आष्टी
पाऊस झाला नसल्यामुळे अनेक सामाजिक समस्या उभ्या राहू शकतात.त्यातील गंभीर असलेली
बाब म्हणजे भुरट्या चोऱ्या,वाटमारी, घरफोड्या या घटना असून त्यावर परिणामकारक
उपाययोजना करण्यासाठी गावोगावी ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न करणार
आहोत.याकामी प्रत्येक गावातील युवकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन सहकार्य करण्याची
आवश्यकता आहे.लवकरच यासाठी आपण पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावी बैठक घेणार
आहोत अशी माहिती आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी दिली.
याबाबत ते अधिक म्हणाले की, दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली की भुरटे चोरटे
हे उचलेगिरी, घर फोड्या आणि रस्ते अडवून वाटमारी करण्याकडे वळतात.सध्या आष्टी पोलीस
स्टेशन हद्दीच्या गावांमध्ये देखील अपुऱ्या पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ
शकते त्यामुळे आष्टी पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचारी यांना या ग्रामरक्षक
दलातील युवकांकडून सहकार्य मिळू शकते.या ग्रामरक्षक दलाची संकल्पना अशी की, मोठ्या
गावांमध्ये किमान ३५ युवकांची ग्रामरक्षक दलामध्ये निवड केली जाईल म्हणजे किमान ५
जण एका दिवशी रात्रीची गस्त घालू शकतील. आठवड्यातून १ दिवस ही सेवा ते गावासाठी देऊ
शकतील लहान लहान गावांसाठी एका दिवशी किमान ३ युवकांनी गस्त घातल्यास त्या गावातील
२१ युवकांची निवड केली जाईल.या ग्रामरक्षक दलासाठी पोलीस स्टेशनद्वारे बॅटरी,
शिट्टी, काठ्या आणि एक रजिस्टर हे साहित्य पुरवण्यात येईल.या सर्व ग्राम रक्षक
दलांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून सर्व ग्रामरक्षकांना एकमेकांशी संपर्कात ठेवता
येईल एखाद्या गावामध्ये चोरट्यांचा प्रवेश होऊन अघटित घटना घडण्याची शक्यता असताना
ही बाब समजताच आष्टी पोलीस स्टेशन येथील दूरध्वनी क्र.०२४४१-२८२५३३ यावर तात्काळ
संपर्क करावा तसेच आष्टी पोलीस स्टेशन येथील मोबाईल व्हॅन मधील गस्त घालणाऱ्या
कर्मचाऱ्यांना संपर्क करण्यासाठी केवळ ११२ या क्रमांकावर संपर्क केल्यास संबंधित
घटना स्थळावरील लोकांना तात्काळ मदत मिळू शकेल अशी व्यवस्था करण्यासाठी ग्रामरक्षक
दल स्थापना झाल्यास सर्वांना एकत्रित करून उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस
अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याबाबत कार्यवाही सुरू करता येईल यासाठी
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे परवानगी मिळावी या साठी प्रयत्न सुरू असून पोलीस यंत्रणा आणि
नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी शेवटी
सांगितले.
0 टिप्पण्या