



आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील छत्रपती शाहु,फुले,
आंंबेडकर कृषी महाविद्यालयात ग्रामीण शेतकऱ्यांची मुले आहोत.आपण सद्यस्थितीतील वातावरणामध्ये शारीरिक बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्मनातील आंतरिक सौंदर्याचा शोध घ्यावा आणि त्या सौंदर्याच्या प्राबल्यावर लक्ष केंद्रित करून अफाट कर्तृत्व गाजवावे.ज्यायोगे सर्वांचे लक्ष तुमच्याकडे आकर्षित होईल.आपण शेतकऱ्यांची मुले असल्यामुळे कष्टकरी आई-वडिलांची आठवण ठेवून आपले भवितव्य घडवावे असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांनी केले.
आष्टी येथील छत्रपती शाहू, फुले,
आंबेडकर कृषी महाविद्यालयात युवा नेते डॉ. अजयदादा धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असणाऱ्या व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आ.भीमराव धोंडे हे होते.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सुरू केलेली शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था आहे. या कृषी महाविद्यालयातून कृषी विषयक संशोधन करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळावे आणि त्याद्वारे शेतकरी आर्थिक दृष्ट्या संपन्न व्हावा असे प्रयत्न या विद्यार्थ्यांनी करावेत असे आवाहन शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे,कल्याण ठोंबरे,
प्रशासन अधिकारी डाॕ.डी.बी.राऊत ,
प्राचार्य डाॕ.श्रीराम आरसुळ ,प्राचार्य साईनाथ मोहोळकर हे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहु,
फुले,आंंबेडकर कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थ्थी समीक्षा क्षीरसागर,सुप्रिया बडे, जयदीप मोरे,हनुमंत धोंडे,मच्छिंद्र राऊत आणि एस.ई.तरटे यांनी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन नौकरीत आल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना डॉ.संजय कळमकर म्हणाले की,आपण विद्यार्थी दशेत असून सध्याच्या युगामध्ये आभासी जगात वावरत आहोत.प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांमुळे आपणास जगातल्या सुंदर सुंदर स्त्रियांचे दर्शन होत असल्यामुळे आपण आपल्या आईला देखील कुरूप आहे असे समजायला लागलो आहोत परंतु जगात सर्वात सुंदर कोण आहे तर ती आपली आई आहे.जगातील सर्व जण,मित्र, इतर लोक ,समाज आपली फसवणूक करतील मात्र आपण कितीही वाईट वागलो तरी आपणास डोळे झाकून शेवटी आई-वडीलच सांभाळून घेणार आहेत.आपण आपले ध्येय गाठताना कधी विचलित झालो तर शांतपणे दोन मिनिटे डोळे झाकून विचार करून आई आणि वडील या दोन आकृती समोर आणाव्यात. त्यांनी केलेले परिश्रम समोर आणावेत त्यांनी शेतात केलेले कष्ट याची जाणीव ठेवून आपण आपले भवितव्य घडवण्यासाठी कठोर परिश्रम करावेत. आभासी जगामध्ये शरीराच्या बाह्य सौंदर्यपेक्षा आपल्या अंतर्मनातील सौंदर्याचा शोध घ्या. आपल्यातील अंगभूत कला कौशल्याचा शोध घ्या ते विकसित करण्यासाठी कठोर परिश्रम करून आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगून विद्यार्थ्यांनी आपणांसमोर आपापल्या आवडीनुसार आदर्श ठेवावेत परंतु हे आदर्श ठरवताना त्या आदर्श व्यक्तीत्वाची संपूर्ण माहिती घ्यावी असे सांगून सलमान खान हा अभिनेता कोणाचातरी आदर्श असू शकतो कारण त्याचा अभिनय त्याची शरीर प्रकृती यामुळे तो आदर्श ठरू शकतो परंतु या सलमान खानने नशेमध्ये वाहन चालवून फुटपाथवर झोपलेल्या सहा गरीब लोकांचा बळी घेतला. पोलीस केस मात्र त्याच्या चालकावर झाली मात्र त्याचा अंगरक्षक असलेल्या पाटील नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने न्यायालयामध्ये साक्ष देताना सलमान खान हाच वाहन चालवत होता अशी साक्ष दिली मात्र त्यानंतर हा पोलीस कर्मचारी पाटील अनेक दिवस गायब होता दोन-तीन वर्षानंतर फूटपाथवर अत्यंत दयनीय अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.हे भीषण वास्तव आपण लक्षात घ्यावे आणि आपण आपला आदर्श ठरवावा असे असे सांगताना कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे
