आष्टी (प्रतिनिधी)
एकेकाळी दुष्काळ,बेरोजगारी आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर यामुळे ओळखला जाणारा आष्टी तालुका आज एका नव्या आणि सकारात्मक कारणासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर झळकत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पुणे,मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगरची वाट धरावी लागण्याची जुनी परंपरा आता मोडीत निघाली आहे.या स्थित्यंतराचे मुख्य शिल्पकार आहेत शिक्षणमहर्षी माजी आमदार भीमराव धोंडे.त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले 'आनंद शैक्षणिक संकुल'आज केवळ शिक्षणाचे नाही तर संशोधन, कौशल्य विकास आणि ग्रामीण अर्थकारणाचे नवे केंद्र बनले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे,फक्त त्यांना संधीची गरज आहे,हा विश्वास उराशी बाळगून माजी आ.भीमराव धोंडे यांनी शैक्षणिक क्रांतीचा पाया रचला.केवळ पारंपरिक पदव्या न देता,कृषी,वैद्यकीय,अभियांत्रिकी आणि आधुनिक तंत्रज्ञान एकाच छताखाली आणण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलले आहे.
२००० साली कृषी तंत्र विद्यालयाने सुरू झालेला हा प्रवास आता 'श्री.छत्रपती शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालया'पर्यंत पोहोचला आहे.दरवर्षी भरणारे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन हे आष्टीच्या आधुनिक शेतीचे मॉडेल बनले आहे.शेतमालाला भाव मिळावा यासाठी २०१५ मध्ये 'कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी'चीही स्थापना करण्यात आली.ग्रामीण रुग्णांना परवडणारी सेवा मिळावी म्हणून २०१७ मध्ये ६० खाटांचे 'महेश आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय' सुरू झाले.महिला सक्षमीकरणाचा पाया भक्कम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नर्सिंग आणि पॅरामेडिकल महाविद्यालयांमुळे हजारो ग्रामीण मुलींना हक्काचा रोजगार आणि सन्मान मिळाला आहे. काळाची पावले ओळखून सन २०२५ मध्ये 'महेश इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी'ची मुहूर्तमेढ रोवली गेली.जिथे शहरातही अजून सुविधा नाहीत,तिथे आष्टीसारख्या ठिकाणी'आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स' सारख्या अद्ययावत शाखा सुरू करून ग्रामीण तरुणांना जागतिक स्पर्धेसाठी सज्ज केले जात आहे.फार्मा आणि पशुसंवर्धन,फार्मसी महाविद्यालये आणि पशुधन व्यवस्थापन अभ्यासक्रमांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि उद्योजकतेला थेट चालना मिळत आहे.आनंद शैक्षणिक संकुलामुळे केवळ विद्यार्थ्यांचाच नव्हे,तर संपूर्ण आष्टी शहराचा चेहरामोहरा बदलला आहे.राज्यभरातून हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असल्याने शहरात वसतिगृहे,भोजनालये, स्टेशनरी दुकाने आणि वाहतूक व्यवस्था अशा अनेक पूरक व्यवसायांना मोठी चालना मिळाली आहे.शिक्षणाच्या या गंगेमुळे आष्टीच्या नागरी आणि आर्थिक विकासाला एक अभूतपूर्व गती मिळाली आहे.
संकुलात केवळ इमारती उभ्या केल्या नाहीत,तर डिजिटल क्लासरूम्स,सुसज्ज प्रयोगशाळा,विशाल ग्रंथालये आणि प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाची हमी दिली आहे.गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शासकीय योजनांच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जात आहे.शेतीमालावर प्रक्रिया झाली तरच शेतकरी सक्षम होईल आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाली तरच ग्रामीण तरुण जगात टिकेल,हा लोक नेते भीमराव धोंडे यांचा विचार आज आष्टीमध्ये प्रत्यक्ष साकार होताना दिसत आहे.विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आत्मविश्वास निर्माण करणारे हे 'आनंद शैक्षणिक संकुल'

ग्रामीण महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे एक प्रेरणादायी प्रतीक बनले आहे.
ले ख क
------------
--- संजय बोडखे
(प्राचार्य- डिप्लोमा इन इंजिनीअरिंग
अँड टेक्नॉलॉजी,आष्टी)
-------------
0 टिप्पण्या