणे येथील एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेतली.त्यानंतर २०२० ते २०२३ या कालावधीत त्याने सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी केली आहे.२०१४ च्या तलाठी भरतीत त्याची तलाठी म्हणून निवड झाली.अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून शिक्षण घेत जिद्द,चिकाटीआणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रचंड मेहनत आणि परिश्रम घेऊन अविनाशची नुकत्याच झालेल्या युपीएससी परीक्षेमध्ये देशातून १४४ रैंक मिळवत केंद्रीय सशस्त्र पोलीस बलामध्ये असिस्टंट कमांडंट या अत्यंत महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती झाली आहे.ही बातमी समजताच आष्टी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले, तर जन्मगाव सुरुडी येथे फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.दरम्यानया प्रचंड यशाबद्दल अविनाश पालवे याचे बीड जिल्हाभरात कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
चौकट
--------
जन्मभूमी सुरुडीत नागरी
सत्काराचे आयोजन!
------------------
-------------
केंद्रीय सशस्त्र पोलीस बलामध्ये असिस्टंट कमांडंट या अत्यंत महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सुरुडीकरांनी अविनाश पालवे याचा भव्य नागरिक सत्कार गुरुवार ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता आयोजित केला आहे.या गुणवंत भूमिपुत्राचा भव्य नागरी सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या कौतुक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
बस चालकाच्या
मुलाची कमाल!
-----------
-------------
युपीएससीमध्ये सिलेक्ट झालेल्या अविनाश पालवे यांचे वडील बाळासाहेब पालवे हे आष्टी बस आगारांमध्ये चालक या पदावर कार्यरत आहेत.त्यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून अविनाशला शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली.यासाठी त्यांनी रात्रंदिवस चालक पदावर प्रमाणिकपणे सेवा केली.या मेहनतीचे फळ अविनाशने आणून दिल्याबद्दल वडील बसचालक बाळासाहेब पालवे यांनी आपल्या कष्टाचे चीज झाले!' अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
----------------------------
0 टिप्पण्या