आष्टी (प्रतिनिधी)
ईश्वराच्या असीम कृपेने मिळालेले हे मानवी जीवन अत्यंत दुर्मिळ आणि मोठे वरदान आहे.याचे भान ठेवून मानवाने नैतिक मूल्यांची कास धरत जीवनप्रवास केला पाहिजे.आज 'काळ' आपल्या समोर उभा आहे, तो कधी आणि केव्हा झडप घालेल हे सांगता येत नाही.या काळाच्या चक्रातून सुटका करून घ्यायची असेल, तर केवळ आणि केवळ 'हरिनाम' हाच एकमेव पर्याय आहे!असे परखड आणि मार्मिक प्रतिपादन मराठवाड्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार,भारुडकार व समाजप्रबोधनकार ह.भ.प.भुजंग महाराज मूर्तीकर यांनी केले.
अधिक मासाच्या (धोंड्याचा महिना) पवित्र पर्वावर कारेगाव रोड येथील ऐतिहासिक विश्वकर्मा मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या पाचव्या दिवशी कीर्तनपुष्प गुंफताना भुजंग महाराज मूर्तीकर यांनी आपल्या सुश्राव्य गायनातून आणि रसाळ वाणीतून हजारो भाविकांना मंत्रमुग्ध केले.पावन भूमीत संत विचारांचा वारसा पुढे नेणारे चिंतन मांडताना महाराजांनी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या "काळाने ग्रासिले सावधान व्हा रे.. सोडवण करा रे हरिनामी!! या अत्यंत प्रसिद्ध आणि मार्गदर्शक अभंगाची निवड केली होती.कीर्तनात विविध दाखले आणि दाखलेवजा दृष्टांत देत भुजंग महाराजांनी संतांच्या वाङ्मयातील मूळ गर्भितार्थ भाविकांसमोर उलगडला.ते म्हणाले की,संतांनी मानवाला नेहमीच वेळीच सावध होण्याचा इशारा दिला आहे.संसाराच्या चक्रात अडकून परमार्थ विसरणाऱ्या माणसाला काळाच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी नामस्मरणा शिवाय दुसरा कोणताही सोपा मार्ग नाही,हे वास्तव त्यांनी उपस्थितांच्या मनावर बिंबवले.या सोहळ्यामुळे संपूर्ण कारेगाव रोड परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला असून परिसरात एक चैतन्यमय आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कीर्तन ऐकण्यासाठी केवळ परभणी शहरातूनच नव्हे,तर ग्रामीण भागातूनही हजारो भाविक स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यात्मिक क्षेत्रासोबतच राजकीय,सामाजिक,शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या कीर्तन सोहळ्याला हजेरी लावून श्रवणाचा आनंद घेतला.
चौकट
---------
ज्ञानार्जनाला विनोदाची झालर;
श्रोते भक्तीरसात मंत्रमुग्ध!
---------------
ह.भ.प.भुजंग महाराज मूर्तीकर यांच्या कीर्तनाची शैली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते.

विश्वकर्मा मंदिरात रंगलेल्या तब्बल दोन तासांच्या या कीर्तन सेवेत त्याची प्रचिती आली. गंभीर आणि तितक्याच मोलाच्या अध्यात्मिक ज्ञानाची मांडणी करताना महाराजांनी त्याला आपल्या खास विनोदी शैलीची झालर दिली.रसाळ वाणी,उत्कृष्ट गायन आणि समाजातील विसंगतीवर विनोदाच्या माध्यमातून ओढलेले कोरडे यामुळे उपस्थित हजारो भाविक दोन तास जागेवरून हलले नाहीत.
0 टिप्पण्या