Ticker

6/recent/ticker-posts

पूर्वीप्रमाणे तमाशा रसिक राहिले नसल्याची खंत! ---------------------------------------- कला हेच जीवन मानणाऱ्या समाजात कलावंतच संपण्याच्या मार्गावर; राजाश्रयाची गरज ---------------------------------------- मंगला बनसोडेसह नितीनकुमार बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळातील कलावंतांच्या वेदना

उत्तम बोडखे,आष्टी. ----------------- महाराष्ट्राला लोककलेची फार मोठी परंपरा आहे.प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक काळातील लोककलेचे व्यापक स्वरूप इतिहास साक्ष आहे.गेल्या काही शतकामध्ये समाज परिवर्तनाचे साधन म्हणून लोककलेला महत्त्वाचे अंग होते.परंतु दुर्दैवाने गेल्या काही काळामध्ये घरात टीव्ही संच आणि मोबाईलने जागा घेतल्यापासून या लोककलेला वाईट काळ आल्याचा अनुभव येत आहे अशी खंत तमाशा कलावंतांनी बोलून दाखवली.बीड नगर राज्य रस्त्यावर आष्टी येथे मंगला बनसोडेसह नितीनकुमार बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळातील कलावंत आपल्या दोन बसेससह काही क्षण थांबले होते.यावेळी मॉर्निंग वाक करत असलेल्या पत्रकार बांधवांनी त्यांच्याशी संवाद साधला.या व्यवसायाच्या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी दुर्दैवी इतिहास कथन केला.मागील काळामध्ये कलावंतांची पाठराखण करणारा आणि त्यांच्या कलेला दाद देणारा फार मोठा रसिक वर्ग होता त्यामुळे कला सादर करण्यात प्रचंड आनंद आणि उत्साह होता परंतु गेल्या काही वर्षापासून याकडे निरुत्सहाने बघण्याची मानसिकता समाजामध्ये आहे. प्रचंड कष्ट करून कलावंत घडत असतो परंतु या कलेला राजाश्रय मिळत नाही आणि समाजातून रसिक वर्गही मिळत नाही त्यामुळे हा कलावंत उपासमारीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची खंत आणि वेदना या कलावंतांनी यावेळी मांडल्या. वाहन ट्रक,जीप आणि साधनांचा खर्चही मोठा असल्याने त्या तुलनेत उत्पन्न अत्यल्प असल्याचे वास्तव आहे.दरम्यान ज्या महाराष्ट्राला लोककलेची प्रचंड मोठी परंपरा आहे त्याच महाराष्ट्रात " कला हेच जीवन " मानणाऱ्या व्यवस्थेत कलावंत संपण्याच्या वाटेवर असल्याची अत्यंत दुर्दैवी भीती यावेळी मंगला बनसोडे सह नितीन बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळातील जेष्ठ कलावंतांनी व्यक्त केली आहे. चौकट ------- राजाश्रयाची गरज! ----------------- गेल्या काही शतकामध्ये लोककलेला समाज व्यवस्थित प्रचंड मान सन्मानाचे स्थान होते त्यामुळे फार मोठा रसिक प्रेक्षक वर्ग लोकनाट्य तमाशा मंडळ मध्ये पाहण्यासाठी गर्दी करायचा त्यातून फार मोठी आर्थिक प्राप्ती ही व्हायची आणि कलावंत मोठ्या उत्साहाने आपला कला सादर करण्यात व्यस्त असायचा परंतु आज काल रसिक प्रेक्षक दुरावल्याने राजाश्रयाची फार मोठी गरज असल्याची मागणी लोकनाट्य तमाशा मंडळातील कलावंतांनी यावेळी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या