
उत्तम बोडखे,आष्टी.
---------------------------
ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना आणि
त्यातही विशेषतः महिला शेतकऱ्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे
पाहिले तर अनेक वेदनांचा कहर पाहायला मिळतो परंतु यातून मार्ग काढत जीवनाचा गाडा
यशस्वीपणे चालवणारे हे शेतकरीच असतात. गावाला आणि शेतीला जाण्यासाठी रस्ताच
नसल्याने एका महिला वृद्ध शेतकरी भगिनीने चक्क घोडीच खरेदी केली..अन् तिच्याशी घट्ट
मैत्री करून आपल्या दैनंदिन येण्या-जाण्याच्या प्रवास सुकर केला आहे! आष्टी
तालुक्यातील वेलतुरी येथील लहानाबाई गव्हाणे ही एक जेष्ठ महिला शेतकरी. वय वर्ष ७०
गावाच्या काही अंतरावर वस्तीवर छोटासे घर.आणि त्याच आसपास त्यांची शेती.येथून
गावाला आणि तालुक्याला जाण्यासाठी त्यांना रस्ता नसल्याने पावसाळ्यात आणि इतर ऋतूत
मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असे.परंतु अडाणी असलेल्या लहाना बाईंनी शासन
दरबारी थेटे घालण्याऐवजी स्वतःच एक बाजारातून पाच हजार रुपयांची घोडी खरेदी
केली.त्या घोडीवर बसण्याचा काही काळ सराव केला.त्यानंतर या घोडीवरच गावात
येण्या-जाण्यासाठी शेती तसेच बाजारहाट करण्यासाठी आधार घेण्यात आला.गेल्या सात आठ
वर्षापासून ही कसरत लहानाबाईंची निरंतर सुरू आहे. गावात जाता येता गावातील मुले
महिला आणि गावकरी तिला " झाशीची राणी " म्हणून बोलतात.सोनी नावाच्या या घोडीवर तिची
घट्ट मैत्री जुळली आहे. सोनीला आणले तेव्हा त्यांचे पती रागावायचे कशाला आणलं? नंतर
मात्र उपयोग पाहून तेही खुश झाले.१८ एकर जमीन आणि वार्षिक उत्पन्न दोन लाख असलेल्या
या कष्टकरी कुटुंबात प्रचंड मेहनत केली जाते. दोन्ही मुले बाहेरगावी कामाला
असल्याने शेतीची सर्व जबाबदारी या वृद्ध दांपत्यावर आहे.प्रतिकूल कठीण परिस्थितीवर
मात करत शेती या अत्यंत कष्ट प्रद व्यवसायाला ७० च्या वयात ही या जोडीने तितक्याच
मेहनतीने आणि धाडसाने पुढे नेण्याचे सिद्ध केले आहे.दरम्यान,शेती कसत असताना प्रचंड
मेहनत घ्यावी लागते. शेतीमालाला पुरेसा भाव नाही,तरी प्रचंड मेहनत आणि कष्टाच्या
जीवावर गुरे ढोरे आणि या घोडीचा उपयोग करत हा संसाराचा गाडा सुरू असल्याचे
हसतमुखाने लहानाबाई गव्हाणे यांनी माध्यमांना सांगितले.
-----------------------------
0 टिप्पण्या