आष्टी येथील
बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेह
मिलन सोहळा दि.१९ ऑगस्ट रोजी थाटात संपन्न झाला.सन १९७२ साली अहमदनगर ते बीड या १५०
कि.मी.च्या अंतरात एकही महाविद्यालय जेव्हा नव्हते.शिक्षण घेण्यासाठी ज्ञान
मंदिराची अगदीच गरज होती,त्या काळात हे महाविद्यालय माजी मुख्यमंत्री कै.शंकरराव
चव्हाण यांच्या आशीर्वादाने सुरू करण्यात आले.आ. बाळासाहेब आजबे यांचे पिताश्री
माजी आ.कै.भाऊसाहेब आजबे आणि शंकराव चव्हाण त्यांचे खास सख्य होते. संस्थाध्यक्ष
किशोरनाना हंबर्डे यांचे ते आजोबा होत. बी.डी.हंबर्डे आणि त्यांच्या सर्व
सवंगड्याच्या मनात ही उर्मी प्रामुख्याने जागृत झाली.की शिक्षणाची गंगा या बीड
जिल्ह्याच्या दुष्काळी भागात आणली पाहिजे.ते भगीरथ ठरले.या महाविद्यालयाच्या
जडणघडणीला पन्नास वर्षे पूर्ण झाले.सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून,हा माजी
विद्यार्थी स्नेह मिलन मेळावा संपन्न झाला.या महामेळाव्याची तब्बल सहा महिन्यापासून
तयारी सुरू होती.प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे,स्नेह मिलन सोहळा समन्वयक डॉ.सखाराम
वांढरे,महाविद्यालयाचे सर्व सहकारी प्राध्यापक,कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम
घेऊन,सुवर्ण महोत्सवी सोहळा अक्षरशःअविस्मरणीय ठरवला.सोहळा उद्घाटन, बी.डी.हंबर्डे
विधी महाविद्यालयाचे उद्घाटन,हंबर्डे महाविद्यालय, पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल,संगणक
शास्त्र विभाग यांच्या सांस्कृतिक विभागाच्या परिश्रमातून विविध गुणदर्शन
कार्यक्रम, प्रातिनिधिक स्वरूपात माजी विद्यार्थी प्रश्नोत्तर, मुलाखत,या
कार्यक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.हजारो माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी अनेक
वर्षानंतर एकमेकांना भेटले.गुरुजनांच्या भेटी झाल्या.आपण खूप वर्षानंतर भेटत आहोत
याचा आनंद तर होताच,त्याचबरोबर त्या भूतकाळाच्या कॉलेज जीवनातील विस्मृतीत गेलेले
काही सुखाचे,काही दुःखाचे क्षण आठवू लागले.... ओ खाबो के दिन,ओ किताबों के
दिन,सवालों की राते,जवाबो के दिन... कई साल हमने गुजारे यहा,यही साथ खेले हुए हम
जवा,सलामत रहे दोस्ताना हमारा.... या दोस्ताना चित्रपटातील गीताचा प्रत्यय माजी
विद्यार्थी,शिक्षक,प्राध्यापक यांना स्पर्श करून गेला.असा स्नेह मिलन मेळावा
दरवर्षी घ्यावा.त्यात खंड पडू नये.आम्ही पुन्हा येत राहू.कॉलेज जीवनातल्या सुवर्ण
आठवणी पुन्हा पुन्हा जाग्या होत राहतील.मन गलबलुन जाईल थोडे.पण तो
प्रेमाचा,स्नेहाचा ओलावा मनाला निश्चितच एक थंडावा देऊन जाईल.अशा भावना
व्यासपीठावरून,खाजगीत बोलताना, गप्पा गोष्टीत रंगल्यानंतर,आपोआपच शब्दांमधून उमटत
होत्या.मला कवी अरुण म्हात्रे यांच्या कवितेच्या ओळी कार्यक्रमात अनेक वेळा
म्हणाव्याशा वाटल्या.त्या अशा ... ते दिवस आता कुठे,जेव्हा फुले बोलायची.... दूर ती
गेली तरी,सावली भेटायची.... फाटके होते खिसे आणि नोटही नव्हती खरी.पण उगवत्या
चांदण्यावर मालकी वाटायची.... एकूणच स्नेह मिलन मेळावा गाजला.उद्घाटन आ. सुरेश धस
यांच्या हस्ते झाले.नव्याने बी.डी.हंबर्डे विधी महाविद्यालयाचे उद्घाटन आ.
बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते झाले. बीड,बलभीम महाविद्यालयाचे माजी प्राचार्य
डॉ.वसंत सानप,इंदोरचे परमेश्वर येवले पाटील,कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोरनाना
हंबर्डे,सचिव अतुलशेठ मेहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलनाने स्नेह
मेळाव्याची सुरुवात झाली.तदनंतर प्रा.महेश चवरे यांनी प्रास्ताविक केले.विशेष
म्हणजे,हंबर्डे महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचे,म्हणजे सन १९७२ चे विद्यार्थी
पी.टी.चौधरी, विक्रम पवळ,सय्यद शहाबुद्दीन,अडसरे नवनाथ,चव्हाण रावसाहेब यांचा सर्व
मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सन १९६२ च्या चीन युद्धात आणि सन १९७१ च्या
पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात सहभाग घेतलेले माजी सैनिक सावळीराम मार्कंडे,आज ते
८० वर्षाचे आहेत.त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.आ. बाळासाहेब आजबे यांच्या
सौभाग्यवती निशा उर्फ सविता बाळासाहेब आजबे यांचा सौ.सुलभा किशोर हंबर्डे यांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाच्या आजवरच्या प्रवासावर फोटोग्राफर
सचिन रानडे यांनी तयार केलेली चित्रफीतही दाखविण्यात आली.सर्वासाठी भोजनाची उत्तम
व्यवस्था करण्यात आली होती.उद्घाटन प्रसंगी आ. सुरेश धस म्हणाले, हे महाविद्यालय
ग्रामीण आहे.सन १९९१ ते १९९३ हे तीन वर्ष मी याच महाविद्यालयात विद्यार्थी संसदेचा
अध्यक्ष होतो.राजकीय धडे गिरवण्याची संधी मला याच महाविद्यालयातच मिळाली.गोरगरीब
विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षण पेलवायचे नाही.अनवाणी पायांनी येणाऱ्या
विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळत असे.या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी
महाराष्ट्रभर उच्च पदावर आहेत. मल्टीप्रपोज हॉल,क्रीडा संकुल,खेळाचे मैदान,हॉस्टेल
उभारण्यासाठी निधी, प्रांगणातील सिमेंट रस्त्याचा प्रश्न, सांस्कृतिक भवन,प्रशासकीय
भवन या कामासाठी सर्वतोपरी मदत करू असे ते म्हणाले. यावेळी आ.बाळासाहेब आजबे
म्हणाले की ,आष्टीसारख्या ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी आमचे
पिताश्री तत्कालीन आमदार भाऊसाहेब आजबे (बापू ) यांनी हे महाविद्यालय उभे
करण्यासाठी खूप परिश्रम घेतले.आता हंबर्डे महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी कुठलेही
सहकार्य करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत.कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोरनाना हंबर्डे
म्हणाले की,तालुक्याला सुदैवाने दोन आमदार आहेत.आजोबा भाऊसाहेब आजबे यांनी आष्टी
तालुक्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.आज विधी महाविद्यालय उद्घाटनाच्या निमित्ताने
