....आणि रवींद्र महाजनी यांनी माझा मोबाईल उचलला..
पत्रकार उत्तम बोडखे संपादित आष्टी
वार्ताहर दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी कुठल्यातरी लेखक,राजकीय नेता,अभिनेता,
अभिनेत्री यांच्या हस्ते दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा पायंडा आहे. म्हणूनच मा.
विलासराव देशमुख, लोकनेते गोपीनाथराव मुंडे,निळू फुले,मकरंद अनासपुरे,छगन भुजबळ अशा
अनेक मान्यवरांच्या हस्ते आष्टी वार्ताहर दिवाळी अंकाचे प्रकाशन होऊ शकले.पाच-सहा
वर्षांपूर्वीची गोष्ट असावी.असाच दिवाळी अंक प्रकाशित करण्यासाठी आम्ही जेष्ठ
चित्रपट अभिनेता अशोक सराफ यांना फोन केला.त्यांच्या जवळच्या व्यक्तीने उचलला.आम्ही
त्यांना फोन करण्याचे कारण सांगितले.तेव्हा ते म्हणाले,साहेब बिझी आहेत.सारखं छातीत
दुखतंय,मी म्हणालो कधीपासून ? ते म्हणाले, अहो हे नाटकाचं नाव आहे. नाटकाच्या
प्रयोगात ते फिरतीवर आहेत.त्यामुळे अशोक सराफांची आशात भेट होऊ शकणार नाही. सारखं
छातीत दुखतय या नाटकाच्या नावावरून आम्ही थोडा वेळ मिस्कील हसलो ही.मग आम्ही फोन
नंबर उपलब्ध केला आणि मराठी चित्रपट सृष्टीतील देखना अभिनेता रवींद्र महाजनी यांना
फोन केला.त्यांना संपर्क करण्याचे कारण सांगितलं,तेव्हा समोरून बोलणारा प्रत्यक्ष
त्यांचाच आवाज होता.भारदस्त आवाज.अनेक चित्रपट पाहून परिचित झालेला.त्यांना मी
म्हणालो, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या ठिकाणाहून आष्टी वार्ताहर साप्ताहिक
चालवले जाते.गेल्या अनेक वर्षापासून या साप्ताहिकाचा दिवाळी अंक सातत्याने प्रकाशित
करीत आहोत.अनेक मान्यवरांच्या हस्ते आजवर त्याचे प्रकाशनही झालेले आहे.यावर्षीच्या
दिवाळी अंकाचे प्रकाशन आपल्या हस्ते व्हावे,अशी आमची आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांची
इच्छा आहे.त्यांनी अंकासंबंधी अधिकची विचारना ही केली आणि म्हणाले,खरं सांगू का,मी
माझ्या जरा वेगळ्या कामात व्यस्त आहे.तुम्ही प्रत्यक्ष याल तरी मला तुम्हाला वेळ
देता येणार नाही.माझ्यावरच्या प्रेमापोटी, माझ्या हस्ते दिवाळी अंक आपण प्रकाशित
करू इच्छिता.मला निश्चितच आनंद वाटला असता,पण माझ्याकडे वेळेचा अभाव आहे. पुन्हा
कधीतरी वेळ देईन.आम्ही थोडे निराशही झालो.पण एकेकाळचा गुणी,देखणा अभिनेता रवींद्र
महाजनी यांच्याशी रुबरू संवाद करून आम्ही थोडे सुखावले होतो. होकाराचा नसला तरी तो
भारदस्त आवाज ऐकून मी भूतकाळात गेलो. सन १९७५ ते १९९५ चा काळा.मराठी चित्रपटाचा
सुवर्णकाळ होता.अभिनेता अशोक सराफ,दादा कोंडके,रवींद्र महाजनी,निळू फुले,डॉ.श्रीराम
लागू,रंजना,उषा चव्हाण,सुषमा शिरोमणी,आशा काळे,उषा नाईक,अशा अनेक मातब्बर गुणी
कलावंतांच्या चित्रपटांना खूप गर्दी व्हायची. दूरदर्शन,मोबाईल,व्हाट्सअप यांचा
कुठलाही गंध नसलेला तो काळ होता.फक्त आणि फक्त आजूबाजूला पडदे लावलेल्या टॉकीजमध्ये
जमिनीवर बसून चित्रपट पहावा.आम्ही पाहत असायचो.चिंचाळासारख्या खेडेगावातून पाच..
