आष्टी ( प्रतिनिधी )
'जो न देखे रवी,तो देखे कवी !' असं म्हणतात; किंबहुना कितीतरी दूरच्या आणि दृष्टीआडच्या घटनांना शब्दांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याची अद्भुत कलात्मक शैली ज्या कवींच्या रूपातून दृष्टीक्षेपात पडते त्या कवींच्या महासमेंलनातील निवडक कवितांना एकत्र बांधून वाचक कवी रसिकांसमोर ठेवण्याची संकल्पना कवी मधल्याच कवींच्या मनात येते.. आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो ही बाब आज येथे स्पष्ट झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्राला साहित्यरचनेचा फार मोठा वसा व वारसा लाभलेला आहे.आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास आजपर्यंत निरंतर सुरू आहे.अल्प शब्दातून समाजातील अनेक चांगल्या वाईट घटनांना शब्दांच्या रूपातून व्यक्त होत, आणि समाजाचा आरसा बनत.. प्रसंगी परिवर्तनाची दिशा देण्याचे अमूल्य कार्य कवी साहित्यिकांनी केले आहे म्हणूनच विविध साहित्य संमेलनाप्रमाणेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्यातील प्रचंड बौद्धिक सामर्थ्य असलेल्या कवींनी सादर केलेल्या कवितातून अत्यंत मोजक्या म्हणजेच केवळ १५ कवींच्या १५ कविता एकत्र बांधून त्याचे संकलन करणे ही अत्यंत कठीण बाब असतानाही हे दिव्य पेलत साहित्य क्षेत्रातील मान्यवर कवी असलेल्या सुनील गोसावी आणि शर्मिला गोसावी यांनी अत्यंत जबाबदारीने प्रचंड कष्टप्रद परिश्रमातून पेलली आहे.मंगेश पाडगावकर यांची सलाम कविता, ना.धों.महानोर यांची ह्या नभाने ह्या भूईला दान द्यावे,रामदास फुटाणे यांची दोन मिनिटे,विठ्ठल वाघ यांची काळ्या मातीत मातीत,फ.म.शहाजिंदे यांची कबीरा,फ.मुं. शिंदे यांची आई,अशोक नायगावकर याची टिळक,महेश केळुसकर यांची झिनझिनाट, मिरजगांवचे प्रकाश घोडके यांची तुझ्या दाराहून जाता,अरुण म्हात्रे यांची ते दिवस आता कुठे, इंद्रजित भालेराव यांची गावाकडं चल माझ्या दोस्ता,भारत सातपुते यांची एक सज्जन माणूस, आष्टीचे कवी सय्यद अल्लाउद्दीन यांची कोण म्हणतो लोकशाही आलीच नाही,दासू वैद्य यांची अस्तित्वात नसलेल्या नंबरसाठी, प्रशांत मोरे यांची मैना ही कवीता या काव्यसंग्रहात आहे.कवी मंगेश पाडगावकर, ना.धो. महानोर, फ.मु.शिंदे यांच्यापासून ते प्रशांत मोरे यांच्यापर्यंत एकूण १५ सुप्रसिद्ध लोकप्रिय कवींच्या १५ कविता एकत्र करून 'वन्स मोर मराठी कविता' नावाचा संक्षिप्त कविता संकलन संग्रह सुनील गोसावी आणि शर्मिला गोसावी यांनी तयार करून वाचकांसमोर ठेवला आहे.या अद्भुत आणि अत्यंत वाचनीय अशा कविता संकलन संग्रहाला यापुढे प्रचंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास यानिमित्ताने चर्चा करताना पत्रकारिता आणि लेखन क्षेत्रातील गुणीजन,दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे यांनी व्यक्त केला आहे.

चौकट
--------
पवित्र मातीचा
सुगंध दरवळेल!
------------------------
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महा व्यासपीठावर सादर करण्यात आलेल्या आणि त्याला प्रचंड वन्स मोर मिळालेल्या कवितांना एकत्र बांधण्याची जादुई किमया गोसावी यांनी केलेली आहे. कवी विठ्ठल वाघ,ना.धो. महानोर यांच्या समवेतच बीड जिल्ह्याच्या आष्टी येथील भूमिपुत्र असलेल्या कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या लोकशाहीवरील कवितेला अंतर्भूत केल्याने मराठवाड्याच्या मुकुंदराज स्वामी यांनी प्रारंभित केलेल्या या पवित्र क्रांतिकारी मातीचा सुगंध या निमित्ताने अविरत दरवळेल!' असा विश्वास यानिमित्ताने लेखक निवेदक प्रा.बिभिषण चाटे यांनी व्यक्त केला आहे.
-------------------------------
0 टिप्पण्या