Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श प्रशासक,दूरदृष्टी नेतृत्व व समाज सुधारक : छत्रपती शिवाजी महाराज

शिस्तबद्ध लस्कर,सुसंघटित प्रशासकीय यंत्रणा या बळावर प्रागतिक राज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज राज्याच्या नव्हे तर देश आणि जगाच्या इतिहासामध्ये एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून नावारूपाला आलेले लोकप्रिय लोक नेतृत्व आहे.वडील शहाजीराजे आणि आई जिजाऊंच्या संस्कार आणि मार्गदर्शनातून लहानाचे मोठे होताना संस्काराचा दीपस्तंभ पाठीशी असल्याने समाज बांधिलकीच्या भावनेतून सर्वसामान्य रयतेचे नेतृत्व करण्यात ते अखेरपर्यंत यशस्वी ठरले.मुघल व आदिलशाही फौजांशी त्यांनी यशस्वी सामना केला.मराठी व संस्कृत भाषेच्या वापराला तत्कालीन स्थितीत सुद्धा महाराजांनी प्रोत्साहन दिलेले आहे‌. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रीयन लोकांच्या अस्मितेचे अविभाज्य घटक बनलेले आहेत. प्रचंड शौर्य साहस हिम्मत यामुळेच एक आदर्श आणि महान राष्ट्रपुरुष अशी प्रतिमा त्यांची जगभर झालेली आहे.आदर्श प्रशासक,दूरदृष्टी नेतृत्व आणि आदर्श समाज सुधारक म्हणून त्यांची ख्याती आदर्शवत आहे;किंबहुना विचार आणि पराक्रमाची गाथा म्हणूनच जगभर आज गाजू लागलेली आहे.महाराजांचे बालपण जिजाऊंच्या संस्कारात गेल्यामुळे रामायण महाभारता तील चांगल्या संस्कार युक्त घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या मनावर उमटले गेले.असामान्य युद्ध कौशल्य राज्यकारभारात दूरदृष्टी आणि जिजाऊंनी स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली.युद्ध कौशल्य व नेतृत्व गुण हे शिवाजी महाराजांचे खास वैशिष्ट्य राहिलेले आहेत. संस्काराचा खजिना,राष्ट्रप्रेम,मातृभूमी विषयी उत्कट जिव्हाळा...आणि म्हणूनच सर्व देशभरात पराक्रमाच्या कीर्ती चा सुगंध पसरला आहे! छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ,शिस्तबद्ध लष्कर आणि ३५० किल्ल्यांचे पुनर्निर्मान आणि त्या समवेतच आपल्या जनतेविषयी प्रचंड आदर. प्रजेसोबत असलेला स्नेहभाव हे महाराजांचे गुण अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले दिव्य कर्तुत्व,मिळवलेले यश या भूमीच्या रक्षणासाठी जीव धोक्यात घालून केलेल्या कर्तबगार मोहिमा...चंद्र-सूर्य असेपर्यंत कायम राहतील!आज छत्रपती शिवाजी महाराज जगभरातील लाखो जणांसाठी प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. महाराजांनी मराठा साम्राज्याची खऱ्या अर्थाने पायाभरणी केली आणि म्हणूनच आज समता बंधुत्व ऐक्य सर्वधर्मसमभाव आणि माणुसकीचा मंत्र जपून पुढे जाण्याची योग्य दिशा महाराष्ट्रासह सबंध हिंदुस्तानला मिळाली आहे.त्यांनी सांगितलेल्या विचार आणि आचारावर वाटचाल केल्यास मानवी समाज सुखाने नांदू शकेल,महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन!! लेखक ----- श्रीमती आशा फड - चाटे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या