
आष्टी
तालुक्यातील कडा येथील रहिवाशी असलेल्या रजनी कल्याणराव पाटील यांनी वयाच्या
सत्तरीत ही ज्ञानेश्वरीचे १०८ वेळा पारायण करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे .
त्याआधीही त्यांनी ज्ञानेश्वरीचे हस्तलेखन देखील केले आहे.कडा येथील रजनीबाई
कल्याणराव पाटील या काकी नावाने परिचित आहेत.माजी सरपंच स्व. कल्याणराव पाटील
यांच्या त्या पत्नी आहेत.कल्याणराव पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर
कौटुंबिक जबाबदारी आली मात्र ही जबाबदारी पार पाडताना त्यांनी आपल्या धार्मिक
श्रद्धा जपल्या.संत ज्ञानेश्वर लिखित ज्ञानेश्वरीचे रजिस्टरमध्ये वाचन,मनन आणि
चिंतन व्हावे यासाठी हस्तलेखन केले.शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांची संसाराच्या
व्यापात लेखनाची सवय देखील राहिली नव्हती. मात्र पती निधनाच्या दुःखातून सावरून
वयाच्या साठीमध्ये हाती पेन घेऊन त्यांनी ज्ञानेश्वरी हस्त लेखन पूर्ण केले .
त्यानंतर ज्ञानेश्वरीचे १०८ वेळा पारायण करण्याचा संकल्प केला.७ जानेवारी २०१९
पासून त्यांनी ज्ञानेश्वरी पारायणला सुरुवात केली.कधी सात दिवसात संपूर्ण
ज्ञानेश्वरी वाचन केले तर कधी त्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागला. अशाप्रकारे
संपूर्ण ज्ञानेश्वरीचे त्यांनी १०८ वेळा पारायण केले आहे.७ जुलै २०२३ रोजी त्यांचा
हा संकल्प पूर्ण झाला.त्यांच्या वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी हे ध्येय पूर्ण केले
आहे . शिवाय साडेतीन वर्षाच्या कालावधीत कोविड सारख्या आजाराचा सामना करताना ही
त्यांनी आपला निश्चय ढळू दिला नाही.नुकताच पारायण संकल्प पूर्ण झाल्यावर त्यांनी
नेवासा येथे संत ज्ञानेश्वरांनी जेथे ज्ञानेश्वरी लेखन केले त्या पैस मंदिरात
हस्तलिखित ज्ञानेश्वरीसह जाऊन दर्शन घेतले . ज्ञानेश्वरीच्या नियमित वाचनाने आपले
मनोबळ कधीच खचले नाही. उलट कोविड सारख्या काळात ऑक्सिजन पातळी खालावली असतानाही
खंबीरपणे आजाराला सामोरे जाण्यासाठी त्याचा फायदाच झाला असे त्यांनी सांगितले .या
लेखनासाठी आणि पारायनासाठी प्रज्ञाचक्षु ह.भ.प .मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचे
मार्गदर्शन तर शकुंतला (अक्का) पाटील आणि विश्वनाथ चांगुणे यांचे सातत्याने
प्रोत्साहन मिळाले असे त्यांनी सांगितले.
0 टिप्पण्या