दररोज पहाटेपासूनच सुरू होणारा मैदानी खेळाचा सराव आणि दुपारी अभ्यासासाठी वेळ देऊन पुन्हा संध्याकाळी होणारी ग्राऊंडची फेरी, पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांचा हा दिनक्रम असतो. या सरावात सातत्य ठेवत आष्टी तालुक्यातील केरूळ या गावातील पाच जणांनी पोलीस भरतीत मुंबईचे मैदान मारले आहेत. चौघांची मुंबई तर एकाची मिरा भाईंदर पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आहे. हे सर्व शेतीची पार्श्वभूमी असलेले युवक आहेत.नामदेव बापू अनारसे हे माजी सैनिक असून १७ वर्ष भारतीय सैन्य दलात त्यांनी सेवा बजावली आहे.मुक्त विद्यापीठातून पदवी मिळवून त्यांनी मुंबई पोलीस दलातदेखील स्थान मिळवले आहे.ते शेतकरी कुटुंबातील आहेत.अनारसे मेजर नावाने ते गावात परिचित आहेत.शरद गहिनीनाथ गोंदकर याने कडा येथे धोंडे महाविद्यालयातून बी. कॉम. पदवी मिळवली. शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या शरद याने सात वर्ष पोलीस दलात जाण्यासाठी सराव केला. त्यात तीन वर्षापूर्वी अवघ्या अर्ध्या टक्क्याने यशाने हुलकावणी दिली मात्र तरीही त्याने आपली जिद्द सोडली नाही.उलट तीन वर्षापासून पुन्हा पोलीस होऊन दाखवेन तोपर्यंत नवीन ड्रेस घेणार नाही असा निश्चय केला. आणि आपला निश्चय पूर्ण करत मुंबई पोलीस दलात जाऊन आपली मेहनत सिद्ध केली आहे.आपल्या या परिश्रममागे भाऊ राम गोंदकर यांची खंबीर साथ असल्याचे शरद याने सांगितले. महेश उद्धव शेलार हा बी.एस्सी. पदवीधारक कहे. आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे आष्टीच्या स्वामी विवेकानंद अकॅडमीमध्ये त्यांनी पोलीस भरतीचे मार्गदर्शन घेतले . नंतर अहमदनगर येथे जाऊन मित्रांच्या ग्रुप मध्ये राहून पोलीस भरतीचा सराव केला. त्याची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे.त्याने देखील पोलीस भरती यशस्वी होऊन दाखवेल असा निश्चय केला होता.शेलार हा केरूळ लगतच्या शेलारवाडीचा रहिवासी आहे.संदीप ज्ञानेश्वर सूर्यवंशी हा युवक मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण झाल्यानंतर एक वर्ष पुण्यात राहून नोकरी देखील केली. मात्र त्यात मन रमल्याने गावाकडे परत आला.शासकीय सेवेत जायचा निश्चय करत पोलीस भरतीचा सराव केला आणि त्यात तो यशस्वी झाला . कम्बाईन परीक्षेचा अभ्यास करत असल्याने पोलीस भरतीला सामोरे जाणे त्याला सोपे गेले.अहमदनगरच्या वाडिया पार्क मैदानात सराव करत त्याने मुंबई पोलीस दलात जाण्यात यश मिळवले.तोही शेतकरी कुटुंबातीलच आहे. तुकाराम लक्ष्मण शेलार याने बी.एस्सी. ही पदवी कडा येथील धोंडे महाविद्यालयातील मिळवली आहे. त्याने पोलीस होण्याचा निश्चय करत अहमदनगर येथील लक्ष अकॅडमी येथे पोलीस भरतीचे मार्गदर्शन घेत सराव केला . तेथील संचालक कवडे यांची त्याला मदत झाली.तुकाराम याची मीरा-भाईंदर पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आहे.केरूळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शेलारवाडीचा रहिवासी असलेला तुकाराम देखील शेतकरी कुटुंबातीलच आहे.नामदेव अनारसे,शरद गोंदकर,महेश शेलार,संदीप सूर्यवंशी,तुकाराम शेलार यांचे अभिनंदन होत आहे.





0 टिप्पण्या