
कायम दुष्काळाशी सामना करणारा तालुका अशी आष्टीची ओळख निर्माण झाली आहे सुदैवाने
गेल्या सलग चार वर्षे तालुक्यात पाणी टंचाईने डोके वर काढले नाही. गतवर्षी पावसाचे
प्रमाण चांगले राहिल्याने पाणी टंचाई व चारा टंचाई जाणवली नाही मात्र यावर्षी
पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंता वाढली
आहे. तालुक्यातील एकही नदी, नाल्या,ओढे यांना पाणी न गेल्याने तालुक्यावर पाण्याचे
संकट येते की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. राज्यात कुठे मुसळधार पाऊस, तर
कुठे अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असताना आष्टी तालुक्यातील
सहा मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांत अत्यल्प उपयुक्त जलसाठा आहे, तर तीन
प्रकल्प जोत्याखाली आहेत. तसेच २२ लघु प्रकल्पांपैकी ११ प्रकल्प जोत्याखाली आहेत.
आगस्ट निम्मा उलटला तरी आष्टी तालुक्यात पाणीसाठा वाढण्याच्या दृष्टीने अद्याप
समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. आष्टी
तालुक्याचे दुष्काळाशी कायमच नाते असल्याने यावर्षी पाऊस पडणार का नाही, याची चिंता
दरवर्षीच आष्टीकरांना लागलेली असते. यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच ओढ दिल्याने
तालुक्यावरील पाणीसंकट कायम राहते की काय, अशी शक्यता व्यक्त होत आहे. आष्टी
तालुक्यातील सहा मध्यम प्रकल्पांपैकी मेहकरी, कड़ा व कड़ी तीन प्रकल्पांत मिळून
१५टक्के असा उपयुक्त जलसाठा आहे. तर उर्वरित रूटी, तलवार व कांबळी जोत्याखाली गेले
आहेत. पांढरी लघु तलाव, ब्रह्मगाव, किन्ही, चोभानिमगाव, वडगाव, वेळ, बेलगाव,,
पिंपळा, मातकुळी, जोगेश्वरी पारगाव क्रमांक १. जोगेश्वरी पारगाव क्रमांक २,
शिंदेवाडी, कोयाळ, सुलेमान देवळा, धामणगाव, पिंपरी खुमरी, पांढरी, जळगाव हे लघु
प्रकल्प जोत्याखाली आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, जून व जुलै महिन्यात
राज्यभरात पावसाने हाहाकार असताना आष्टी तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला
नाही.जुलै महिन्यात झालेल्या पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या असल्या
तरी पावसाची चांगली साथ मिळालेली नाही. पूर्वी झालेल्या पेरण्यांमचील पिके
मध्यंतरीच्या संततधार पावसाने जगली.मात्र आता पिकांनी माना टाकल्या आहेत.
मध्यम
प्रकल्प आणि उपयुक्त पाणीसाठा मेहकरी
: २९.३२ टक्के कडा:३.२७ टक्के कडी:३.८७ टक्के
रुटी:जोत्याखाली तलवार:जोत्याखाली कांबळी : जोत्याखाली
0 टिप्पण्या