
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील भगवान महाविद्यालयात शनिवार दि.४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि आष्टी येथील भगवान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक माजी आ. भीमराव धोंडे हे होते.त्यांच्या हस्ते पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.यावेळी महाविद्यालयातील बी.ए., बी.एस्सी.,बी.कॉम. बी.सी.एस.,एम.ए.आणि एम.एस्सी.च्या बहुतांश विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या हस्ते पदवी प्राप्त केली.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी आ.भीमराव धोंडे यांनी आजच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे,महाविद्यालयाकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन यावर सविस्तर भाष्य केले.माजी आ.
धोंडे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे व भावी जीवनाकडे बारकाईने लक्ष देऊन निवडलेल्या क्षेत्रांमध्ये मन लावून काम करावे. महागडे मोबाईल अनावश्यक आहेत.फेसबुक व अन्य सोशल मीडियाचा अतिवापर याला त्यांनी 'जीवन वाया घालवायची कला'असं म्हटलं.सकाळी पाच वाजता उठून ग्राउंडवर व्यायाम करणाऱ्या विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थिनींचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि त्यांच्यापासून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी आपल्या लहानपणीचे शिक्षणाविषयीचे अनुभवही विद्यार्थ्यांसमोर मांडले.यावेळी पारधी समाजाच्या मुलांसाठी कुठलेही शासकीय अनुदान नसताना शिक्षणाविषयी विशेष काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सुधीर भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून विचारपीठावर उपस्थित होते त्यांनीही शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे आपले विचार व अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी करून या पदवी प्रदान कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब गावडे यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ.ज्ञानदेव वैद्य यांनी केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्या समवेत विद्यार्थ्यांचे विद्यापीठ ध्वजसंचलन महाविद्यालय गेटपासून सभागृहापर्यंत करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यापीठ गीताने तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन उपप्राचार्य डॉ. आप्पासाहेब टाळके व उपप्राचार्य डॉ.ज्ञानदेव वैद्य यांनी केले.त्यांना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमानंतर लगेच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघाच्यावतीने माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक डॉ.शत्रुघ्न करडूळे हे होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांनी माजी विद्यार्थी संघामध्ये सक्रियपणे काम करून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या परीने महाविद्यालय विकासामध्ये योगदान देण्याचे आवाहन केले आणि किमान वर्षातून दोन वेळा तरी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्याचे सूचित केले.माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक डॉ.शत्रुघ्न करडुळे यांनी बोलताना माजी विद्यार्थी संघाची रचना,कार्यपद्धती व नवीन कार्यकारिणीच्या संदर्भात सूचना मांडल्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक डॉ.शत्रुघ्न करडुळे आणि सचिव काकासाहेब सोले यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या