

आष्टी (प्रतिनिधी)
भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना या युतीतर्फे
संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करणार असून बीड लोकसभा मतदार
संघांमध्ये भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना या युतीचे उमेदवार म्हणून
आपण बीड लोकसभा मतदार संघातुन निवडणूक लढविणार आहोत अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे
त्रिदल सैनिक सेवा संघ संस्थापक अध्यक्ष अंकुश रामभाऊ खोटे यांनी दिली. आष्टी येथील
त्रिदल सैनिक सेवा संघ कार्यालयामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत
होते.यावेळी त्यांच्यासोबत त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव
नवनाथ झगडे,सहसचिव बबन दहिफळे,आष्टीचे शहराध्यक्ष श्रीराम माने,आष्टी तालुकाध्यक्ष
नवनाथ भगत,संचालक मनीष नरवडे, संचालक जनार्दन धनवडे, कैलास पारखे आदि उपस्थित होते.
उमेदवारीबाबत अधिक माहिती देताना अंकुश खोटे पुढे म्हणाले की, शेतकरी संघटनेचे
राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील आणि भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय
अध्यक्ष नारायण अंकुशे यांचे मार्गदर्शनाखाली भारत देशामध्ये ३४८ लोकसभा मतदार
संघांमध्ये उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये २२ लोकसभा
मतदार संघांमध्ये या युतीतर्फे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत अशी माहिती देऊन
स्वतःविषयी बोलताना अंकुश खोटे म्हणाले की, आपण १९८४ ते २०१० या कालावधीमध्ये सैन्य
दलामध्ये देशसेवा केलेली आहे. या कालावधीमध्ये हिमाचल प्रदेश,लेह, जम्मू-काश्मीर,
सिक्कीम, राजस्थान,अरुणाचल प्रदेश,उत्तर प्रदेश या ठिकाणी काम केलेले आहे. त्रिदल
सैनिक सेवा संघ या संघटनेच्या महाराष्ट्रभर ९३६ ठिकाणी शाखा कार्यरत असून या
संघटनेतर्फे शहीद वीर माता,वीर पत्नी,माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्याचे अखंडपणे
काम सुरू आहे.आजवर ८६४ माजी सैनिकांच्या समस्यां आम्ही संघटनेद्वारे सोडवल्या आहेत
असे सांगीतले.भारतीय राजकारणामध्ये जय जवान जय किसान मिशन - ५४३ लोकसभा अंतर्गत
भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटना यांचे संयुक्त उमेदवार म्हणून भारतीय
राजकारणामध्ये बदल घडवणार आहोत. देशाच्या विकासासाठी, शांतीसाठी,शहीद सैनिकांच्या
सन्मानासाठी आणि तिरंग्याची शान राखावी यासाठी आम्ही निवडणूक लढवणार आहोत असे सांगत
महागाई कमी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव,बी-बियाणे, खते यावर सबसिडी,
कर्जमाफी,दुधाला हमीभाव, सोलर पंप या द्वारे शेतकऱ्यांची सेवा करणार आहोत. युवकांना
रोजगार मिळावा यासाठी, महिलांसाठी महिला सन्मान, सुरक्षा आणि महिलांच्या
रोजगारासाठी ५००० कोटी रुपयांचे बजेट उपलब्ध करून देणार आहोत. सैनिकांसाठी वन रँक
वन पेन्शन,प्रत्येक तालुक्यामध्ये सीएसडी कॅन्टीन आणि जुनी पेन्शन लागू करण्यात
येईल आणि सर्वसामान्य जनतेसाठी जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च
न्यायालय एकेका वर्षात निकाल घेण्याची तरतूद, सर्व बेघर कुटुंबांना घरकुल, तरुणाईची
व्यसनमुक्ती, देशात शांती आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि
सर्वात महत्त्वाचे म्हणजे खासदार आणि आमदार यांची पेन्शन बंद केली जाईल.
शेतकरी,सैनिक आणि कामगार वर्गाच्या मुलींच्या लग्नासाठी ५० हजार ते दोन लाख रुपये
तरतूद करण्यात येईल असे आश्वासन आमच्या भारतीय जवान किसान पार्टी या पक्षाच्या
जाहीरनाम्यामध्ये उल्लेख असल्याचेही अंकुश खोटे यांनी सांगितले. बीड जिल्हा हा
अत्यंत जागृत मतदार असलेला जिल्हा असून या ठिकाणी यापूर्वी धक्कादायक निकाल लागलेले
असून बीड लोकसभा मतदार संघांमध्ये मी मतदार जनतेला आवाहन करतो की,गिफ्ट बॉक्स हे
माझे निवडणूक चिन्ह असून मतदानाचे गिफ्ट दिल्यास मी अत्यंत प्रामाणिकपणे रिटर्न
गिफ्ट मतदाराला देईल असेही खोटे यांनी शेवटी सांगितले.
0 टिप्पण्या