आष्टी (प्रतिनिधी) आनंदराव धोंडे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या कु.तेजस्विनी नाथराव केंद्रे हिने ७ हजार रुपयांचे प्रथम व अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या कु.प्रणाली पांडुरंग पाटील हिने ५ हजार रुपयांचे व्दितीय पारितोषिक पटकावले आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाच्या संकेत कृष्णा पाटील ३ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक पटकावले तर फिरता करंडक न्यू आर्ट,काॅमर्स सायन्स काॅलेज अहमदनगरच्या आकाश मोहिते कु.वैष्णवी फिस्के यांच्या संघाने पटकावला. लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालयाच्या प्रमोद दत्तात्रय घोडके व माजलगाव येथील श्री सिध्देश्वर महाविद्यालयाच्या कु.मोहिनी चंद्रशेखर पायधन या दोघांनी १ हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट व विद्यापरिषद सदस्य तथा प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण,परीक्षक म्हणून प्रा.डॉ.संजय दरवडे,प्रा.डॉ.अनिल गर्जे,प्रा.डॉ‌.अभय शिंदे उपस्थित होते.प्रसंगी प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी सांगितले की,आज ज्यांना बक्षिस मिळणार नाही त्यांना या स्पर्धेतून अनुभव मिळतो,शिकायला मिळते.सर्व स्पर्धकांनी दिलेल्या विषयांची उत्कृष्ट मांडणी केली.या स्पर्धेचे शानदार उद्घाटन युवा नेते अभयराजे धोंडे यांच्या हस्ते झाले होते.परीक्षक प्रा.डॉ.अनिल गर्जे,प्रा.डॉ‌ अभय शिंदे यांनी सांगितले की,आनंदराव धोंडे महाविद्यालयात या स्पर्धेचे उत्कृष्ट असे नियोजन केले आहे.स्पर्धकांच्या भोजनापासून सर्व व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळेच १३ वर्षांपासून ही स्पर्धा अविरतपणे चालू आहे.स्पर्धेत हार जित चालु असते त्यामुळे कोणीही नाराज न होता पुढील स्पर्धाची तयारी करावी स्पर्धेतून अनुभव मिळतो.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. जी.पी.बोडखे यांनी केले व उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.महेमुद पटेल यांनी मानले.स्पर्धेत कोल्हापूर,अकलूज,पुणे,नवी मुंबई,अहमदनगर,औरंगाबाद,लातूर,बीड, माजलगाव व इतर ठिकाणच्या स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला‌.