Ticker

6/recent/ticker-posts

कडा येथील कु.श्रावणी दळवी हिची १९ वर्षाखालील महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

उत्तम बोडखे,आष्टी. ---------------- आष्टी तालुक्यातील कुंबेफळ येथील जिल्हा परिषद शिक्षक आजिनाथ दळवी यांची मुलगी कु.श्रावणी आजिनाथ दळवी हिची १९ वर्षाखालील महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात नुकतीच निवड झाली आहे.महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड होणारी ती बीड जिल्ह्यातील पहिलीच युवती आहे.नुकत्याच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये महाराष्ट्रातून १६ मुलींची निवड करण्यात आली आहे.त्यामध्ये श्रावणी दळवी हिने बाजी मारली आहे.श्रावणी सध्या कडा येथील पीएम मुनोत कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे.आष्टी तालुक्यातील आजिनाथ दळवी हे जिल्हा परिषद शाळेवर कुंबेफळ येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.क-हेवाडी येथील हरिनारायण स्वामी विद्यालयाचे शिक्षक भारत दळवी आणि आष्टी येथील सौ.राजश्री दळवी यांची कु.श्रावणी दळवी ही पुतणी आहे. त्यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असल्याने सहाजिकच घरातील मुलीलाही क्रिकेटच्या लळा लागला.वडील रायगड येथे शिक्षक म्हणून नोकरीला लागले त्यावेळी आजिनाथ दळवी हे क्रिकेट खेळताना श्रावणी हिला मैदानावर दररोज घेऊन जात असत.तिने त्याच वेळेस ध्येय मनाशी बाळगून आपणही क्रिकेट मध्ये करिअर घडू शकतो हा ठाम आत्मविश्वास मनाशी बांधला व क्रिकेटचा सराव रायगड जिल्ह्यातील पाली येथून सुरू केला. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी तिने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले.श्रावणी ही अष्टपैलू खेळाडू असून उत्कृष्ट गोलंदाज देखील आहे.तिने आजपर्यंत महाराष्ट्र लीग,सुपर महाराष्ट्र लिग,जिल्हास्तरीय,विभागीय स्तरीय अनेक क्रिकेट सामने गाजवले आहेत.या सामन्यांमध्ये तिने चौफेर कामगिरी करत कधी गोलंदाजीत चमक मारली तर कधी फलंदाजीत शिवाय क्षेत्ररक्षणातही ती चपळ असल्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचाही पुरस्कार तिला अनेक वेळा मिळाला आहे.आष्टी तालुक्यातील कड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये राहूनही केवळ गुणवत्ता,ध्येय आत्मविश्वासच्या जोरावर तिने महाराष्ट्र क्रिकेट संघात मजल मारली आहे.या यशाबद्दल तिचे आ.सुरेश धस,माजी सरपंच अनिलतात्या ढोबळे, अमोलकचे सचिव हेमंत पोखरणा, बिपीन भंडारी,योगेश भंडारी,संजय मेहेर, डॉ.महेश नाथ, धनंजय मुथा,सचिन गुंदेचा,पत्रकार रघुनाथ कर्डिले,गट शिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. चौकट ----------- मला लहानपणीपासूनच क्रिकेट खेळण्याचे वेड होते शिवाय वडिलांनीही माझ्या खेळाला प्रोत्साहन दिले. ----- कु.श्रावणी दळवी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या