Ticker

6/recent/ticker-posts

किशोर पाटील यांची आमदारकी रद्द करा पत्रकारास मारहाण प्रकरण; आष्टीत पत्रकारांकडून निषेध

बातमी दिल्याचा राग मनात धरून पाचोरा(जि.जळगाव)येथील पत्रकार संदीप महाजन यांना भरचौकात बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा आष्टी तालुक्यातील पत्रकारांनी आज जोरदार घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.पत्रकारावर हल्ला घडवून आणणा-या आमदार किशोर पाटील यांच्यासह हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत आणि आमदार किशोर पाटील यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी आष्टी तालुक्यातील पत्रकारांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की समाजाच्या खऱ्या व्यथा अन गाथा मांडून त्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न पत्रकार करीत असतो.त्याचबरोबर समाज मूल्यांना जोपासत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पत्रकार हा लढत असतो.संविधानाचा खरा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकार आपली भूमिका बजावित असतो. जळगावमधील पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात ८ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार व हत्येची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधत सांत्वन केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सांत्वनाबाबत पत्रकार संदीप महाजन यांनी त्यांच्यावर टिकात्मक बातमी प्रसिद्ध केली होती.यानंतर किशोर पाटील यांनी महाजन यांना फोनवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या अर्वाच्च शिवीगाळीची क्लिप महाजन यांनी व्हायरल केल्यानंतर याचा राग मनात धरून गुरुवारी दि.१० आगस्ट रोजी आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा येथील भररस्त्यावरील चौकात तीन समर्थकांमार्फत महाजन यांना अमानुषपणे खाली पाडून बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनीही हल्लेखोर तिघांपैकी केवळ दोघांवर चॅप्टर केस केली असून त्यांना जामीनावर सोडूनही देण्यात आले. बेदम मारहाण होवूनही पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला नाही.टिकात्मक बातमी दिल्याचा राग मनात धरून आमदार किशोर पाटील यांनी लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारावर हस्तकांमार्फत केलेल्या या हल्ल्याचा आष्टी तालुका पत्रकार संघ ,व्हाईस आफ मिडिया,सर्व पत्रकारांनी शुक्रवारी दि.११ आगस्ट रोजी सकाळी तहसीलदार यांना निवेदन देत निषेध व्यक्त केला.आमदार किशोर पाटील यांची आमदारकी त्वरित रद्द करावी व त्यांच्यासह दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदारांकडे केली.या वेळी आष्टी तालुका पत्रकार संघचे अध्यक्ष विनोद ढोबळे,आष्टी तालुका व्हाईस ऑफ मिडीयाचे तालुकाध्यक्ष अनिरुद्ध धर्माधिकारी, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष अविशांत कुमकर,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे, उत्तम बोडखे, रघुनाथ कर्डिले, प्रवीण पोकळे, संजय खंडागळे, रहेमान सय्यद, संतोष ससाणे, कृष्णा पोकळे,गोपाल वर्मा,भाऊसाहेब गाडे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या