आष्टी (प्रतिनिधी)
क्रीडा क्षेत्रात आपल्या यशाचा डंका संपूर्ण राज्यभरात वाजवणाऱ्या आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील'श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया'ने शैक्षणिक मैदानातही मोठी बाजी मारली आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यालयाचा निकाल ९३.७५ टक्के लागला असून,खेळाच्या मैदानात घाम गाळणारे हे विद्यार्थी अभ्यासातही खऱ्या अर्थाने 'चॅम्पियन' ठरले आहेत.
या परीक्षेत विद्यालयाचा विद्यार्थी तेजस शरद हंबर्डे याने ९२.८० टक्के घवघवीत गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर,समर्थ अशोक डोके याने ८९ टक्के गुणांसह द्वितीय आणि सोहम साईनाथ सोनवणे याने ८७.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे.ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद मानले जात आहे.
यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण ३२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी ३० विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत.विशेष म्हणजे,यातील १४ विद्यार्थ्यांनी'विशेष प्राविण्य'मिळवले असून,११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत,तर ५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
क्रीडा आणि शिक्षणाचा
सुरेख संगम
--------------
मातकुळीचे श्रीकृष्ण विद्यालय हे केवळ'खेळाडूंची शाळा' म्हणूनच नाही, तर उत्तम शैक्षणिक दर्जासाठीही ओळखले जाते.या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा,विभाग आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये अनेकदा निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.शाळेच्या दोन विद्यार्थिनींनी राष्ट्रीय स्तरावर देशात चमक दाखवली असून त्यांना केंद्र सरकारची मानाची शिष्यवृत्तीही सुरू झाली आहे.
याच परंपरेतील शाळेची राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू कु.ज्ञानेश्वरी नितीन धनवे हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.दररोजचा खडतर सराव आणि स्पर्धांचा ताण सांभाळून तिने दहावीत ८७ टक्के गुण मिळवले आहेत.'खेळाडू अभ्यासात मागे नसतात', हे तिने आपल्या जिद्दीतून सिद्ध केले आहे.
विद्यालयाचे प्राचार्य तथा क्रीडा मार्गदर्शक अशोक डोके यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि शिक्षकांनी घेतलेल्या अथक मेहनतीचे हे फळ असल्याचे बोलले जात आहे.या उत्तुंग यशाबद्दल शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षण महर्षी,माजी आ.भीमराव धोंडे,महेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.अजय धोंडे आणि युवा नेते अभय धोंडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.
प्रशासनाधिकारी डॉ.डी.बी.राऊत,प्रा.शिवदास विधाते,संदीप नन्नवरे,माऊली बोडखे,संजय शेंडे,सागर वाघुले,मातकुळीचे सरपंच बबनदादा डोके,उपसरपंच विशाल जरे,माजी सरपंच आप्पासाहेब जरे,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनील डोके, उपाध्यक्ष रवींद्र पाटील,सुधाकर डोके काका,शेषराव आढाव, मातकुळी व चिंचपूर ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

0 टिप्पण्या