आष्टी (प्रतिनिधी) पवित्र रमजान पर्वाचे औचित्य साधून आष्टी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वधर्मसमभाव आणि बंधुभावाचे दर्शन घडवणाऱ्या 'दावत-ए-इफ्तार'कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आज शनिवार दि.१४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता हा सोहळा पार पडणार आहे.यातून सामाजिक एकोप्याचा मोठा संदेश दिला जाणार आहे.आष्टी,पाटोदा, शिरूर मतदार संघाचे माजी आ.भीमराव धोंडे यांच्या आष्टी येथील निवासस्थानी या इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.माजी आ.भीमराव धोंडे मित्र मंडळ,आष्टी,पाटोदा,शिरूर यांच्यावतीने या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रमजानचा पवित्र महिना हा त्याग,शांती आणि संयमाचा संदेश देतो.दिवसभर कडक उपवास (रोजा) करणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी सूर्यास्ताच्या वेळी रोजा सोडण्याच्या प्रक्रियेला (इफ्तार) अनन्यसाधारण महत्त्व असते.याच इफ्तारच्या निमित्ताने सर्व धर्माचे आणि समाजाचे नागरिक एकत्र येऊन स्नेहभोजन करतात.यातूनच समाजात बंधुभाव,एकोपा आणि सामाजिक सलोखा वाढीस लागतो.हीच गौरवशाली परंपरा जपत आष्टीत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.दरवर्षीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमाला आष्टी शहरासह पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर,राजकीय नेते,समाजसेवक,व्यापारी,युवक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.रमजान महिन्याच्या या मंगलमयी आणि पवित्र वातावरणात संपन्न होणाऱ्या या'दावत-ए-इफ्तार'कार्यक्रमास सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी असे जाहीर आवाहन आयोजक माजी आ.भीमराव धोंडे मित्र मंडळ'यांच्या वतीने करण्यात आले आहे. --------------------------