पंचवीस जणांचा घोळका खर्चीसह आई.. बाबांची परवानगी घेऊन आष्टीच्या दिशेने पायी
निघायचो. चित्रपटा आधी दाखवली जाणारी जाहिरात सुद्धा बोनस मध्ये पाहायला मिळते,याचा
आनंद वाटायचा. अशाप्रकारे मांडी घालून तो चित्रपट पाहत असायचो.मग काय आठवडाभर,
पंधरा दिवस, महिनाभर त्या पाहिलेल्या चित्रपटावर चर्चा रंगायच्या. पारावर,
आमराईत,नदीकाठी, माळावर गुरे चारताना,अभिनेता,अभिनेत्री,संवाद, गाणी यावर गप्पा
व्हायच्या.जो अभागी तो चित्रपट पाहू शकला नाही, त्याच्यापर्यंत पाहिलेल्या
चित्रपटाची स्टोरी पोहोचवण्याची धडपड काही औरच असायची.निळू फुले,डॉ. श्रीराम
लागू,दादा कोंडके,अशोक सराफ,रवींद्र महाजनी,राजा गोसावी अशा अनेक अभिनेत्यांनी
आपापल्या भूमिकेतून एक वेगळा ठसा उमटलेला होता.आपल्या वेगळ्या अभिनयाने रसिक
श्रोत्यांना अक्षरशः वेड लावले होते. पूर्वी चित्रपटातून मनोरंजनही असायचे. त्याच
बरोबर सुश्राव्य गाणी,अभिनय आणि काही भले संस्कारही दिले जायचे. समाजातील काही वाईट
प्रवृत्ती,खलनायकी अभिनयातून उभ्या केल्या जायच्या. असेच एकदा दिवाळी अंक
प्रकाशनाच्या निमित्ताने अभिनेता निळू फुले यांच्या सोबत आम्ही पाच-सहा जणांनी खूप
गप्पा मारल्या. आमच्या खेड्यातल्या जिवंत रसिकतेबद्दल अनेक आठवणी त्यांना सांगून
आम्ही मनमोकळे केले.आज रवींद्र महाजनी आपल्यात नाहीत.दूरदर्शन,अनेक वाहिन्या,
व्हाट्सअपवर त्यांच्याविषयी, त्यांच्या चित्रपटाविषयी,त्यांच्यावर चित्रित झालेल्या
गाण्याविषयी,भरभरून बोलले जात आहे.हेही ऐकावयास मिळते आहे की, कुठल्याशा बांधकाम
व्यवसाय क्षेत्रात ते उतरले होते आणि तोट्यात गेले.खूप संघर्ष करून चित्रपट
पडद्यावर एक कारकीर्द गाजवणारा थोर गुणी अभिनेता आज काळाच्या पडद्याआड गेला.वयाच्या
७७ व्या.वर्षी जाणं एक वेळ आपण समजू शकतो.एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टीला अभिनयाचा
सुगंध देणाऱ्या या महान अभिनेत्याचा देह बेवारस,दुर्गंधीत व्हावा हे कानाने ऐकायला
सुद्धा मन सहजासहजी राजी होत नाही.या आधीही काही कलावंतांच्या वाट्याला असाच मृत्यू
आला होता.असे ऐकीवात होते.म्हातारपणी नुसती काठीच नाही,सुख दुःखाला आणखीही कोणी जवळ
असलंच पाहिजे.ते एकटे होते.जवळचा कोणीच नव्हता.कदाचित मोबाईल ही आपलं काम करून दमला
असेल.राहून राहून एवढंच वाटतं. असं व्हायला नको होतं.कवी ऋषिकेश कांबळे यांच्या शहर
कवितेतल्या ओळी आठवतात.... दोस्त,या शहराची रीत न्यारी आहे,उलटे काळीज,बंद कप्पे या
शहराला प्यारी आहे.आणि आठवतं,रवींद्र महाजनी यांच्या वाट्याला आलेल गाणं... खेळ
कुणाला दैवाचा कळला ?
भावपूर्ण श्रद्धांजली......
लेखक प्रा.सय्यद अल्लाउद्दीन
(आष्टी).
0 टिप्पण्या