Ticker

6/recent/ticker-posts

अत्यंत शांत,सज्जन,संयमी, भोळ्या स्वभावाचे शंकर..... .............................................. बापूराव धोंडे यांचे अकाली निधन; आष्टीकरांच्या अश्रूंचा बांध फुटला..! .......................................... माजी आ.भीमराव धोंडे यांचे कनिष्ठ बंधू; ' भर दुपारी सूर्य अस्ताला गेला...'

जगताना मरायचेय' हे लक्षात ठेवा किंबहुना अशा प्रकारचा भाव आपल्या आजपर्यंतच्या आयुष्यात प्रत्येक क्षणात जपत आनंदी आणि जिभेवर गोडवा ठेवत..डोकं शांत ठेवून आणि अत्यंत शांत,संयमी सज्जन आणि रसाळ वाणीतून वयाची ५४ वर्ष प्रमाणिकपणे जगून एक वेगळा आदर्श निर्माण केलेल्या आष्टी येथील बापूराव आनंदराव धोंडे यांचे हृदयविकाराने झालेले अकाली निधन म्हणजे 'भर दुपारी सूर्य अस्ताला' गेल्याचे वाटत आहे.आष्टी,पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघाचे लोकनेते माजी आमदार, शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांचे कनिष्ठ बंधू बापूराव आनंदराव धोंडे (वय ५५) यांचे गुरुवारी पहाटे २ वा. हृदयविकाराने अकाली दुर्दैवी निधन झाले. ही बातमी क्षणात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर आष्टी तालुक्यातील वातावरण अक्षरशः दु:खात बुडून गेले.सर्वत्र दुःख,वेदना आणि गहिवर यासह आश्रूंचा बांध फुटला..बापूराव धांडे यांनी आजपर्यंत अनेक पदे उपभोगली; परंतु कसलाही गर्व अभिमान न बाळगता गोरगरीब, दिनदलीत, दुबळ्या, अनाथ, अपंग,शेतकरी, शेतमजूर,वंचित घटकासह सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत साधेपणाने आणि भोळ्या शंकराच्या रूपातून त्यांनी अक्षरशः आयुष्य समर्पित केले. माजी आमदार लोकनेते भीमराव धोंडे यांचा प्रत्येक शब्द मानत आणि जगत त्यांनी आपली वाटचाल केली.बापूराव धोंडे यांना महेश कडा सहकारी साखर कारखान्याचे १५ वर्षे चेअरमन म्हणून काम करता आले.शेतकरी शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून सुद्धा ते अत्यंत प्रमाणिकपणे राहुल सेवारत राहिले.शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन म्हणून ते लोकप्रियतेकडे सातत्याने अधिकच कक्षेत राहिले. शेतकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन असे कित्येक पदे त्यांनी अत्यंत जबाबदारीने आणि संयमितपणे सांभाळून एक वेगळा आदर्श निर्माण केला.बीड जि.प.च्या सभागृहात म्हणजे मिनीमंत्रालयात १० सदस्य म्हणुन राहिले. हरिनारायण आष्टा आणि लोणी जि.प.गटातुन दोनवेळा निवडुन आले होते.एक प्रामाणिक माणूस कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे बापूराव धोंडे आहेत.डोकं अत्यंत शांत ठेवून,रसाळ वाणीने आलेल्या प्रत्येकाकडे त्यांची पाहण्याची दृष्टी होती. व्यावहारिक जीवनात अत्यंत शांतपणे त्यांनी कर्तव्य निभावले. मानवी देह मिळाला त्यातून प्रत्येकाला गोडवाणीने आपलेसे करावे ही त्यांची भावना होती. सज्जनपणा आणि नम्रता त्यांच्या अंगी ठाई ठाई भरलेली होती. विठ्ठलाच्या नामस्मरणात मानवी देहाची सुख असते ही पूर्ण जाणीव ठेवून त्यांनी अध्यात्माशी सौदाह्रयपुर्ण संबंध ठेवले.उत्तम विचार दृष्टी आणि कृती श्रेष्ठ पदावर नेते हे त्यांच्या जगण्याचे मर्म राहिले.माजी आमदार लोकनेते भीमराव धोंडे यांच्या माध्यमातून घरामध्ये प्रचंड सुखे लोळत असतानासुद्धा त्याची कसलीही अहंकाराची जाणीव त्यांनी स्वतःला कधीही लागू दिली नाही. 'अहंकाराचा वारा न लागो राजसा' ही भावना त्यांनी सातत्याने जपली. मृदंगाच्या आवाजाने गोड लहरी निर्माण होतात तसे त्यांचे जीवन गोड स्वभावाने सातत्याने तुडुंब भरून राहिले. जीवनातला अहंकार घालवत हा अहंकार साधेपणातून गोड शब्दातून त्यांनी जपला.महानता आणि लिनता वारकरी संप्रदायातील गुण त्यांनी आयुष्यभर जपला. ऐक्याचा आनंद हा अध्यात्मक असतो ही जाणीव सुद्धा ठेवली आणि म्हणूनच चित्त शुद्ध ठेवून राजकारणातील किळसपणा त्यांनी एक इंच भरही स्वतःला लावून घेतला नाही.माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संस्कारातून हे कुटुंब अत्यंत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समर्पित जीवन जगत असते.सर्वसामान्यांचे छोटे-मोठे नेतृत्व करताना त्यांनी शेतकऱ्यांना काळजाचा तुकडा मांनले.भीमराव धोंडे साहेबांच्या आष्टी ते मुंबई आणि आष्टी ते दिल्ली या शेतकऱ्यांच्या पायी मोर्चातसुद्धा बापुरावांनी संपूर्ण प्रवास पायी करून साधेपणाचा आदर्श घालून दिला.अनेकांना आपल्या साधेपणातून जगण्याचा अर्थ दाखवला.जगण्याचा अभिनव मार्ग सुद्धा त्यांनी दिला. जातिपातीची जळमठे झूगारून माणूसपणाचा गुणधर्म त्यांनी तंतोतंत पाळला; तर गुणवत्ता कष्ट हा संदेश त्यांच्या रूपाने तालुक्याला मिळाला.लोकनेते धोंडेसाहेबांनी दिलेली अनेक पदे त्यांनी तितक्यात जबाबदारी आणि प्रमाणिकपणे सांभाळली.आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी अत्यंत प्रेम, जीव्हाळा आणि आस्थेवाईकपणे चौकशी करून आधार दिला. सामाजिक बांधिलकीची भावना त्यांनी प्रत्यक्ष आचरणातून दाखवून दिली.अशा या शांत, संयमी,मित्तभाषी,गोड शितल वाणी आणि हृदयाच्या सुंदर व्यक्तिमत्वाला नियतीने अखेर गाठले. 'जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला!' ही संत सज्जनांची ऊक्ति पुन्हा एकदा पाहायला मिळाली. बापुराव धोंडे यांच्यापाठीमागे माजी आ.भीमराव धोंडे,कडा कृ.उ.बा.समितीचे उपसभापती नामदेव धोंडे,राजेंद्र धोंडे आणि ज्ञानदेव धोंडे हे चार भाऊ,पाच बहिणी,एक मुलगा,एक मुलगी,पत्नी असा मोठा परिवार आहे. अत्यंत शांत,सज्जन, संयमी बापुराव धोंडे या शंकराच्या रुपातील व्यक्तिमत्त्वाच्या अकाली जाण्याने संबंध आष्टी तालुका दु:खात बुडाला. बीड जिल्हा परिषदेचे तब्बल १० वर्षे सदस्य राहिलेले बापूराव धोंडे जिल्हा परिषद लोणी गट आणि जिल्हा परिषद हरिनारायण आष्टा गटातून सर्वसामान्य जनतेच्या लोकप्रियतेवर सदस्य म्हणून नेतृत्व करत राहिले. राजकारणातील छक्के पंजे हा त्यांच्या डोक्या बाहेरचा विषय होता.बापुराव आनंदराव धोंडे यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले.माजी आ.भीमराव धोंडे यांचे लहाण भाऊ म्हणुन बापुराव धोंडे यांंच्यावर अतिशय प्रेम होते.बापुराव धोंडे (काका) यांना राजकारणातील अनेक पदे धोंडेसाहेबांनी दिले होते.एक शांत,संयमी आणि प्रचंड बंधुप्रेम जपणारा भाऊ अशी बापुकाकांची प्रतिमा जिल्हाभर होती. राजकीय,सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर बापुकाकांची मस्करी करीत असत परंतु त्याचा कधीही राग, लोभ न धरत थट्टेथटेतच हजर जबाबी उत्तर ते देत असत.आ.सुरेश धस यांचे मोठे बंधु देविदासआबा धस,माजी आ.साहेबराव दरेकर यांचे कनिष्ठ चिरंजीव उध्दवबापु दरेकर,विजय गोल्हार हे बरोबरच बीडच्या जि.प. सभागृहात सदस्य असल्याने यांंच्यातील थट्टा,विनोद,मस्करी अनेकदा आम्हांला पाहायला मिळली होती.निर्मळ मनाचा,मैत्री जपणारा,निगर्वी मोठ्या मनाचा माणुस म्हणुन बापुराव धोंडे यांची जिल्हाभर ओळख होती.शेतकरी शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमनपद सांभाळताना संस्थेतील हजारो कर्मचाऱ्यांना तात्काळ मदत करणारे चेअरमन अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे. बापूराव धोंडे यांचे जन्मगाव रुईनालकोल येथील वैंकुठधामात गुरुवारी सकाळी ११ वा.अंत्यविधी करण्यात आला.यावेळी राजकीय, सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.बापूराव धोंडे यांच्या या अकाली जाण्याने आष्टी तालुक्यावर दुःखाचे सावट पसरले आहे. धोंडे परिवार कुटुंबीयांच्या या दुःखात दैनिक झुंजारनेता परिवार सहभागी आहे. बापूराव धोंडे यांना अत्यंत जड अंतकरणाने भावपुर्ण श्रध्दांजली .!! ---- उत्तम बोडखे (आष्टी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या