आष्टी (प्रतिनिधी)
बातम्यांचे आयुष्य कमी असते.
पण,पत्रकारांनी वृत्तपत्रात केलेले लिखाण कधीही जुने होत नाही,
ते समाजासाठी दिशादर्शक असते असे प्रतिपादन आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी येथे केले.
तसेच पत्रकार हा समाजाचा आरसा असतो त्याच्या लेखणीतून समाजातील घडामोडींचे प्रतिबिंब उमटत असते.समाजातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून अपप्रवृत्तींवर प्रहार असतानाच समाजासाठी आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान असणाऱ्या आदर्श गुणवंत व्यक्तींचा सन्मान करणे हे देखील पत्रकारांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांनी केले
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आष्टी तालुका पत्रकार संघाचे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.यावेळी सहा गुणवंताचा गौरव सोहळ्यात ते बोलत होते.
आष्टी शहरातील पत्रकार भवनात विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल संतोषशेठ मेहेर (व्यापार),नगराध्यक्ष जिया बेग (सामाजिक),पंडीत पोकळे (युवा सरपंच),नितीन आळकुटे (पक्षीमित्र),अरुण कांबळे (प्रशासकीय सेवा),शिवाजी गोरे
(उत्कृष्ट कर्मचारी) या सहा जणांना आदर्श पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.या सन्मान सोहळ्यामध्ये मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
यावेळी आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.विनोद ढोबळे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,
ॲड.सीताराम पोकळे,रघुनाथ कर्डीले,शरद तळेकर,शरद रेडेकर,
गणेश दळवी,सचिन रानडे,प्रवीण पोकळे,मनोज पोकळे आष्टी तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,नगरसेवक किशोरमामा झरेकर,सभापती शरीफ शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दैनिक झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे म्हणाले की,पत्रकार दिनी सर्व पत्रकारांचा सन्मान आमदार,माजी आमदार ,राजकीय नेते,
पदाधिकारी,व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते,शासकीय,प्रशासकीय अधिकारी आदि जण मान्यवर करतात.परंतु आम्ही पत्रकारांनी यावर्षापासुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे.पहिल्या वर्षी सहा नामवंतांचा आज सत्कार होत आहे.समाजातील प्रश्नांबाबत पत्रकार भूमिका मांडतात.हे लिखाण पदाधिकारी,अधिकाऱ्यांना मार्गदर्शक ठरते.पत्रकारांची कामाची धावपळ जनता पाहते.पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे सांगत पत्रकारांनी कायद्याचा अभ्यास अवश्य करावा.त्याचा पत्रकारितेत चांगला फायदा होईल.अभ्यासपूर्ण लिहिलेले लेख कायम स्मरणात राहतात.बातमीचे आयुष्य कमी असते परंतु भूमिका घेऊन लिहिलेले लेख अमर असतात.
कायदा-व्यवस्थेसाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असते.
पुढे बोलताना प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे म्हणाले की,आष्टी तालुक्यातील पत्रकारांनी नेहमीच संयमी पत्रकारिता केली आहे.केवळ समाजातील दोष दाखवण्याचेच काम केले असे नव्हे तर समाजामध्ये सकारात्मक पद्धतीने ऊर्जा निर्मिती करण्याचे काम केले आहे या शोधक वृत्तीमुळेच आष्टी तालुका पत्रकार संघाचे सदस्यांनी आष्टीतील समाजासाठी भरीव योगदान असणाऱ्या व्यापारी क्षेत्रातील मेहर ज्वेलर्सचे विजयशेठ मेहेर यांनी आष्टीच्या बाजारपेठेची मान उंचावली आहे.नगरपंचायतीचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी अनेक विकासाची कामे दर्जेदार पद्धतीने केल्यामुळे आष्टी शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे.अरुण कांबळे या पोलीस उपनिरीक्षकांनी आपली संपूर्ण सेवा अत्यंत प्रामाणिकपणे निष्कलंकपणे बजावली.आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील युवा सरपंच असलेल्या पंडित पोकळे यांनी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतानाच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम केले आहे आष्टी येथील महावितरण उपविभागात काम करणारे वरिष्ठ तंत्रज्ञ शिवाजी गोरे हे अत्यंत तळमळीने काम करणारे कर्मचारी असून अहोरात्र ते जनतेच्या सेवेत असतात. याचबरोबर नीतीन आळकुटे हा तरुण पशु पक्षांना जीवदान देण्याचे काम करत असून दुष्काळी पाणीटंचाई काळामध्ये स्वखर्चाने पशु पक्षांसाठी स्वखर्चाने चार ठिकाणी पाणवठे तयार करून त्यांची तहान भागवण्याचे पुण्यकर्म करत आहे.अशा या समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार आणि सन्मान आष्टी तालुका पत्रकार संघाच्यावतीने होत आहे.हे पत्रकारांचे कर्तव्यच आहे असे सांगितले.यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी समाजातील चांगले कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या सत्काराचे कल्पना आणि अशा प्रकारच्या व्यक्तींची निवड ही अत्यंत अल्पकाळात करण्यात आली असून अत्यंत योग्य व्यक्तींचा आज सन्मान होत आहे असे सांगितले सत्काराला उत्तर देताना विजयशेठ मेहेर यांनी आष्टीतील पत्रकार हे सव्यसाची असल्याचे सांगत आष्टीचे पत्रकार ज्ञानाचे बादशाहा आहेत असे सांगितले.



यावेळी युवा सरपंच पंडित पोकळे यांनी या पुरस्कारामुळे आपली जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले.अरुण कांबळे यावेळी बोलताना म्हणाले की,जे चूक आहे त्याला चूक आहे असे सांगण्याचे प्रामाणिकता ठेवली पाहिजे असे सांगितले.प्रास्ताविक करताना पत्रकार शरद तळेकर यांनी प्रसंगाची या सन्मान सोहळ्याची पार्श्वभूमी विशद केली.यावेळी उत्तम बोडखे,जिया बेग,संतोष सानप,शरद तळेकर,अध्यक्ष विनोद ढोबळे यांची भाषणे झाली.
अध्यक्षीय समारोप व आभार विनोद ढोबळे यांनी मानले.संचलन शरद तळेकर यांनी केले.
0 टिप्पण्या