आष्टी (प्रतिनिधी) साबलखेड-कडा ते आष्टी या १७ कि.मी.रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे.यापैकी ५० टक्के देखील काम पूर्ण झाले नसल्याने,कामासाठी रस्ता खोदून ठेवल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सार्वंजनिक बांधकाम विभाग व संबधित गुत्तेदार यांना अनेक वेळा सूचना करूनही काम पूर्ण न झाल्याने दि.२४ मार्च रोजी सकाळी कडा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा कड्याचे मजी सरपंच अनिलतात्या ढोबळे यांनी दैनिक झुंजारनेताशी बोलताना दिली.बीड -अहिल्यानगर राष्ट्रीय मार्गावरील आष्टी ते साबलखेड या १७ कि.मी.रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे.या कामासाठी शासनाने अठरा महिन्याचा कालावधी दिला होता.तो संपून सहा महिने झाले आहेत.हे काम अत्यंत धीम्या गतीने आणि कुठलेही नियोजन नसलेले काम चालू असल्याने या रस्त्यावर वाहन चालवणे मोठे कसरतीचे ठरत आहे.पुर्ण मार्गावर सर्वत्र खोदून ठेवल्याने जामखेड ते नगर या मार्गावर वाहनचालक या रस्त्याऐवजी जामखेड मिरजगाव नगर असा प्रवास करत आहेत.कडा परिसरातील नागरिक देखील या रस्त्याने प्रवास करणे टाळत आहेत. त्याचा परिणाम कडा येथील बाजारपेठेवर झाला असून येथील व्यापाऱ्यांची दुकानेच काय पण नगर-बीड रस्त्यावरील हॉटेल व्यवसाय देखील अडचणीत आहे. खराब रस्त्यावरुन जात असताना धुळीचे प्रचंड लोट निर्माण होत आहेत आणि लोकांना या संसर्गामुळे फुफुसाचे विकार व अनेक अॕलजी सदृश्य आजार होत आहेत.रस्त्याचे काम दोन वर्ष चालल्यामुळे जनता वैतागली आहे.यापुर्वी रस्त्याचे काम कंत्राटदार १५ मार्च २०२५ कालावधी पर्यत पूर्ण करणार हे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी लेखी दिले होते.परंतु काम पुर्ण झालेले नाही. त्यामुळे सर्व व्यापारी,हॉटेल व इतर व्यावसायिक सोमवार दि. २४ मार्च रोजी तीव्र रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.रस्ता काम दोन दिवसात न सुरु झाल्यास अधिकाऱ्यांना व अभियंत्याला बांगडया व चोळीचा आहेर देण्याचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा कडा शहरातील व्यापारी व नागरिकांनी दिला आहे.