Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग कर्मचारी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली "दिव्यांग दूत" म्हणून काम करणार .................... राजेंद्र लाड

आष्टी (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिल्यानुसार बीड जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ - मुंडे यांनी लोकसभा निवडणूक कामातून दिव्यांगांना वगळले आहे. तिव्र दिव्यांगत्व नसलेले पण त्यांच्या स्वइच्छेने काम करु शकणारे दिव्यांग बांधव बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक किंवा दोन " पीडब्लूडी मतदान कक्ष " अर्थात " स्वावलंबी मतदान कक्ष" तयार करण्यात येवून संबंधित कक्षामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून काम करणार आहेत. दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हा,तालुका पदाधिकारी व सदस्य आता आपल्या मतदान असलेल्या मतदान केंद्रावर इतर दिव्यांगांना मतदान करण्यास प्रवृत्त करणार आहेत. त्यांना मतदान केंद्रावर मतदान करण्यास येण्यासाठी सोयी उपलब्ध करुन देणार आहेत. यासाठी ते आपल्या मतदान केंद्रावर दि. १३ मे २०२४ रोजी "दिव्यांग दूत" म्हणून काम करुन राज्यात एक आगळेवेगळे राष्ट्रीय कार्य करुन निवडणूक विभागास हातभार लावणार आहेत अशी माहिती दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा दिव्यांग मतदार बीडचे राजदूत राजेंद्र लाड यांनी दिली आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. जगातील सर्वात यशस्वी लोकशाही म्हणून आपल्या भारत देशाकडे पाहिले जाते. ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजे मतदारांचा मोलाचा सहभाग आहे. कारण मतदारच आपल्या मतदानाव्दारे लोकप्रतिनिधींची निवड करत असतात. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा पवित्र हक्क आहे. लोकशाही प्रबळ, मजबूत व भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. मतदान करणे सुद्धा देशसेवेचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे आहे. किंबहूना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो. मतदानानिमित्त सुट्टी आहे. या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया. हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होतात.पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका - एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभिर्याने लक्षात घ्यायला हवी. विशेष बाब म्हणजे निवडणूक आयोगाकडून दिव्यांग बांधवांची मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले गेलेले आहेत. निवडणूकीत मतदानासाठी दिव्यांग बांधवांसाठी वेगवेगळ्या सुविधाही निवडणूक आयोग पुरविणार आहे. दिव्यांग बांधवांनी व नवमतदारांनी आता होणाऱ्या निवडणूकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावून एक सार्वभौम शक्तीशाली लोकशाही राष्ट्र उभारण्यास आपले मतदानाच्या स्वरुपात सहकार्य लाभावे हीच अपेक्षा. तद्नुसार निवडणूक विभाग दिव्यांगांचे शंबर टक्के मतदान होण्यासाठी वेगवेगळ्या सोयी उपलब्ध करुन देणार आहे. परंतु अनेक दिव्यांग बांधवांना चलनवलनास खुपच अडचण निर्माण होत असते. त्यामुळे त्यांच्यात न्युनगंड निर्माण झालेला असतो. यासाठी त्यांच्यातील न्युनगंड दूर करुन त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे याकामी बीड जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या संघटना व त्यांचे पदाधिकारी आपआपल्या मतदान केंद्रावर इतर सर्व दिव्यांगांचे मतदान करुन घेण्यासाठी पूर्णवेळ "दिव्यांग दूत" म्हणून राष्ट्रीय कार्यास सहकार्य करणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचारी, दिव्यांग सुक्षिशित बेरोजगार अशा वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृतीसाठी प्रत्यक्ष भेटी घेवून, फेसबुक, व्हाँटसअप आदी प्रसार माध्यामाद्वारे प्रचार व प्रसार करत आहेत. या राष्ट्रीय कार्यासाठी बीड चे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ - मुंडे यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, विविध दिव्यांग संघटनेचे जिल्हा, तालुका पदाधिकारी यांच्या सहकार्याने "दिव्यांग दूत" म्हणून काम करणार असल्याचे जिल्हा नियंत्रण दिव्यांग मतदार समितीचे सदस्य तथा राजदूत राजेंद्र लाड यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या