" एक होता कार्निव्हर " हे पुस्तक वाचावे त्यामध्ये कार्निव्हर नावाचा हा अमेरिकेतील निग्रो गुलामाचा मुलगा कुपोषित असा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणारा मुलगा होता मात्र त्याने कृषी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन कृषी विभागामध्ये शेंगादाणा यावर संशोधन करून शेंगदाण्याचे तेल, शेंगदाण्याचे दूध यासह इतर ३०० उत्पादने विकसित करण्याचे संशोधन केले आणि कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल केला आहे याचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा असे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर आवाहन केले. ते पुढे म्हणाले की,मुलांचे मुलींचे प्रेम होत असते इतिहासात देखील बाजीराव आणि मस्तानी यांची प्रेमकहानी अजरामर झाली मात्र बाजीराव हा प्रचंड पराक्रमी होता आणि मस्तानी ही अत्यंत सौंदर्यवती होती अर्थात हा विषय म्हणजे कर्तृत्वाने सौंदर्यावर केलेले प्रेम होते तर सौंदर्याने कर्तृत्वावर केलेले प्रेम होते सध्याच्या काळातील प्रेमी आपल्या प्रेमिकाला म्हणतो आपण पळून जाऊ मात्र पळून जाताना तो तुझ्या आईची दागिने आणि वडिलांचे पैसे घेऊन ये असे सांगतो असा फुकट्या प्रेमी काहीकामाचा नसतो.. कर्तुत्व शून्य प्रेमी कशाकरता आयुष्यभर सांभाळायचा ? असा विचार मुलींनी करावा. समाज माध्यमांच्या आभासी जगामध्ये इस्टाग्रामवरून असे अप्रिय प्रकार सुरू आहेत. खोटे नाटे सांगून महाराष्ट्र राज्यातील मुलींना फसवण्याचे अनेक प्रकार समोर दिसून आलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी ज्या उद्देशाने आपल्या कष्टकरी शेतकरी असलेल्या आई-वडिलांनी आपल्याला या ठिकाणी पाठवले आहे त्याची जाणीव ठेवून आपण आपले ध्येय निश्चित करावे. त्यासाठी प्रचंड परिश्रम करून यश संपादन करावे असे आवाहन देखील त्यांनी शेवटी केले माजी आ.भीमराव धोंडे पुढे बोलताना म्हणाले की, मी शालेय जीवनामध्ये गावापासून कड्यापर्यंत ९ कि.मी.पायी चालत होतो. याची जाणीव ठेवून मी शेतकरी संघटना चालवत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जाणवेतून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक संस्था सुरू केल्या त्याकाळी माझ्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी शाळेसाठी आपापल्या जमिनी उपलब्ध करून दिल्यामुळे आज अनेक ठिकाणी शाळा सुरू करता आल्या. छत्रपती शाहू महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले आणि राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी गोरगरीब जनतेसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन आपण या कृषी महाविद्यालयास या महामानवांचे नाव दिले असून येथील शेतकऱ्यांच्या असलेल्या मुलांनी शेती क्षेत्रात विविध फळ पिकांवर संशोधन करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल अशा प्रकारचे संशोधन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल अशा प्रकारचे भरीव कार्य करावे अशी आपली अपेक्षा असल्याचे सांगून यावर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन आठ विद्यार्थी यशस्वी झाले.त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केला मात्र येथील शंभर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केल्यास त्यांना विशेष विमानाने दिल्ली येथे जाऊन लाल किल्ल्यासमोर त्यांचा सत्कार करण्याची आपली तयारी आहे असे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम अडसूळ यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॕ.बाळासाहेब खेमगर यांनी तर प्राध्यापक काळे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या