उत्तम बोडखे,आष्टी.
-------------
गेल्या ७० वर्षात मराठा आरक्षणासाठी काहीच झालं नाही.मुंबईत महाराष्ट्र शासनाच्या शिंदे फडणवीस सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये शासनाने एक महिना वेळ मागितला,आम्ही १० दिवस जास्त दिले आहेत.आता फक्त आरक्षणाच हवे.आता कारणे नकोत..फक्त आरक्षण द्या अशी गर्जना मनोज जरांगे पाटील यांनी केली.
आष्टी येथे सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.जरांगे पाटील पुढे म्हणाले की,महाराष्ट्र शासनाने सन २००४ मध्येच मराठा आणि कुणबी एकच आहेत असा शासन आदेश काढलेला आहे.आता संपूर्ण मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र शासनाने द्यावे.मी हे माझ्या स्वार्थासाठी बोलत नसून कायदा ज्यांनी केलेला आहे ते बोलत आहे.संपूर्ण समाजासाठी मी हे आंदोलन करत आहे.आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन समाप्त होणार नाही असे सांगून जिवंत असेपर्यंत मराठा समाजाची गद्दारी केली नाही आणि करणारही नाही असे भावनिक आवाहन केले. गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या मराठा समाजाच्या चेहऱ्यावर हसू निर्माण होईल असे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत.आम्ही आरक्षण मागत असताना आंदोलकांवर लाठीमार करून रक्तबंबाळ केले,आई बहिणींना मारहाण झाली परंतु समाजाने शांतता ठेवून शांततामय मार्गाने आंदोलन करून आरक्षण मिळवायचं आहे. कोणत्याही मराठा तरुणाने आत्महत्या करायचे नाही.कुठेही जाळपोळ करायची नाही. १४ तारखेला शासनाने मागीतलेला एक महिना पुर्ण होत आहे.त्यानंतर १० दिवस आणखी आपण शासनाला दिलेले आहेत.त्यासाठी शासनाला आठवण करुन देण्यासाठी आंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी येथे संपूर्ण मराठा समाजाने यायचं आहे.
मराठा समाजाच्या व्यक्तीने घरी थांबायचं नाही.संपूर्ण समाजाने आपली एकजूट दाखवायची आहे.मुंग्यासारखी रांग लावा.शांततेत या शांततेत जा,मराठा समाजासाठीचे आरक्षण आता दृष्टीपथात आलेले आहे.या संधीचे सोनं करा.आरक्षण निर्णायक टप्प्यात आलेले आहे.सरकार कसं देत नाही ? ते पाहू असा गर्भित इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.मराठवाड्यातील मराठा समाजाचे विदर्भातील मराठा समाजाची नातेगोते रक्ताचे नाते आहेत.ते सर्व कुणबी प्रमाणपत्रधारक आहेत.त्यामुळे सर्व मराठा क्षत्रिय यांना सरसकट प्रमाणपत्र मिळण्याची आवश्यकता आहे.आम्ही आजवर मराठा आरक्षणावर भरपूर अभ्यास केलेला आहे.निजामकालीन कागदपत्रे हे उर्दू आणि इतर तत्सम भाषेमध्ये आहेत आणि ५ हजार पुरावे सापडलेले आहेत.त्यामुळे आता कायदा पारित करण्यासाठी जो पुरावा लागतो. जो आधार लागतो तो आधार आता सरकारला मिळालेला आहे.त्यामुळे तात्काळ कायदा पारित करा असा निर्वाणीचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
चौकट
********
दुपार दोन वाजल्यापासून आष्टी शहर हे गजबजले होते. आष्टी तालुक्यातील प्रत्येक गावातून जास्तीतजास्त लोक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये रस्त्याच्या तीनही बाजूला जरांगे पाटील यांच्या प्रतीक्षेत बसून होते.आष्टी शहरातील रमाई आंबेडकर चौकापासून बस स्थानकापर्यंत सुमारे ५१ जेसीबी मशीनवरून मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.यासाठी ५०० क्विंटल फुलांची व्यवस्था करण्यात आली होती.

मनोज जरांगे पाटील यांच्या या विराट सभेसाठी उपस्थित असलेल्या मराठा समाज बांधवांसाठी आष्टी शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून समस्त मराठा समाज बांधवांची तहान भागवली आणि आपल्या सामाजिक समरसतेचा परिचय दिला.जरांगे पाटील यांच्या सभेला तब्बल पाच तास उशीर झाला तरी हजारो लोक सभेसाठी उपस्थित होते. कुठल्याही प्रकारच्या गडबड गोंधळ न करता अत्यंत शांततेमध्ये ही विराट सभा पार पडली.
0 टिप्पण्या