त्यांचे सुपुत्र म्हणजे,आ. बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते विधी महाविद्यालयाचे
उद्घाटन होत आहे.आमच्याकडे अजूनही बरेच कोर्सेस आणण्यासाठी जमीन जागा आहे.आणि आम्ही
ती इच्छा सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण करणार आहोत.यावेळी बीड येथील बलभीम
महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.वसंत सानप यांनी आपल्या बीज भाषणातून
महाविद्यालयाच्या उन्नतीकडे घेऊन जाण्याचे काही सुखकर मार्ग विशद केले.यावेळी विविध
स्तरातील अनेक प्रतिष्ठित माजी विद्यार्थी,माजी विद्यार्थिनी,नागरीक मोठ्या
संख्येने उपस्थित होते.दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थी व माजी शिक्षक संवाद
चांगलाच रंगला.एका तासात व्हावा असे अपेक्षित असलेला हा कार्यक्रम दोन तासानंतरही
उत्तरोत्तर रंगत गेला.यात माजी विद्यार्थिनी,सध्या मुंबईच्या एसीपी मंदाताई
घोगरे,वाल्मीकतात्या निकाळजे, प्रफुल्ल सहस्रबुद्धे,उत्तम बोडखे, विजय
गोल्हार,दत्ता काकडे,प्रा.देविदास चाळक,लोकनेते विजय गोल्हार, प्रा.बापू
धोंडे,कल्याण पोकळे,नांदेडचे पी.आय.सुनील निकाळजे,प्रा.राम बोडखे, प्रा.कृष्णा
सोनवणे,प्रा.वसंत देशमुख,गौतम निकाळजे,किशोर झरेकर,काकासाहेब शिंदे, प्रा.दिलीप
घायाळ,प्रा.शंकरराव काकडे, लक्ष्मण रेडेकर,प्रशांत सहस्रबुद्धे,प्रा. रामकृष्ण
हंबर्डे,मच्छिंद्र पवार,माजी पीएसआय विश्वनाथ जगताप,हॉलीबॉल खेळाडू कर्दुस
हुसेन,प्रख्यात डांसर सुनील उमाप,एडवोकेट सुनिता हंबर्डे,चिऊ निंबाळकर,पोलीस
कॉन्स्टेबल पठाण मॅडम,प्राचार्य डॉ.खेमगर यांच्यासह अनेकांनी विचारलेल्या
प्रश्नांना यथोचित उत्तरे दिली.तसेच हंबर्डे महाविद्यालयाने फिनिक्स या पक्षासारखे
कार्य केलेले आहे.साध्या टीनच्या छपराखाली असणारे महाविद्यालय, आज गगनचुंबी
इमारतींनी अच्छादित, डौलाने उभे आहे.महाविद्यालयाविषयी प्रेमाचा ओला,शब्दातून
व्यक्त झाला. दिवसभरातील पूर्ण सत्रांचे सूत्रसंचालन कवी प्रा.सय्यद
अल्लाउद्दीन,डॉ.अभय शिंदे,प्रा.सायली हंबर्डे,पत्रकार अविशांत कुमकर यांनी
केले.प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी सर्वांचे आभार मानले. कैलास
देशमुख,के.बी.चवरे,प्रमोदकुमार कोहणे हे गुणवंत प्राचार्य लाभलेले हे महाविद्यालय
आहे.प्रख्यात ग्रामीण कथाकार भास्कर चंदनशिव यांनी याच महाविद्यालयात सुरुवातीच्या
काळात ज्ञानदानाचे कार्य केले आहे.याच महाविद्यालयात त्यांच्या ग्रामीण कथांना
अंकुर फुटले.मीही इयत्ता अकरावी ते पदवी पर्यंतचे शिक्षण याच महाविद्यालयातून घेतली
आहे.इतकेच काय, इथेच तब्बल ३३ वर्ष मला अध्यापन सेवा करता आली,कवितेतला क गिरवता
आला.हे मी माझं परम भाग्य मानतो.
.............












लेखक प्रा.सय्यद
अल्लाउद्दीन
0 टिप्पण्या