आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील आठ विभागामधील १७ वर्षाखालील शालेय स्तरावरील मुले आणि मुली यांच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन आष्टी येथे दि.२८ आणि २९ नोव्हेंबर २०२३ या दोन दिवशी करण्यात आले.आहे. दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजी निवड चाचणी होणार असून मुले आणि मुलींचा राज्य शालेय संघ निवडले जाणार आहेत अशी माहिती या स्पर्धेचे संयोजक आ.सुरेश धस यांनी दिली आष्टी येथील निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलताना आ.धस म्हणाले की,दि.२८ नोव्हेंबर रोजी रोजी दु.४.३० वा.आष्टी शहरातून या खेळाडूंची शोभायात्रा होणार आहे. आष्टी शहरातील प्रमुख मार्गावरून या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वा.आनिषा ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन बीडच्या खा.डॉ. प्रीतमताई
मुंडे यांचे हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार भीमराव धोंडे,माजी आमदार साहेबराव दरेकर भारतीय जनता पक्ष तालुकाध्यक्ष अॕड. साहेबराव म्हस्के आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर,लातूर, नाशीक,कोल्हापूर,मुंबई,पुणे,अमरावती, नागपूर या आठ विभागातील शालेय मुला, मुलींचे संघ भाग घेणार आहेत.या स्पर्धेतून दि.३० नोव्हेंबर रोजी निवड चाचणी घेण्यात येणार आहे. त्यातून महाराष्ट्र राज्य शालेय मुलांचा आणि मुलींचा संघ निवडण्यात येऊन हे दोन्ही संघ राष्ट्रीय स्तरावरील शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करतील अशी माहिती देऊन आ.सुरेश धस यांनी यावेळी दिली.अशा प्रकारची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजन करण्याची संधी मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील होतो आणि अखेर महाराष्ट्र शासनाने ही संधी आपणास प्राप्त करून दिली आहे.या स्पर्धेतील खेळाडूंचे क्रीडा कौशल्यपणाची संधी आष्टी तालुक्यातील क्रीडाप्रेमींना आणि शालेय विद्यार्थ्यांना पाहण्याची यानिमित्ताने मिळणार आहे.ही स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी स्वागत समिती,निवास व्यवस्था समिती,भोजन समिती,आरोग्य समिती,प्रसिद्धी व्यवस्था समिती अशी समित्या करण्यात आल्या आहेत.या स्पर्धेसाठी ४ हजार प्रेक्षक बसतील अशी प्रेक्षक गॅलरी आणि दर्जेदार मॅट उपलब्ध करून देण्यात आली आहे.या स्पर्धेचा शालेय विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहनही आ.सुरेश धस यांनी केले आहे.