उत्तम बोडखे,आष्टी. ------------- माजी आ.भीमराव धोंडे यांच्या कारकिर्दीत २०१४ आष्टी,कडा हे बस स्थानक मंजूर झाले होते.आष्टीचे काम तब्बल ११ वर्षांनी पूर्ण झाले आहे.त्यामुळे आष्टीचे बस स्थानकाचे उद्घाटन तातडीने व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे.गेली कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बसस्थानक बांधकाम पूर्ण झालेले आहे.आता हे बस स्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.उद्घाटनानंतर प्रवाशांच्या सेवेसाठी हे बसस्थानक अत्यंत समाधानकारक सुविधा पुरवेल अशी अपेक्षा आष्टीकरामध्ये आहे.आष्टी हे बीड अहिल्यानगर,पुणे,मुंबई या राज्य महामार्गा वरील महत्त्वाचे शहर आहे.याच शहरातील बसस्थानक हे गेल्या अनेक वर्षापासून एक चर्चेचा विषय झाला होता.खेड्यातील बस स्थानकसारखी स्थिती या तालुक्याच्या बस स्थानकाची होती.अस्वच्छता,खड्डे सुविधांचा अभाव अशा स्थितीमध्ये असलेले बसस्थानक अखेर जनता आणि प्रवाशांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने अद्यावतपणे तयार केल्याचे दिसते परंतु हे तयार झालेले बसस्थानक प्रत्यक्षात प्रवाशांच्या सेवेसाठी केव्हा उपलब्ध होणार? हा मोठा प्रश्न आहे. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ही इमारत दिसते आहे.उद्घाटनानंतर अत्यंत शिस्तबद्धपणे आणि योग्य रचनात्मक पद्धतीने गाड्यांची उभारणी तेथील शिस्त आणि प्रवाशांसाठी योग्य पद्धतीने सुविधा याबाबी केल्या तरच या अद्यावत बस स्थानकाची इमारत जनता आणि प्रवाशांच्या सेवेला सार्थ ठरेल असे वाटते.नवीन बसस्थानकात आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असून मोठी प्रतीक्षालये,स्वच्छतागृहे,तिकीट काऊंटर,व्यापारी दुकाने अशा अनेक सुविधांची उभारणी करण्यात आली आहे.मात्र प्रशासकीय विलंबामुळे या सुविधा कागदावरच राहिल्या आहेत. सध्याचे बसथांबे अरुंद आणि अपुरे असल्यामुळे बस थांबल्यावर मोठी गर्दी होते.विशेषतः विद्यार्थ्यांना व महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.पावसाळ्यात प्रवाशांची अवस्था अधिकच हालाखीची होते.याबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदने देण्यात आली असली तरी अद्याप पावले उचलली गेलेली नाहीत.त्यामुळे बसस्थानक लवकरात लवकर सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.आष्टी येथील नव्या बसस्थानकाचे काम सन २०१४ पासून सुरू असून तब्बल ११ वर्षे उलटल्यावर काम पूर्णत्वास आले आहेत.काम पूर्ण झालेले आहे उद्घाटन करा नागरिकांकडून मागणी होत आहे.नागरिकांनी वेळोवेळी निवेदने दिली तरी संबंधितांकडून ठोस पावले उचलली जात नाहीत.त्यामुळे बसस्थानक त्वरित सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.